विकल्प

By
व्हॉट्सअपवर एक मॅसेज आला. कुणी, का पाठवला हे फारसं महत्त्वाचं नाही. प्रबोधनाचे असे चिटोरे कुठल्यातरी पाटीवर चिटकवून देण्यात तत्पर असतात काही. तेवढं काम केलं की, पुण्य खात्यावर जमा केल्याचं समाधान वगैरे मिळत असावं बहुतेक अशा होतकरू सुधारकांना. माध्यमांच्या प्रांगणात हा खो-खोचा खेळ काही नवा नाही. असो, त्यात लिहलेला मजकूर होता, 'सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड' वाचून क्षणभर थांबलो. रेंगाळलो. विचार करू लागलो, न्याय म्हणजे काय? आणि समजा नसेल न्याय आसपास नांदता, तर अन्याय नेमकं कोणाला म्हणावं? शोधूनही पर्याप्त पर्यायापर्यंत पावले काही पोहचली नाहीत. या पसाऱ्याच्या परिभाषा समजून घेण्याचा प्रयास करू लागलो, पण केवळ हाती शून्य. वाटलं न्याय-अन्यायाच्या व्याख्या नेमक्या असतात तरी कोणत्या? एकाचा न्याय दुसऱ्याला अन्याय वाटू शकतो. किंवा या उलटही. 

अन्याय घडत राहतो. न्याय मिळवावा लागतो. न्यायाच्या चौकटींना विस्तार असतो अन् स्वतःचं विश्वही. अन्याय तुमच्या सहनशीलतेच्या कक्षा पाहून वाढत राहतो. त्याला किती वाढू द्यायचे, हे आपल्या प्रतिकारावर अवलंबून असतं. सात्विकतेचे अर्थ शोधून आयुष्य सुंदर करण्यासाठी न्याय्यतत्वे सांभाळावी लागतात. न्यायासने स्थापित करावी लागतात, तर न्याय प्रस्थापित. अन्याय सहज घडत राहतो. त्याला लांबी असते अन् रुंदीसुद्धा. पण न्यायला याशिवाय आणखी एक गोष्ट अधिक असते, ती म्हणजे खोली. म्हणूनच न्याय कालातीत असतो अन् न्यायतत्त्व संदर्भासहीत. काळाच्या कपाळावर कोरलेल्या भाग्यरेखा असतात त्या.

न्याय केवळ कायदाच्या परिभाषा जाणत असला, तरी त्याला नीतिसंकेतांचे संदर्भ अन् मूल्यांची सोबत असली की, तो अधिक समावेशक होतोच, पण त्याला उंचीही मिळते. न्यायला उंचीवर अधिष्ठित करण्याचं काम तत्त्वनिष्ठ विचारच करत असतात. न्याय आपला वाटतो तोपर्यंत समाजाचे व्यवहार सुरळीत सुरू असतात. तो अंतरावर असला की, उरतो केवळ कायदा अन् कायद्यातून न्याय वजा होतो तेव्हा शेष राहतो केवळ पांगळा आशावाद. कायद्याचा वचक अन् न्यायाप्रती आदर असला की, समाजाच्या विचारांच्या कक्षाच विस्तारत नाहीत, तर त्यांना नवे आयामही आपसूक लाभतात. समाजप्रवाह सुरळीत किनारे धरून वाहता राहावा, म्हणून सक्तीने एखादी गोष्ट करण्यात यश असेलही, पण स्वेच्छेने केलेल्या स्वीकारात असीम आनंद सामावलेला असतो. त्यात आपलेपणाचा ओलावा अनवरत नांदता असतो.

माणूस शेकडो वर्षांपासून इहतली नांदतो आहे, सृष्टीविकासाच्या क्रमातील सर्वात परिणत जीव आहे. जगाच्या कल्याणच्या वार्ता करतो आहे. मग असे असूनही त्याच्या विचारांच्या वर्तुळांचा परीघ अपेक्षेइतका का विस्तारत नसेल? की स्वतःभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना विश्व समजण्याचा प्रमाद त्याच्याकडून घडत असेल? माहीत नाही. पण ज्यांना न्याय-अन्याय, अस्मिता, स्वाभिमान, समायोजन, सहकार्य, सहिष्णुता शब्दांचे आयाम आकळतात, त्यांना कोणत्याही मखरात मंडित नाही करावे लागत. स्वतःच्या मर्यादा माहीत असतात त्यांना संघर्षाचे अर्थ कोणाकडून अवगत करून घेण्याची आवश्यकता नसते. त्यांची लहानशी कृती संघर्षाचे प्रतिरूप असते. अर्थात, त्यासाठी आत्मप्रतिती, आत्मानुभूती असावी लागते, नाही का?

कष्टावीण येथे कोणाला काही मिळते का? बहुदा नाही. तत्त्वांच्या प्रतिष्ठापणेस प्रयत्न लागतात. ते जगण्यात रुजवावे लागतात. जतन करावे लागतात. वाढवावे लागतात. मग तरीही पलायनाचे पथ काहीजण का शोधत असतील? श्रमसंस्कारांचा जागर फक्त माणसांच्या मनात कष्ट कोरण्यासाठी नसतो. श्रमशिवाय संपादित केलेली संपत्ती महात्मा गांधींच्या मते एक पातक आहे. याचं भान किती जणांच्या मनात असेल? अर्थात असा 'किती' शब्द प्रश्नचिन्ह घेऊन येतो, तेव्हा आपणच आपणास तपासून बघायला लागतं. 

जगातले संघर्ष काही नवे नाहीत. फक्त ते नवी नावे धारण करून, नव्या रुपात येतात एवढेच. आयुष्यच एक संघर्ष असेल, तर तो काही टाळता येत नाही. मग जी गोष्ट टळत नसेल तिला सामोरे जाण्यात संदेह कशाला हवा? विवंचना अवश्य असू शकतात. त्यांच्या विमोचनाचे विकल्प शोधता येतात. 

काही गोष्टी स्वनिर्मित असतात, काही परिस्थितीनिर्मित, काही परंपरेचे किनारे धरून येतात. संचित असते ते त्या-त्यावेळेला घडणाऱ्या कृतींचे. परंपराही अशाच कुठून तरी उगम पावून वाहत राहतात, समाजमनाचे तीर धरून. अर्थात, त्या सगळ्याच सुयोग्य असतील किंवा सगळ्याच त्याज्य असे नाही. सगळंच टाकाऊ अन् सगळंच विकाऊ असं काही नसतं. काही दिखाऊही असतात. पण दृष्टी असली की, आसपास दिसणाऱ्या झगमगाटाचे अर्थ आकळतात. सगळेच प्रवाह काही गढूळलेले नसतात. काही वाहतावाहता नितळ होत जातात. काही साचून गढूळ. त्यांना निवळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनावर चढलेली पुटे धुवायला अवधी द्यावा लागतो. सुरवातीस अपवाद असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. कारण परंपरा जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

1 comment: