घराच्या ओसरीवर माय, मावशी, मामी नेहमीप्रमाणे गप्पा करीत बसलेल्या. यांच्या सोबतीला असणाऱ्या आसपासच्या आयाबायाची वर्दळ नसल्याने ओसरी बऱ्यापैकी शांत. कदाचित काही दुवे कुठल्याशा कारणांनी अन् कामांमुळे अंतरावर राहिले असावेत आज. नाहीतर ओसरी ओसंडून वाहत असते या सगळ्या समवयस्क बायांच्या गप्पांतून. लेकरं अन् घर सांभाळणं याचं रोजचं काम. सक्तीने म्हणा अथवा संकेतांनी यांच्या पदरी पेरलेलं. खरंतर वाढत्या वयाच्या वाटाच या वळणावर आणून उभ्या करतात. त्यात निवड वगैरे भाग बहुदा नसतोच. पोरं शेजारी हाताला लागेल त्या वस्तूसह खेळण्यात रमलेले. गाडी अंगणात उभी केली. ओट्याच्या पायऱ्या पार करून ओसरीत आलो. पायातले बूट काढून कोनाड्याकडे सरकावले अन् पडवीत पडलेल्या पोत्यावर जावून बसलो.
मला असा अनपेक्षित घरी आलेला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट प्रश्नचिन्ह रेखांकित झालेलं. माझ्या चेहऱ्याकडे बघत त्यांचे डोळे काही अदमास घेऊ पाहतायेत. उत्तर शोधू पहातायेत. माझ्या घरी येण्याला काही ठोस अन् खास कारण नसल्याचे, थोडं इकडचं तिकडचं बोलण्याच्या ओघात कळल्यावर कदाचित त्यांना हायसं वाटलं असावं.
ओसरीच्या उजव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत चारहात अंतरावर कोपऱ्यात तिवईवर विसावलेल्या माठाच्या डोक्यावर ध्यानस्थ बसलेला ग्लास आईने उचलला. त्यापासून चार पावलं दूर आपलं आसन मांडून बसलेल्या रांजणातून त्याला आकंठ अंघोळ घालून पदराने पुसत माठाकडे चालत आली. ग्लास स्वच्छ असल्याची परत खात्री करून त्याला माठात बुडवला. पाणी भरला ग्लास माझ्या हाती देत मी काय सांगतो का, म्हणून माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. आल्या पावली परतायचं असलं की, नेहमीच्या सवयीने हा जेवण करणार नाही याची पूर्ण खात्री असतानाही जेवणाचं बघते म्हणून आग्रह करू लागली. माझं नेहमीप्रमाणे उत्तर तिच्या पुढ्यात. चहा करते सांगून माझ्या होकार नकाराची वाट न पाहता चुल्ह्याकडे वळती झालीदेखील.
मी मध्येच उगवल्याने मावशी आणि मामीचा थांबलेला संवाद पुढचा धागा पकडून नव्याने सुरु झाला. वारीसोबत पायी जायचा बेत आखत होत्या दोघीही. त्यांच्या बोलण्याकडे आधी फारसं लक्ष नाही दिलं. पण त्यांचं आपापसातलं बोलणं ऐकून कळलं की, याचं यंदा पायी वारी करणं पक्कं झालंय. त्यांना थांबवत पुन्हा विचारून खात्री करून घेतली, विषय नेमका काय आहे. त्यांचा संवाद वारी या एका शब्दाभोवतीच भ्रमण करीत होता. दोघीही आपल्या मतावर ठाम. कुणी कितीही अन् कसेही अडथळे आणले, तरी निर्णयापासून तसूभरही विचलित व्हायचं नाही, हे जवळपास नक्की झालेलं.
त्यांचं बोलणं ऐकून थोडा अदमास घेतल्यावर माझ्या विचारांची पट्टी चिटकवत म्हणालो, “तुमची वयं किती असतील आता?”
माझ्या बोलण्याचा मथितार्थ न समजल्याने दोघीही माझ्याकडे नुसत्या बघत राहिल्या थोडा वेळ. असेल याला सहज विचारायचं वगैरे वाटलं असावं म्हणून मामी बोलत्या झाल्या. म्हणाल्या, “असतील साठबासस्ट किंवा अशीच थोडी कमी अधिक काही!”
“तुम्हांला काय वाटतं, या वयात पायी वारी पेलवेल तुम्हांला? झेपेल हे सगळं सहजपणे.” मी
माझ्या बोलण्याचा अर्थ त्यांना लागला असावा. माझ्या स्वयंघोषित विचारधारेवर पलटवार करीत आत्मविश्वासाने मावशी बोलली, “न पेलवायला काय झालं? आणि आम्ही कुठे थकलो आहोत अजून? चांगल्याच तर आहोत. आमचे हातपाय चालतायेत. प्रकृतीच्या चिंता करण्याजोगत्या कुठल्या कुरबुरी अजूनतरी नाहीत. आमच्याहून अधिक वयाची बायामाणसे पायी वारी करतात. ते काही वाढत्या वयाचं गाणं नाही गात बसत.”
“कोण काय करतो यापेक्षा आपण काय करू शकतो, हे अधिक महत्त्वाचं असतं, असं नाही का वाटत तुम्हांला? पण तुमचं गणित तर वेगळंच दिसतंय. समोरच्या कुणी बायाबापड्या वारी करायला निघाल्यात, म्हणून तुम्हीही तसं करावं असं काही असतं का?” माझ्या विचारांचं घोडं नेटाने पुढे दामटत राहिलो मी.
“तसं नाही काही. वारी काही आम्हाला नवी आहे का? कितीदा जाऊन आलो.” मावशीने आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ भूतकाळ खोदायला सुरवात केली.
“हो, खरंय तुमचं म्हणणं. पण त्यावेळेचं तुमचं असणं आणि आताचं वय याचा काही विचार कराल की नाही?” त्यांना फार युक्तिवाद न करू देता म्हणालो.
“काय होतं त्याने. चालवेल तेवढं चालू अन् नाहीच जमलं तर असतातच वाहने सोबत. जावू बसून पुढे त्यातून.” मामीने पर्याय तयारच करून ठेवला असावा बहुतेक. तो माझ्या पुढ्यात आणून मांडला.
आपण माघार घ्यायची नाही हे ठरवूनच त्यांना पुन्हा प्रश्न विचारला, “समजा, नाही गेलात वारीला तर काय होणार आहे?”
“काय होईल की नाही, हे काही माहीत नाही. तुला समजावून सांगता येण्यासारखं आमच्याकडे नाही काही. आम्ही काही तुझ्यासारखे शिकलोसवरलो नाहीत. पण एक खरंय की वारी करण्याचं मनात आलं. नाही जाता आलं वयाच्या या अखेरच्या पडावात, तर राहून गेलं याची रुखरुख राहील कायमची. हातपाय धड आहेत तोपर्यंत जाऊन यावं. थकलो की कोण जाऊ देईल आम्हाला. ती राहायला नको म्हणून चाललो आहोत इतकंच.” मावशी
“समजा राहिली खंत तर त्याने तुमच्या जगण्यावर असा कोणता मोठा परिणाम होणार आहे? सलग नसलेही, पण अधूनमधून का असेना आतापर्यंत वारी करत आलातच ना! तेवढी पुण्याई पदरी पडली असेल तर ती काय कमी आहे? त्यावर विठोबा काही हरकत नाही घेणार आणि विचारणारही नाही की माझ्या भेटीत एवढा खंड का पडला म्हणून.” माझ्या प्रश्नांचे शेपूट वाढवत बोललो.
“मिळाली संधी तसे आपल्या घरांतून, गावातून कुणी ना कुणी पिढ्यानपिढ्या वारीच्या वाटेने चालतायेत. ती सगळी माणसे काय वेडी होती म्हणून नाही. सगळ्यांना दरवेळी जाता येतंच असं नाही. अधूनमधून का जाणं असेना, पण विठ्ठल भेटीची आस अंतरी असतेच ना. विठ्ठल कोणासाठी काय असेल असो, पण त्याला आपला मानणाऱ्यांसाठी सगळं आहे. असं सगळ्यावर कुणी पाणी सोडून देतो का?” मावशी.
“अरे, पण तुमचं वय झालं, याची थोडी तरी काळजी असूद्या.” मी.
“कसलं वय आणि कसली काळजी. आमचं काय बरंवाईट होणार असेल तर ते बघायला आहे पांडुरंग. त्याला त्याची काळजी. आम्ही कशाला करायची?” मामी.
“म्हणजे साक्षात विठ्ठल येथे आला तरी तुम्हांला वारीच्या वाटेवर चालण्यापासून थांबवू नाही शकत, असंच म्हणायचं आहे ना!” मी.
“तसं समज हवं तर. तो विठ्ठल एकदा मनात येऊन बसला की, जनात वावरताना आपण कोण हे कळतं. पण त्याच्यासाठी आधी विठ्ठल तर समजून घेता यायला हवा ना!” मावशी.
त्यांचं मत बदलण्याचा निष्फळ प्रयत्न करीत म्हणालो, “एवढी वर्षे विठ्ठल समजून घेत आलात ना! मग आता त्यालाही थोडी संधी द्याना तुम्हांला समजून घेण्याची.”
आपापल्या मतांसाठी आमचं आग्रही बोलणं सुरु असताना मध्येच आईने चहा आणून सगळ्यांच्या पुढ्यात ठेवला. चहा घेताना विषय पुन्हा पूर्वपदावर. त्या त्यांच्या विचारावर ठाम. मी माझ्या मतावर कायम. वारी निघेल तेव्हा निघेल, पण या आधीच वारीच्या वाटेने वळत्या झालेल्या.
परिस्थितीने त्यांच्या जगण्यात वाढत्या वयाच्या बंधनाचे बांध घातले, तरी मनाच्या मातीत रुजलेला विठ्ठल काही त्यांच्या जगण्यातून सुटणं अन् विचारातून वजा होणं शक्य नाही. विठ्ठल नावाची ही वेल त्यांच्या आयुष्याला बिलगून आहे. त्यांच्या श्रद्धा, त्यांची भक्ती ह्या वेलीला लागलेली मधुर फळे. ती बहरतच राहील. मुळांपासून कोणी कितीही विलग करायचा प्रयत्न केला तरी तिचे अंकुर आषाढीचे वारे वाहू लागले की, वठलेल्या झाडावर हलकेच हिरवी पालवी दिसायला लागावी तसे अंकुरित होतात. त्यांना खुडण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते डोकावतच राहतील, हेही अमान्य नाही करता येत. खरं हेही आहे की, सगळ्याच गोष्टी विज्ञानाच्या चौकटीत तपासून पाहता येतातच असं नाही. या चौकटीपलीकडील चिमूटभर विश्वाचा विचार करताना कुणाचे काही नुकसान होणार नसेल तर पाहूही नयेत. कधी कधी भावनांच्या प्रतलावरून प्रवास करून आपणही तपासून पाहावं त्यांच्या मनाला अन् मनात वसती करून राहिलेल्या ओंजळभर श्रद्धांना, हेच खरं.
पंढरपुरात कोणी, कशासाठी जावं? हा प्रश्न अशावेळी विचारणं गौण आहे. काहींना तेथे आयुष्याची प्रयोजने सापडतात, कुणाला जगण्याची कारणे. कुणाला आनंदाची अभिधाने. कुणाला आणखी काही. कुणाला काही सापडो, आपण मात्र आपल्याला शोधण्यासाठी जावं. लागतं का काही नवं हाती ते पाहावं. मनात अधिवास करून असणारे अहं गळून पडावेत म्हणून वारीत चालत राहावं. माणसाची मनोगते समजून घेता यावीत म्हणून माणूस बनून मिसळून जावं आपणही माणसांत. भक्तिरंगी रंगलेल्या गर्दीत विसर्जित करून घ्यावीत आपण भोवती कोरून घेतलेली वर्तुळे. सोडून द्यावं जाणीवपूर्वक जतन करून ठेवलेलं आपलं मीपण.
आयुष्यात आनंद नांदता राहण्यासाठी फार मोठे सायास करायची आवश्यकता नाही. त्यासाठी ओंजळभर ओलावा अंतरी वाहत राहिला तरी पुरतो. आनंदाची अभिधाने समजून घेण्यासाठी यापेक्षा वेगळं काय हवं? काय आणि किती हवं हे कळलं की, आपणच आपल्याला उलगडत जातो नव्याने. वारीच्या वाटेने आपण नेमकं काय शोधतो? सुख, समाधान, आनंद की आणखी काही? काही हवं म्हणूनच शोधायला जावं का? कारणाशिवाय काहीच करू नये का? प्रत्येकवेळी संदर्भच हवेत कशाला? शोध केवळ सुखांचाच असतो का? चिमूटभर समाधानाचे अंशही असतातच ना मनाला लगडून!
कोणाला कुठून काय शोधायचं शोधू द्यावं. ती आवश्यकता असेलही कुणाची. वारीच्या वाटेने आपण माणूस अवश्य शोधावा. आसपास नांदणाऱ्या कोलाहलातून सापडलंच तर समाधानही वेचावं. वाचावं गर्दीत विहरणाऱ्या अनोळखी चेहऱ्यांना. समजून घ्यावेत त्यावरच्या रेषांचे संदर्भ. समजून घावेत त्यांच्या पदरी पडलेल्या दुःखाचे अर्थ अन् लावावेत ओंजळीतून सुटलेल्या सुखाचें अन्वयार्थ. आयुष्याचे कोपरे सतत सुखांनी भरलेलेच असावेत असं नाही. त्यासाठी अंतर्यामी पर्याप्त या शब्दाचा अधिवास असणे पुरेसे असते. कोणी काय म्हणावं याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. कोणाला काही म्हणू द्या, आपल्याला काय वाटतं हे अधिक महत्त्वाचं. कोणी म्हणतं सुखाचंही सुख शोधण्यासाठी आम्ही वारीच्या वाटेने चालतो. असेलही तसं. न असायला काही कारण नाही. कारण सुखांच्या व्याख्या सगळ्यांच्या सारख्या असतील तरी कशा? मिळालं तर आणावं साकळून तेथून ते अन् टाकावं नियतीने प्राक्तनात वणवण गोंदलेल्या जिवांच्या झोळीत.
श्रद्धेचे तीर धरून सरकणारे भक्तीचे प्रवाह वाहत आहेत असेच अनेक वर्षांपासून पंढरीच्या वाटेने. ना त्यांच्या स्थितीत बदल घडला, ना त्यांच्या गतीत अवरोध आला. ना त्यांच्या समाधानाच्या परिभाषेत परिवर्तन घडलं. समजा नाहीच जाता आलं, तर आहे तेथेच शोधावा आपला विठोबा. शेवटी विठ्ठल मानला तर सर्व आहे. नाहीच उमजला, समजला तर एक प्रतीक आहे, आपणच आपल्याला ओळखण्याचं, नाही का?
प्रत्येकाचा विठोबा वेगळा. ना त्याला अंत, ना आरंभ. खरंतर तो आरंभ आणि अंत या बिंदूना सांधणारा साकव आहे. दुभंगण्यापासून अभंग ठेवतो तो. त्याला आकारात कोंबून काही साकार होत असेल अथवा नसेलही. त्याने फार फरक नाही पडत. निराकाराला नामानिराळे ठेऊन आपण आपल्या अंतरी अधिवास करणारे आकार त्याला देऊन आकृती उभी करतो. याला कोणी आस्था वगैरे म्हणत असेल, कोणी श्रद्धा, कोणी भक्ती तर त्यात अतिशयोक्त काही नाही. आस्थाही अगत्याने अंतरी जपता यायला हव्यात, नाही का? देव आस्तिकांचा आहेच, नास्तिकांसाठी नाही असंही नाही. मानला तर आहे अन् नाहीच मानला तर नाही. त्याचं असणं-नसणं गौण. भक्ती, श्रद्धा असणं महत्त्वाचं. त्याच्या निमित्ताने आपल्यात असणाऱ्या 'मी'पणाचा परीघ कळत असेल, मनात विहरणाऱ्या विकल्पांच्या वर्तुळांचा विस्तार कमी होत असेल, अंतर्यामी दाटलेलं अविचारांचं तणकट वेचून वेगळं काढता येत असेल तर त्यात वावगं काही नाही.
मांगल्याचे अधिपत्य आयुष्याच्या चौकटींना अर्थ देते. ओंजळभर आयुष्याला अर्थपूर्ण आयाम देणारे प्रयोजन म्हणून विठ्ठल पाहायला काय हरकत आहे? प्रघातनीतीचे परिघ आयुष्याला वेढून असतातच. पण त्यापलीकडे आणखी काही गवसत असेल तर ते वेचावं. निवडून घ्यावं. पाखडून पाहावं. फोलपटे वेगळी करून घ्यावीत. पारखून पाहावं परत परत या पसाऱ्यातून आपण आपल्याला. विठ्ठल कुणाला कुठे, कसा, केव्हा गवसेल, कसे सांगावे? असलाच काही फरक तर कोणाला तो वारीत भेटतो, कुणाला वावरात सापडतो इतकंच.
अशी कुठली सूत्रे असतील यां माउल्यांच्या जगण्याची? अशी कोणती समीकरणे असतील यांच्या आयुष्याची? माहीत नाही. कदाचित त्यांनाही सांगता नाही येणार. असं काय असेल सर्वातून सर्व वजा करूनही यांच्या असण्यानसण्यात विठ्ठल ओंजळभर शेष उरण्याची? काय म्हणावं या सगळ्याला? कशी संगती लावावी याची? या अडाणी बायांना विठ्ठल खरंच कळला आहे की, आपल्या पुस्तकी शहाणपणामुळे तो आपल्यापासून अंतरावर राहिला असेल? सांगणं अवघड आहे. पण एक खरंय की, सगळेच विषय तर्काच्या सहाणेवर घासून नाही पाहता येत. प्रत्येकवेळी मोजपट्ट्या वापरून विदवत्ता ठरवता येतेच असं नाही. विचारांच्या विश्वात विहार करणारे किंतु कधीतरी श्रद्धेच्या परिघातही तपासून पाहता यायला हवेत, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••
धन्यवाद!
ReplyDelete