तर्काची तीर्थे

By
शब्दांना असणारे अर्थ प्रघातनीतीचे परीघ धरून प्रदक्षिणा करत असतात की, त्यांना त्यांचं स्वतःचं अस्तित्व असत? की काळाच्या ओघात ते आकारास येतात? विशद करून सांगणं अवघड आहे. कोशात असणारे अर्थ अन् आयुष्यात येणारे त्यांचे अर्थ सारखे असतीलच असे नाही. कोणीतरी कोरलेल्या वाटांनी चालणं अन् आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद देत प्रवास करणं यात अंतर असतंच. भावनांनी घातलेली साद अन् तर्काला दिलेला प्रतिसाद यात तफावत असतेच.

तर्काच्या मार्गाने चालताना आसपासची विसंगती लक्षात घेता येते त्यांना बदलाच्या व्याख्या पाठ नाही करायला लागत. डोळसपणे घडणारा प्रवास असतो तो. डोळस असण्याचे अर्थ अवगत झाले की, त्याला अनुलक्षून नियोजन घडते. कधी-कधी नियोजनाचे अर्थही चुकतात. चुका घडून नयेत, असे नाही. पण त्या स्वभावदत्त असतील, केवळ स्वतःचे अहं कुरवाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कवायतीमुळे घडत असतील, तर तेथे तर्क कुचकामी ठरतात अन् उरतो केवळ कोरडेपणा. कोरडेपणाच्या कपाळी अंकुरण्याचे अभिलेख कोरलेले नसतात.

सुख-दुःखाच्या पथावरून घडणारा प्रवास बहुदा आपणच निवडलेल्या संगत-विसंगत पर्यायांचा परिपाक असतो. समाधानाच्या पथावरून पडणारी पावले आणि वेदनांच्या मार्गावरून घडणारी वणवण आपणच निर्माण केलेल्या भावस्थितीचा परिपाक असतो. कारणं काहीही असोत, प्रवास जिवांच्या ललाटी कोरलेला अभिलेख असतो. प्रत्येकाचं ते भागधेय असलं, म्हणून सगळेच प्रवास काही देखणे नसतात. आनंदतीर्थे शोधण्यासाठी केलेल्या प्रवासाचे अर्थ आगळे असतात आणि पोटाची ओंजळभर खळगी भरण्यासाठी मार्गावरील चालण्याचे अन्वयार्थ वेगळे असतात अन् आपणच आपल्या अस्तित्वाचे आयाम शोधण्यासाठी केलेल्या भटकंतीचे संदर्भ निराळे असतात.

आयुष्याच्या अग्रक्रमांना अबाधित राखणाऱ्या आवश्यकता आपली अवस्था अधोरेखित करतात. माणूस म्हणून असणारी पात्रता सिद्ध करतात. काही सहजपणाचे साज लेवून जगणं सजवतात. काही शक्यतांच्या संदर्भांमध्ये मुखवटे शोधतात. काही सहज जगतात, काही जगण्यासाठी सहजपण सोडून वाहतात. उन्माद एक भावावस्था आहे. ती केव्हा, कशी आणि कोठून आयुष्यात प्रवेशित होईल, हे काही सांगता येत नाही. एकदाका आपणच आपल्याला अलौकिक वगैरे असल्याचा साक्षात्कार झाला, आपणास बरंच काही अवगत असल्याचं मानायला लागलो की, अंतरी अधिवास करणाऱ्या अहंचे एकेक पीळ अधिक घट्ट होत जातात. दोरीला पीळ जितका अधिक दिला, तेवढी ती ताठर होत जाते.

कठोरपणाच्या ललाटी काही अढळ चिरंजीवित्वाचे अभिलेख कोरलेले नसतात. कालांतराने एकएक पीळ वेगवेगळा होत राहतो. उसवत जातो एकेक धागा बंधातून. दोरीचा ताठपणा तुटत तुटत संपून जातो. माणसांच्या मनाचेही असेच असते नाही का?
काळ वेळ स्थिती गती सगळेच खेळत असतात जिवांच्या आयुष्याशी. कोण कोणत्या प्रसंगी बलशाली ठरेल, ते सांगणं अवघड असतं. परिस्थितीच्या आघातासमोर सगळे वाकतात. आपण शून्य असल्याचा साक्षात्कार होतो. नगण्य, कस्पट वगैरे शब्दांचे वास्तवातील अर्थ अशावेळी आकळतात. कायेत असणाऱ्या उमेदीचा कणा वाकला की, आपली वास्तव उंची कळते. कधीकाळी पद, पैसा, प्रतिष्ठेचा धनी असलेला कुठल्यातरी प्रमादाचा धनी होतो अन् जमा केलेल्या सगळ्यां अहंची किंमत शून्य बिंदूवर येवून थांबते. नंतर सुरु होतो गोठण्याच्या वाटेवरचा प्रवास.

प्रमाद घडतात. त्यात वावगं काही नाही. प्रयत्नांच्या पथावरून प्रवास घडताना पदरी एखादा प्रमाद पडला म्हणून सगळेच पर्याय पूर्णविरामाच्या कुशीत विसावतात असं नाही. एक विकल्प संपला म्हणून दुसरा हाती येणारच नाही असेही नाही. प्रत्येक प्रमादांना बदलण्याचे पर्यायही असतात, फक्त त्या शक्यता आजमावून बघायला लागतात. ते समजण्याइतके सुज्ञपण अंतरी नांदते असायला लागते. तरीही अस्तित्वाचे अन्वयार्थ लावताना काहीतरी सूत्र सुटतं अन् सगळं समीकरणच चुकतं. उत्तरांची वणवण तशीच आबाधित राहते. वणवण आपल्या जगण्याचा चेहरा आहे तसा समोर आणून उभा करते. प्रमादांचे परिमार्जन करता येतं. विचारांत विवेक अन् कृतीत प्रामाणिकपणाची प्रयोजने पेरता आली की, परिवर्तनाचे पथ पायांना दिसू लागतात. पण एक खरं की, जिद्दीपुढे पहाड वितळतात. प्रवाह गोठतात. वाटा अपेक्षित मार्गाने वळत्या होतात. फक्त त्या जिद्दीला नैतिकतेचं अधिष्ठान असावं. सत्प्रेरीत प्रेरणांचं पाथेय सोबत असलं की, नव्याने उगवण्याचे अर्थ गवसतात.

देखणेपणात आकर्षणाचं, आसक्तीचं अधिक्य असण्याचा संभव अधिक. मुखवटे परिधान करून देखणेपण उभं करता येईलही, पण सौंदर्याचा साक्षात्कार घडायला मुळांच्या टोकापर्यंत पोहचायला लागतं. मूळ समजलं की, कुळाच्या कथांना काहीही अर्थ नाही राहत. काळाच्या आघातांनी देखणेपणाला सुरकुत्यांनी वेढले जाते. परिस्थितीने त्यावर ओरखडे पडतात. देहाच्या देखणेपणाला विटण्याचा शाप असतो हे खरं असेल, तर विचारांना अमरत्वाचं वरदान असतं हेही खरंच, हे कसं विसरता येईल, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment