आंतरिक समाधान या शब्दाला काही एक अंगभूत अर्थ असतात. आशयाचे कंगोरे असतात. ते काही कोणी त्याच्या पदरी पेरलेले नसतात. ना ही कुणी आंदण दिलेले असतात. परिस्थितीच्या पायवाटा धरून ते चालत असतात. चालता चालता कधी आपल्या अंगणी येऊन विसावतात. तसं आयुष्य नावाचा किनारा धरून वाहणाऱ्या सगळ्याच गोष्टीत समाधान सामावलेलं असतं असं नाही. खरंतर आयुष्य अथपासून इतिपर्यंत अर्थासह समजणं जरा अवघडच. कोणी सांगत असेल की, समाधानाच्या सगळ्याच नसतील, पण किमान जगणं सजवण्याइतपत व्याख्या अवगत आहेत. कुणी सांगेल प्रगतीच्या परिमाणांनी प्रमाणित केलेल्या शिड्या चढून आम्ही सुखांची नक्षत्रे खुडून आणून आयुष्याला आनंदयात्रा केलंय. आता मागण्यासारखं मागे काही राहिलंच नाही काही, तर सुखांच्या शोधात का वणवण करीत राहावं? अर्थात, असं काहीसं कुणी म्हणत असेल तर त्याचा प्रतिवाद करण्याचं...
विकल्प
व्हॉट्सअपवर एक मॅसेज आला. कुणी, का पाठवला हे फारसं महत्त्वाचं नाही. प्रबोधनाचे असे चिटोरे कुठल्यातरी पाटीवर चिटकवून देण्यात तत्पर असतात काही. तेवढं काम केलं की, पुण्य खात्यावर जमा केल्याचं समाधान वगैरे मिळत असावं बहुतेक अशा होतकरू सुधारकांना. माध्यमांच्या प्रांगणात हा खो-खोचा खेळ काही नवा नाही. असो, त्यात लिहलेला मजकूर होता, 'सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड' वाचून क्षणभर थांबलो. रेंगाळलो. विचार करू लागलो, न्याय म्हणजे काय? आणि समजा नसेल न्याय आसपास नांदता, तर अन्याय नेमकं कोणाला म्हणावं? शोधूनही पर्याप्त पर्यायापर्यंत पावले काही पोहचली नाहीत. या पसाऱ्याच्या परिभाषा समजून घेण्याचा प्रयास करू लागलो, पण केवळ हाती शून्य. वाटलं न्याय-अन्यायाच्या व्याख्या नेमक्या असतात तरी कोणत्या? एकाचा न्याय दुसऱ्याला अन्याय वाटू शकतो. किंवा या उलटही. अन्याय...