कविता समजून घेताना... भाग: चार

By

एका शिक्षकाची कैफियत
 
खरं सांगतो-
मुलं गृहपाठ करत नाहीत
यात माझा दोष नाही !
या शतकाचा
कोरा कागद
त्यांच्या लेखणीला
झिरपू देत नाही

मुलं प्रार्थनेवेळी
हात जोडत नाहीत
यात माझा दोष नाही!
त्यांच्या श्रद्धेचे दिवे
तेवते ठेवतील
असं या देशाचं वर्तमान नाही

मुलं भटकतात शहरभर
पाहतात... ऐकतात... हाताळतात...
वाचतात... टीव्ही, कॉम्प्युटर
कॅलक्युलेटर, डेली पेपर
यात माझा दोष नाही!
या चार भिंतीत आता
त्यांचा जीव रमत नाही

मुलं असंबद्ध... अवांतर बडबडतात
काहीबाही शालेय परिसरात
यात माझा दोष नाही!
हे शहर... ही शाळा
त्यांच्या स्वीकार-नकारांशी
जुळवून घेत नाही
 
अगदी खरं सांगतो-
या मुलांनी आता
ही शाळा... हे शहर... हा देश पेटवला तरी
माझा अजिबात दोष नाही!
मी शिकवीन ते त्यांनी
आत्मसात करावं
अशी आज तरी त्यांच्या भोवती
परिस्थिती नाही...

- अशोक कोतवाल   
••

विद्यार्थी शिक्षक परायण असावा, शिक्षक विद्यार्थी परायण असावा, दोघेही ज्ञान परायण असावेत आणि ज्ञान सेवापरायण असावे, असं विनोबा भावे म्हणाले होते. याला गोष्टीला काही काळ उलटून गेला, पण परिस्थितीच अशा वळणावर येऊन थांबली आहे की, या विधानांचा अर्थ समजून घेण्यासाठी नव्याने बाराखडी शिकवावी लागेल की काय. माहीत नाही, पण तसे करायला लागलं तर त्यात विस्मयचकित होण्यासारखेही काही नाही. कारण परिस्थितीच अशा वळणावर येऊन विसावली आहे की, विस्मयही विस्मयचकित झाल्याशिवाय राहणार नाही. देश, देशातील माणसे, माणसांना घडवणारे विचार ज्या केंद्रातून उगम पावतात, त्याचंच केंद्र सध्या हरवत चाललं आहे. विश्वकल्याणाच्या वार्ता करणारे आमचे तत्वज्ञान आपल्या सुखांच्या जगाइतके सीमित होत चालले आहे. ‘भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे’ म्हणणारे ज्ञानेश्वरांचे विचार काळाच्या पटलाआड दिसेनासे झालेयेत. आहेत ते विचार कोणतीतरी बाधा झाल्यागत सैरभैर झाले आहेत. माणूस माणसापासून सुटत चालला आहे. स्नेहाचे धागे तुटत आहेत. आभाळच फाटलं असेल, तर त्याला टाके कुठे कुठे टाकावेत?

व्यवस्थेच्या वर्तुळात विसावलेली व्यथा घेऊन ‘शिक्षकाची कैफियत’ मुखरित झाली आहे. काही सत्ये सार्वकालिक असतात. त्यांच्या व्याख्या नव्याने नाही करता येत. माणसांचे सामाजिकीकरण होताना निर्मिलेली नात्यांची परिभाषा काळाचे हात धरून अधिक प्रगल्भ होत राहिली. परिवर्तन निसर्गदत्त शहाणपण असलं तरी काही नात्यांना अधोरेखित करणारे शब्द अन् त्यांचा आशय अपरिवर्तनीय असतो. त्यांवर आघात होऊन तुकडे होणे म्हणूनच विचलित करणारे असते. नात्यांमध्ये अंतराय निर्माण होणं माणसाला काही नवं नसलं, तरी त्यांमध्ये अंतर वाढत जाणं नक्कीच चिंतनीय असतं. मूल्यांच्या परिभाषा घेऊन आखलेल्या वर्तुळातून मर्यादांनी निसटत जाणे चिंतेचा विषय असतो. संस्कृतीने पेरलेल्या संस्कारांचा पराभव असतो. संचिताची हार असते.

शाळा, शिक्षक, शिक्षण व्यवस्थेने निर्माण केलेली सुंदर काव्ये आहेत. ती जीवनाची जीवनासाठी लिहिली गेलीयेत. कधीकाळी शाळा जीवनशिक्षणाची मंदिरे म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या जागी शिक्षणाची पंचतारांकित संकुले उभी राहिली. या संकुलांमध्ये आपापल्या कुलांना इतमामाने सामावून घेण्याची व्यवस्थाही झाली. सम्राटांच्या नामावलीत ‘शिक्षणसम्राट’ उपाधीनेमंडित नव्या सम्राटांचा वर्ग येऊन स्थानापन्न झाला आहे. गुणवत्ता, विद्वत्ता यांच्या अधिपत्याखाली मांडलिक झाली. हे मांडलिक व्यक्तीपूजेच्या आरत्या ओवाळायला अन् पोवाडे गायला लागले आहेत. राजा, राज्य, राज्याभिषेक, राजसिंहासन हे शब्द कधीच कालपटावरून संपले. नव्या संस्थानिकांना आणि त्यांच्या संस्थानांना चांगले दिवस आले आहेत. संस्थानांच्या सेवेत रममाण असणाऱ्यांच्या वाटेला मधुर फळे यायला लागली आहेत. तत्त्व, तत्त्वनिष्ठा शब्दांचा अर्थ कोशात बंदिस्त झाला. कोणातरी आदरणीय महात्म्याच्या कृपाकटाक्षाकरिता, मर्जीसंपादनाकरिता स्पर्धा सुरु झाली अन् तत्त्वनिष्ठ माणसं मांडलिकांच्या जगात वेडी ठरली.

एक हताशपण अन् खंत घेऊन ही कविता आपणच आपल्याला खरवडून काढते. काळच एवढा बदलला आहे की, त्याच्या कोणत्या पैलूंना दुर्लक्षित करावे? म्हणजे उत्तरे सापडतील. एक उसवलेला धागा शोधावा, तर दुसरे दोन धागे विटलेले सापडत आहे. शाळा संस्काराची केंद्रे म्हणून वाढत राहिल्या. त्या तशाच राहाव्यात, म्हणून सांभाळल्या गेल्या. पण हल्ली ही केंद्रे स्वार्थाच्या उताराने सरकू लागली आहेत. हित आणि संबंध या गोष्टीना प्रमाण मानणारी व्यवस्था उभी करून काळजीपूर्वक संवर्धित केली जात आहेत. आयुष्याच इतके दोलायमान झाले आहेत की, त्यांची उकल होणं अधिक अवघड होत आहे. मुले उच्छृंखल वाटांनी पळतायेत. आपणच आपल्याला विसरू लागलीयेत. ते गृहपाठ करीत नाहीत, याचा दोष शिक्षकांना कसा देता येईल? त्यांच्यासमोर धवल असं काही नसेल, तर त्यांनी आदर्शांचे कवडसे शोधावेत कुठून? काळाच्या काही समस्या असतात. शतकांचे प्रश्न असतात. त्यांना घेऊन उत्तरे शोधता येतात, पण शतकच अंधार पांघरून आले असेल तर...

काही तरी घडण्यासाठी मनात श्रद्धेचा अधिवास असायला लागतो. मुलांना दिसणारे पाय मातीचेच असतील, तर त्यांनी कोणासमोर नतमस्तक व्हावे? ज्याच्यावर विसंबून जीवनाला आकार देता येतील, असे आदर्श हाती लागत नसतील, तर हजारांच्या समूहाने जमून सार्वजनिक भक्तीचे मंडप घालून हाती काय लागणार आहे? शाळा संस्कारसंवर्धनाची केंद्रे असतील, तर त्यातून संस्कार का काढता पाय घेतायेत? लहानमोठ्या गोण्या हाती घेऊन नामांकित शाळा शिकायला मिळतीलही. पण शिक्षणात राम नसेल, तर देशाचे रामायण घडेलच कसे? मुले तेथे रमतीलच कशी? निर्जीव भिंती, नीरस अध्यापन, शुष्क पर्यावरण संस्कारांची रोपटी कशी रुजवू देईल? जे. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘तुरुंग आणि शाळा अशा गोष्टी आहेत, जेथे स्वतःहून कोणीच जात नाही.’ तुरुंग विसरुयात. पण शाळाच तुरुंग होणार असतील, तर सर्जनचे मळे कसे बहरतील?

पिढ्यांच्या वाटचालीत शाळाही बदलल्या. मान्य, पण त्यातले काय बदलले? रंग, इमारत, सुविधांची झगमग. पण अंतर्यामी असणाऱ्या तगमगीची उत्तरे आहेत कुठे तेथे? मुलं म्हणजे काही कारखान्यातल्या वस्तू नाहीत. टाकला कच्चा माल इकडून की, तिकडे वस्तू हातात यायला. कुंभाराने चाकाला अपेक्षित वेग देऊन आकाराला येणाऱ्या भांड्यासारखी असतात ती. आतून आधाराचा हात देऊन वरून थोपटत घडवावं लागतं त्यांना. आकार देणारे असे कुशल हात व्यवस्थेतून हरवत आहेत.

आदरयुक्त भीती नावाचा प्रकार कधीच संपला आहे. स्वैराचाराला बरकत येत आहे. अशावेळी एखाद्या शिक्षकाने आस्थेने प्रयोग करून काही बदल करू पाहिले, परिवर्तनाचे प्रयोग करताना, सूत्रे सोडवताना प्रमाद घडले की, त्याच्या आत्मसन्मानापर्यंत उद्दाम हात पोहचत असतील, तर त्याने संस्कारांचे धडे द्यावेत कसे? सगळीकडे धूळ साचत असताना, मुलांनी आस्थेने काही आत्मसात करावे, असे पर्यावरण आहेच कोठे शिल्लक. ‘देशाचं भविष्य शाळांच्या वर्गाखोल्यांमध्ये आकारास येत असतं’, असं काहीसं विधान कोठारी शिक्षणआयोगाने केलं. त्यातील उदात्तता नेमकी कुठे हरवली? ज्याच्यासमोर नतमस्तक व्हावे असे हिमालयच दिसतं नसतील, तर दोष नेमका कुणाचा? अशा पिढ्यांनी देशाच्या भवितव्याची चिंता नाहीच केली तर... नेमके कोणाला उत्तरदायी ठरवावे?   

व्यवस्थेतील काही क्षेत्रे संदेहाच्या परिघात पाहिली जात आहेत. ती एकवेळ प्रदूषित झाली तरी चालतील; मात्र शिक्षणक्षेत्र कलंकरहित असावे, अशी अपेक्षा करण्यात अतिशयोक्त काहीही नाही. मातापित्यानंतर गुरूलाच देवस्वरूपात पाहिले जाते. ब्रह्म, विष्णू, महेशाच्याठायी गुरु शोधला जातो, त्यादेशात गुरूला लघूरूप येणं परिस्थितीचा विपर्यास आहे. डॉक्टर चुकला तर एका रुग्णाचा जीव जातो. इंजिनियर चुकल्यास पन्नास-शंभर माणसं जिवास मुकतील; पण शिक्षक चुकला तर पिढी बरबाद होते, असं म्हणतात. यात तथ्यही आहे. समाजात पूजा आदर्शांचीच होते. उंची कळसाची मोजली जाते. पायथ्याची नाही.

शिक्षण सोपे झाले, त्यातून माहितीचे साठे वाढत चालले आहेत; पण शिकणे मात्र हरवत आहे. काळाचा महिमा अगाध असतो. तो आपल्या सोबत संपन्नता आणतो, तशा समस्याही घेऊन येतो. जगण्याचे प्रश्नच एवढे गुंतागुंतीचे झाले आहेत की, त्यांची सर्वसमावेशक उत्तरे हाती लागणं अवघड होत आहे. अनेकांचं जगणं आर्थिक आघाड्यांवर संपन्न झालं. भक्कम आर्थिक स्त्रोतांनी हाती चार पैसे खुळखुळायला लागले. आवश्यक गरजा भागवून उरलेला पैसा भौतिकसुखांच्या वाटेने पळतो आहे. सोबतीला विज्ञानतंत्रज्ञाननिर्मित सुखाचं व्हर्च्युअल जग उभं राहिलं आहे. या जगाने अॅक्च्युअल जगाचा विसर पाडण्याएवढी साधनं माणसांच्या दारात आणून उभी केली आहेत. सुखप्राप्तीची गणिते श्रमाच्या सूत्रांनी सोडवण्याऐवजी संक्षिप्त पायऱ्यानी सोडवण्याचे फॉर्मुले शोधण्याच्या पद्धतींना प्रतिष्ठा प्राप्त होत आहे.

लॅपटॉप, मोबाईलसंस्कृती विज्ञानतंत्रज्ञानाच्या शिड्या सोबत घेऊन माणसांच्या जगण्यात प्रवेशित झाली आहे. टचस्क्रीनच्या पडद्यावर जगाचे हवे तसे, हवे तेव्हा, हवे ते रंग दिसायला लागले. फेसबुक, व्हाटस् अॅप हाती नसणे मागासलेपणाची परिभाषा ठरत आहे. हजारो वेबसाईटस् चोवीस तास दिमतीला आहेत. या वाटांनी घडणारा प्रवास वेगाने आणि सुगम व्हावा म्हणून थ्रीजी, फोरजी नेटवर्क हाती आहे. हाती लागलेल्या अशा व्यवधानांमध्ये ऑनलाईन असणाऱ्या पिढीची जगण्याची लाईनच चुकतेय, याचं भान उरलं नाही. चेहऱ्यावरच्या सूक्ष्म रेषाच काय; पण वाऱ्याने उडणारा डोक्यावरील एखादा केसही स्पष्ट दिसेल याची शाश्वती देणाऱ्या एलइडी, एचडी, प्लाझ्मा टीव्हीच्या पडद्यांनी जगातील सगळे रंग साकळून बैठकीच्या खोलीपर्यंत आणून ठेवले आहेत. सप्तरंगांनी सजलेल्या स्क्रीनवरील मालिका, चित्रपट, प्रणयी जोड्या, त्यांचे प्रणयाराधन, महागड्या गाड्या, प्रशस्त बंगले. कोणाचीही नजर विस्मयाने फिरावी असं जगणं. असं लक्झरीयस जगणं म्हणजेच खरं सुख, असा समज मनात दृढ होत आहे. काल्पनिक जगालाच वास्तव समजण्याचा प्रमाद उमलत्या मनांकडून घडतो आहे.

आसपास जसा असतो, दिसतो तसे संस्कार मनांत रुजत जातात. पालक उपजीविकेच्या वाटांनी दिवसभर बाहेर. मुलं क्लास, कॉलेज, शाळा अशा काही अन्य कारणांनी वाऱ्यावर. सायंकाळी अंधारताना घराचा रस्ता जवळ करायचा. परतले की, आपापल्या कोपऱ्यांना सांभाळून सगळ्यांनी सुटेसुटे बसायचे. आईसमोर टीव्हीवरील सिरियल्स, बाबांचं ऑफिसमधील काम, मुलाचा लॅपटॉपवर सुरु असणारा सुखसंवाद, मुलीच्या हाती स्मार्टफोन विसावलेला. साऱ्यांचीच तोंडे वेगवेगळ्या दिशांना आणि डोके विज्ञाननिर्मित साधनांत. मनातल्या संवादाला प्रकटायची संधीच नाही. सगळेच स्वतःच्या कोशात गुरफटलेले. पण हरवलेल्या संवादाचं काय?

शिक्षणासाठी चांगल्या गुरूच्या शोधात वणवण भटकणारे एकलव्य पूर्वीच होते, असे नाही. ते आजही आहेत. उत्तम शिष्य घडविणारे आचार्य काल होते, तसे आजही आहेत; पण तेही व्यवस्थेच्या दावणीला बांधले गेले आहेत. एकलव्याला निदान प्रतिमेत गुरु दिसले. त्याबळावर तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. आजच्या एकलव्यांनी अशा गुरूची प्रतिमा उभी करून विद्यासंपादन करण्याचा प्रयास केला, तर त्याच्या पदरी निराशाच येईल. कारण प्रतिमेतील भक्तीभावच संपला आहे. उरला आहे फक्त आकार आणि या आकाराने काही साकार होणं तसं अवघडच आहे.

चंद्रकांत चव्हाण

••

1 comment: