आठवणींचे थवे

By
चालणं माणसाचं प्राक्तन आहे. नियतीने त्याच्या ललाटी कोरलेला अभिलेख आहे तो. प्रत्येकाला आयुष्याचे किनारे धरून पुढे सरकत राहावं लागतं. चालण्याची प्रयोजने प्रत्येकाची वेगळी अन् प्रत्येकासाठी निराळी असली तरी त्याचे अर्थ एकूण एकच. पुढच्या पडावावर पोहचणे साऱ्यांनाच अपेक्षित असले तरी प्रत्येकवेळी प्रत्येकास पूर्णत्त्वापर्यंत पोहचता येईलच असं नाही. असे असले तरी प्रवासाची प्रयोजने आयुष्याच्या परिघाभोवती भ्रमण करीत राहतात एवढं नक्की. आयुष्याच्या वाटेवरून घडणाऱ्या प्रवासाची वळणं पार करीत माणूस बरंच पुढे निघून येतो. सगळेच पळत असतात आपापला वकूब ओळखून. प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात तसे बलस्थानेसुद्धा. मर्यादा ज्यांना कळतात त्यांना जगण्याचे अर्थ अन्यत्र नाही शोधायला लागत. ते आपल्या आसपासच नांदते असतात. फक्त त्यांच्याकडे पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. हवं असणं आणि हाव असणं यातील फरक ज्यांना समजतो त्यांना प्रवासाच्या परिभाषा पाठ नाही करायला लागत. की नाही शिकवाव्या लागत. त्या काही कुठल्या कोशातून शोधून आणता नाही येत.

इहतली वावरणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी हवं असतं. ते मिळवण्यासाठी धावणं, हवं ते मिळालं की पुन्हा आणखी काही मिळवण्यासाठी पुन्हा पळणं, हा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो अनवरत. हवं नावाचा शब्द सोबत असेपर्यंत पळणं माणसांच्या आयुष्याचं अनिवार्य अंग आहे. काही हवं असणं अन् त्याच्या प्राप्तीसाठी प्रयास करण्यात वावगं काय आहे? काहीच नाही. पण हवंचा हव्यास होतो तेव्हा विसंगत नक्कीच असतं. आकांक्षा सतत संगत करत असतातच, भले त्यांची प्रयोजने वेगळी असतील. त्यापासून विलग नाही होता येत. विलग व्हायचं तर विजनवासाच्या वाटाच धराव्या लागतील असं नाही. वर्तुळातून विलग होता येईलही, पण आपल्यातून आपल्याला कसे वेगळे करता येईल? याचा अर्थ असाही नाही की, सर्वसंग परित्याग करून विलग व्हावं. हवं ते मिळवण्याचा प्रयास करूच नये, असं नसतं. हवं असणारं हाती लागावं म्हणून संकेतसंमत मार्ग पाहून प्रवास करण्यात वावगं काही नाही. प्राप्तीसाठी पळणं अन् तत्त्वांसाठी पळण्यात प्रचंड अंतर आहे. पळण्याची महती सगळेच सांगतात. माहीत करून देतात. हवं असलेलं काही आणण्यासाठी वेगाने पुढे पळण्यात माहिर असलेल्या कोण्या महात्म्याच्या महतीची स्तोत्रे मांडत असतात. 

नजरेला खुणावणाऱ्या क्षितिजाची ही ओढ अंतरी अधिवास करून असते की, आणखी काही. माहीत नाही, पण स्वप्न बनून डोळ्यात रुजलेल्या क्षितिजाच्या वार्ता सगळेच करतात. या सगळ्या यातायातला सफल आयुष्याचे परिमाण मानून असेल अथवा कृतकृत्य जगण्याचे प्रमाण समजून असेल, माणूस पळत राहतो पुढे, आणखी पुढे, त्याहून पुढे, खूप पुढे. याला विभ्रम म्हणावं की, आणखी काही हा प्रश्न अशावेळी गौण ठरतो. आपणास कुठे विराम घ्यायचा आहे हे कळणं महत्त्वाचं.

पुढे पळण्याच्या शर्यतीत खूप भल्याबुऱ्या गोष्टी आपण मागे टाकून येतो. एक खरंय की, भल्याची सांगता होत नाही आणि बुऱ्याचा सहज शेवट. हे सगळं पाथेय सोबत घेऊन माणूस चालत राहतो. एखाद्या वळणावर उभं राहून मागे वळून पाहताना बऱ्यावाईट आठवणी रित्या मनात गर्दी करतात. भलेही सगळ्याच काही सुखावह नसतील. अंतर्यामी ऊर्जा पेरणाऱ्या नसतील, पण त्यांची सोबत घडताना उगीचंच आपण किमान आपल्यापुरते वेगळे असल्याचा भास होतो. सगळ्याच आठवणी सुखावह नसल्या तरी सोबत करणारी प्रत्येक आठवण जगण्यावरील श्रद्धा वाढवत जाते. नियतीने नमूद केलेल्या वाटेवरून चालताना विस्मरणाच्या कोशात विसावलेल्या आठवणीं आपलेपण घेऊन कुठल्याशा कारणांनी अंकुरतात अन् अलगद डोकावत राहतात. आस्थेची रोपटी वाढत जातात. दिसामासाचे हात धरून चालत राहतात वळत्या वाटांशी सोयरीक करून पुढच्या पडावाकडे. काळाने जे काही दिले असेल, नसेल. त्याची समीकरणे सोडवत सगळ्याच जिवांना पावलापुरती वाट निवडून चालत राहावे लागते. प्राक्तन नसतं ते. निसर्गाने निर्धारित केलेला मार्ग असतो. 

स्मृतीच्या कोशात स्थिरावलेल्या आठवणींवर साचलेली धूळ वर्तमानातला एखादा क्षण फुंकर घालून उडवून जातो. वाढत्या वयाने देहाला वेढणाऱ्या मर्यादा अन् जगण्याला पडणारे बांध विसरून मन स्मृतीकोशात विसावलेल्या क्षणांना सोबत घेऊन येते. काळाचा पडदा दूर करीत एकेक क्षण आठवणींचा देह धारण करून समोर उभे राहतात. मनःपटलावर आठवणींची गोंदणनक्षी साकारत राहतात. दिसामासांची सोबत करीत काळ पुढे सरकत राहतो. आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा मनात कोरून जातो. काळाच्या चौकटींचे अन्वय लावताना आयुष्य आपल्या वाटांनी माणसांना पुढे नेत राहते. उपजीविकेच्या क्रमसंगत मार्गाने प्रवास घडतो. कोण कुठे, कोण कुठे स्थिरावतो. कुठल्याशा निमित्ताने आठवणींच्या झाडाची पाने थरथरतात. आठवणींचे एक गाव प्रत्येकाच्या मनात गजबजलेले असते. कोणत्यातरी अवचित क्षणी गगनभरल्या आठवणींचे थवे मनाच्या गर्द झाडीत शिरतात. मंतरलेल्या क्षणांची सोबत घडत राहते. एकेक पाकळ्या उमलत जातात. आठवणींची फुलं उमलू लागतात. मनाचं आसमंत गंधित करीत राहतात. स्मृतींच्या वेली मांडवभर पसरून वाढत राहतात. ऊन-सावली, पावसाचा खेळ सुरु असतो. कधी रिमझिम धारा बनून चिंब भिजवत राहतात. कधी वाऱ्यासोबत वाहत राहतात. ओहाळ बनून झुळझुळतात. कधी चांदण्यांशी गुजगोष्टी करतात. झाडावेलींवर मोत्यासारख्या चमकत राहतात. आठवणींच्या बहरलेल्या झाडावर स्मृतींचे पक्षी क्षण-दोनक्षण येऊन विसावतात अन् चिवचिव करीत जीवनाचे गाणे गात राहतात... अन् आयुष्य आपले किनारे शोधत वाहत राहतं, कुठल्यातरी आठवणींना सोबत घेऊन.

चंद्रकांत चव्हाण
••

2 comments: