आपल्या आसपास असंख्य गोष्टी घडत असतात. त्या सगळ्यांचे अन्वय लावता येतातच असं नाही अन् लावता यायलाच हवेत असंही नसतं. काही गोष्टींचे संदर्भ पाहून अर्थ कळतात. काही संदेहाच्या परिघाभोवती भ्रमण करीत राहतात. त्यांच्या बाबत एकच एक विधान ठामपणे करणं जरा अवघडच असतं. इहतली संदेह घेऊन विहार करणाऱ्या गोष्टींची कमतरता कधीच नव्हती अन् नसेलही. शोधल्या तर एकाला चार सापडतील.
अनेक किंतुपरंतु भोवती घेऊन भ्रमण करणारी गोष्ट म्हणजे माणूस, असं कोणी म्हणत असेल तर अतिशयोक्त ठरू नये. खरंतर माणूस या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून कोणी संदेह हा शब्द सांगितला तर फारसं वावगं ठरू नये. वागण्याच्या पद्धतीवरून एखादा माणूस पूर्णपणे कळतोच असं नाही. माणूस समोर दिसतो, तसा असेलच असं नाही आणि असेल तसा वागेलच, याची सुतराम शाश्वती नाही. तो वाटतो तितका प्रत्येकवेळी निर्व्याज, नितळ, निखळ वगैरे असेलच असं नाही आणि असायलाच हवा, असंही नसतं काही. किंवा माणूसपणाच्या सगळ्या सीमा पार करणारा अन् खूप पराकोटीचा विसंगत वर्तनारा असेलच असंही नाही.
तसंही सगळीच माणसे माणूस म्हणून जवळपास सारखी वाटतात. असलाच काही फरक शोधायचा तर अगदी नगण्य असेल. पराकोटीची गुणी एखाद टक्का अन् टोकाची अवगुणी एखाद टक्का एवढी संख्या सोडली, तर राहिलेले सगळे संक्रमण रेषेवरून प्रवास करणारे. कोणत्या प्रसंगी, कोणते अन् कसे विचार प्रबळ असतील त्यावरून यांचा अक्ष थोडा इकडे अथवा किंचित तिकडे कलतो. भ्रमण तर घडतच असतं व्यवस्थेच्या वर्तुळाला धरून.
कोणी माणसांच्या घोळक्यात सतत वावरत असेल, म्हणून लोकप्रिय आणि माणसांना टाळत असेल तर आत्मकेंद्रित, आत्मलुब्ध असं तर नसतंच नसतं. त्याचं तसं वागणं कदाचित प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा तसं असणं परिस्थितीनिर्मित कारणांनी असू शकतं. काहींना सगळ्याच गोष्टीत चार हात अंतर राखून राहण्यात आवडतं. काही मर्यादांची कुंपणे कोरून घेतात भोवती. काहींना आपली वर्तुळे सुरक्षित वाटतात. काही पलीकडे जाऊन डोकावून येतात. तर काही मर्यादांची सूत्रेच नव्याने शोधून आणतात. माणसांशी फटकून राहतो तोही माणूस अन् माणसांच्या मनात राहतो तोही माणूसच असतो. काही आपल्या विस्ताराची वर्तुळे आखून त्याभोवती विहार करण्यात आनंद शोधतात. काहींना परिघापलीकडील वाटांवरून घडणारा प्रवास आपलासा वाटतो इतकेच.
आपल्या आकलनाच्या पलीकडले विश्व प्रयत्न करूनही आपल्याला आकळत नाही अन् त्याचे व्यवहारही त्यातल्या खाचाखोचांसह कळत नाहीत, म्हणून हे आपल्या आनंदासाठी नाही अशी समजूत करून घेतलेली असते काहींनी. जगाच्या आनंदाची अभिधाने आगळीच असतात अन् आपल्या आनंदाची परिमाणे निराळी, असं कुणाला वाटतं. कुणाला माणसांचा राबता आसपास असण्यात आनंद गवसतो, तर कोणाला माणसांच्या गजबटाला टाळून.
एखादा माणसांच्या कोलाहलापासून पळायला लागला की, त्यावर माणूसघाणा असल्याची मोहर ठोकून आपण मोकळे होतो. अर्थात, असे मत तयार करताना आपण इतर बाजूंचा फारसा विचार करत नाहीत. तो अमका-तमका तसाच आहे. त्याला माणसांच्या मतांची अन् मनाची पर्वा नाही. माणूस टाळून माणूस समजू पाहतोय तो. याला काय म्हणावं? कसं शक्य आहे? असं कुणी वागतं का? उगीचच स्वतःला ग्रेट वगैरे प्रकारातला समजतो. माज करण्याइतकं असं काय आहे त्याच्याकडे? परिस्थितीने एवढा पोळला गेला, तरी त्याचा उन्माद काही तसूभरही कमी होत नाही, वगैरे वगैरे.
निकषांच्या लहानमोठ्या मोजपट्ट्या घेऊन काही तयारच असतात, केव्हा याच्याभोवती आपल्या मापाच्या दोऱ्या गुंडाळतो म्हणून. आपल्या खुजेपणाच्या पट्ट्या लावून कोणी कोणाची तरी उंची काढू पाहतो. समजा तुमच्या विचारांच्या परिघात तो नसेलही सामावत, म्हणून त्याचं असणं तसंच असतं, असं कोणी सांगितलं? तुमच्या स्वयंघोषित परिमाणात तो सामावयालाच हवा का? ज्यास तुम्ही तुसडेपणा म्हणून अधोरेखित करतात, दीडशहाणा असणं म्हणतात, त्याला कुणी सुरक्षित अंतर समजत असेल, तर त्यात वावगं काय आहे?
सदासर्वकाळ माणसांच्या कोलाहलात माणसांनी आपले आवाज मिसळून बोलावं, वागावं असं काही असायलाच हवं असं नाही. मान्य आहे की, माणूस समाजशील, समूहप्रिय वगैरे प्राणी आहे. अवतीभवती विहार करणारे ओळखीचे काही चेहरे, काही अनोळखी आकृत्या त्याच्या सामाजिक जगण्याची आवश्यकता आहे. आसपास कोणी असणं त्याची भावनिक गरज आहे, म्हणून तो हे सगळं काही काळ टाळून जीवनयापन करू शकत नाही का? समजा तो तसा काहीसा असला, तरी समूहातील सगळेच प्राणी समूहाच्या मानसिकतेचे तंतोतंत निर्वहन करतात, असं कुठे आहे? असं नसेल तर सामूहिक आणि वैयक्तिक मानसिकतेत अंतराय असतं, हे मान्य करायला संदेह असायलाच हवा का?
- चंद्रकांत चव्हाण
••
0 comments:
Post a Comment