एक किंतु अधिवास करून असतोच

By
व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती समाज अन् अपेक्षांच्या परिघाभोवती समाजाचे विचार प्रदक्षिणा करीत असतात. आणि या सगळ्यांसोबत माणसांचं आयुष्य परिवलन करीत असतं. भूगोलात गतीचे, विज्ञानात प्रगतीचे अर्थ काही असोत, तेथल्या गती प्रगतीला नियमांचे काही निकष असतील. नियम निर्धारित करणाऱ्या काही व्याख्या असतीलही. पण आयुष्याला व्याख्यांच्या चौकटीत ठाकून ठोकून नाही बसवता येत. बसवता आलं असतं आवश्यकतेनुसार, तर कशाला एवढी व्यंग दिसली असती आसपास. 

एक खरंय की, त्याच्या आकृत्या करता नाही आल्या, तरी मनाजोगते आकार देण्याचे विकल्प उपलब्ध असतात. प्रश्न फक्त एवढाच की, कोणी कोणत्या तुकड्यांना जोडत देखणा कोलाज करायचा. आयुष्याचे किनारे धरून वाहणाऱ्या प्रत्येक  गोष्टीला, निदान स्वतःपुरते असले तरी किमान काही अर्थ असतात. हे खरं असलं तरी एक सत्य फारश्या गांभीर्याने लक्षात घेतलं जात नाही ते म्हणजे, आयुष्याला वेढून असणाऱ्या सगळ्याच आवश्यकतांच्या पदरी प्रयोजने पेरता नाही येत. कधी कधी प्रासंगिकताही प्रबल असतात. अशावेळी प्रयोजनांचा प्रवास डोळसपणे समजून घेता यायला हवा. जगण्याच्या वाटेवर प्रयोजने आवश्यक असली अन् आपल्या असण्याला प्रगतीच्या वळणाकडे नेणारी असली, तरी त्याच्या पसाऱ्यात आयुष्य हरवून जाऊ नये. 

व्यवस्थेने कोरलेले किनारे धरून वाहताना अनेक गोष्टींचं आपल्या अंगणी आगमन होतं. यातल्या सगळ्याच गोष्टी काही आवतन देवून आणलेल्या नसतात. आगंतुकासारख्या अनपेक्षितपणे आयुष्यात येऊन विसावतात काही. त्यांच्या वेढ्यातून मुक्तीसाठी पलायनाचा पर्याय असला आपल्याकडे, तरी प्रत्येकवेळी तो वापरता येतोच असं नाही. परिस्थितीने पुढयात मांडलेल्या सारीपटावर आयुष्याच्या सोंगट्या सरकवत पलीकडचे किनारे गाठावे लागतात. आसपास अगणित घटना घडत असतात. याचा अर्थ सगळ्याच काही अंतरी आनंदाची अभिधाने कोरणाऱ्या नसतात. परिस्थितीमुळे पदरी पडलेल्या म्हणा किंवा कुणी पायघड्या टाकून आणलेल्या सगळ्याच काही उन्नत करणाऱ्या नसतात. काही आभाळाशी गुज करीत आपणच आपल्या प्रेमात पडणाऱ्या असतात, तशा अधःपतनाच्या आवर्तात भिरकावणाऱ्याही असतातच. 

आपल्या ओंजळीत येऊन पडलेल्या किती गोष्टीचं सम्यक आकलन असतं आपल्याला? समजणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही सहज, सुलभ नसतात. आणि न समजणाऱ्या सुगम असतात असंही नाही. अर्थांचे काही स्पष्ट-अस्पष्ट कंगोरे त्यांना असतात, आशयाच्या काही अज्ञात जागा असतात, तसा परिस्थितीचा प्रासंगिक पैसही असतोच. काही विषयच मुळात असे असतात की, अस्पष्ट का असेना, त्यांच्याबाबत अंतरी द्वैत नांदतं असतं. द्वैत निर्देशित करणारी रेषा कदाचित नीट दिसत नसेल एवढेच. अशावेळी नेमकी भूमिका कोणती घ्यावी, याबाबत एक किंतु अंतर्यामी अधिवास करून असतो. बरं हे काही आजच घडतंय असंही नाही. काळाचे किनारे धरून हा संदेह वाहतोच आहे. किती कालावधी लोटला असेल या संभ्रमावस्थेला, ते काळालाही आता स्मरत नसेल. 

हो आणि नाही यांच्या सीमा जोडणाऱ्या रेषेवर एक संदेह सतत नांदता असतो. जिवांच्या जगण्याची निसर्गदत्त प्रेरणा आहे ती. इकडे वळावं की, तिकडे पळावं, अशी काहीशी दोलायमान स्थिती असते. तराजूच्या दोनही पारड्यात पडणारं वजन सारखं असलं की, स्थिर असण्याचं अन्य प्रयोजन नसतं. पण दुसऱ्या भागात थोडं अधिक केलं की, तो तिकडे कलतो. माणसांच्या जगण्याबाबतही असंच काहीसं असतं. आयुष्य ठरलेल्या चाकोऱ्या धरून प्रवास करणं नसतं की, वाटा-वळणे टाळून मार्गक्रमण करणं. आलीया भोगाशी... म्हणत प्राप्त परिस्थितीसमोर शरणांगती स्वीकारून ठिकाणे गाठणंही नसतं. तर आपणच आपला शोध घेणं असतं. हा धांडोळा घेताना आपल्याला काय हवं, हे समजण्याइतपत शहाणपण आपल्या विचारात नांदतं असावं.  

राव असो अथवा रंक, प्रत्येकाचा प्रवास ठरलेला असतो. फरक एवढाच की, कोणाची क्षितिजे दूरपर्यंत विस्तारलेली असतात. काहींची पावलापुरती. परिस्थितीने पेरलेल्या वाटेने पावले पडत असतात अन् मन स्वप्नांच्या मागे पळत असतं. इच्छा असो नसो चाकोऱ्यांशी सख्य साधावं लागतं. थांबला तो संपला वगैरे म्हणणंही कदाचित याच भावनेचा परिपाक. 

पळणं काहींना आयुष्याची अनिवार्यता वाटते. काहींना कर्तव्य. पुढयात पडलेले प्रसंग काहींना दैव वाटतात. काहींना परिस्थितीने घेतलेली परीक्षा. काहींना नियंत्याच्या संकेत सूत्राने चालणारे. काहींना नियतीनिर्धारित अन् नियंत्रित खेळणे वाटतो. नशीब माणसांशी सतत खेळत असल्याचा त्यांना विश्वास असतो. त्यांच्या दृष्टीने पराधीन आहे पुत्र मानवाचा, हेच सत्य असतं. सीमित अर्थाने हे खरंय की, इहतली माणसांइतका परावलंबी जीव अन्य कोणी नसावा. तरीही प्रयासांच्या परिभाषा प्रत्येकाच्या पृथक असतात. परिस्थितीशी धडका देण्याची प्रयोजने सगळ्यांची सारखी कशी असतील? 
चंद्रकांत चव्हाण

1 comment: