कविता समजून घेताना... भाग: सहा

By
आरोप
 

तिच्या गोऱ्या उघड्या मांड्यानी
समाज बिथरलाय म्हणे!
पण
अगदी अलिकडेच ऐकलं होतं
चार महिन्याच्या बालिकेच्या मांड्यांनी
घात केला अशाच कुणा मर्दाचा
जो अजूनही शोधतोय नवे कारण
त्याच्या देहाच्या आसक्तीसाठी

सात वर्षाची चिमुरडी
'काका' म्हणते ज्याला
त्याचाही देह मजबूर होतो
तिचे निरागसत्व बघून

तेरा वर्षाची शाळकरी मुलगी
युनिफॉर्म का घालते उगाच
तिलाही पाहून तेच वाटतंय
सभ्य (?) पुरुषांना...!

माझ्या घरी समिना येते कामाला
बुरखा घालून नखशिखान्त
नालायक बाई शरीर झाकून
चेतवते रस्त्यावरल्या निष्पाप पुरूषी देहांना,
नाही का?

साडी नेसून, कुंकू लावून  
ऑफिसात जाणारी मीना पण तशीच
साली... साडीतून उतू जाते
अन् निष्पाप पुरूषांची माती होते

सलवार-कुरता, साडी किंवा असो मिनी स्कर्ट
बाईच असते चवचाल
छपरी, छचोर, छम्मकछल्लो किंवा आयटम
अश्लील बोलणारा पुरूष मात्र
ठरतो मर्द मित्रांमध्ये

पडद्याआडची राणी पद्मिनी
पाहून जो बेईमान झाला
तो अल्लाउद्दिन फिरतो हल्ली
प्रत्येक गाडीवर, सिग्नलला, शेजारी, शाळेत
अन् जोहार होतो पद्मिनीचा सगळीकडेच

पण माझ्या संवेदनशील मित्रा
तुझ्या शरीराच्या संवेदना
मेंदूच्या कह्यात हव्यात,
ज्या सांगतील योग्य जागा
योग्य भावनांसाठी

असा मर्द शिकलोय आपण
आपल्या इतिहासाच्या पुस्तकात
ज्याने कब्जात आलेली
हतबल सुभेदाराची सून
'आई' म्हणून नावाजली
पालखीत बसवून साडीचोळी करवली

त्यालाही होते मर्दाचे शरीर
अल्लादिन खिलजीसारखेच
किंबहुना त्याहूनही देखणे
पण मेंदू राजा होता,
त्या शरीराचा आणि मनाचा

म्हणूनच इतिहासाने घेतली दखल
त्याच्या अपरिमित पुरूषत्वाची

तिने स्वातंत्र्याचा अर्थ
लावला असेल तोकडा
तिच्या कपड्यांइतकाच
पण
तुझी नजर कुठे आहे लक्ष्मणासारखी
ज्याने घरातील जानकीची पावलेच पाहिली

म्हणूनच जाता जाता इतकंच सांगेन
मित्रा, तिच्या कपड्यांपेक्षा तुझं मन आवर
ते जास्त विवस्त्र आहे मेंदूच्या बंधनाशिवाय...
- नूतन योगेश शेटे
••

वास्तव कधीकधी कल्पितापेक्षा अधिक भयावह असते. मनाला कितीही कोरून पाहिले, तरी ते खरे वाटत नाही. डोळ्यांनी दिसले, तरी त्यावर विश्वास ठेवता येत नाही, पण आहे हेही नाकारता येत नाही. सत्य सूर्यापेक्षा अधिक प्रखर असते. आगीपेक्षा अधिक दाहक असते, यावर विश्वास ठेवावाच लागतो. तुम्हांला काय वाटते, हा प्रश्न येथे गौण असतो. आहे ते आणि जाणवते ते मान्य करायला मनाने नकार दिला, तरी त्याचा स्वीकार करावाच लागतो. जगाचा प्रवास कोणा एकाच्या आज्ञेने नाही होत. पण त्याचे व्यवहार सुरळीत चालावेत, म्हणून आज्ञावली तयार करून मर्यादांचे बांध घालायला लागतात. जगणं सहज, सुंदर व्हावं म्हणून आदर्शांची लहानमोठी बेटे शोधायला लागतात. संस्कारांची शिखरे उभी करायला लागतात. मूल्यपुरीत विचारांनी वर्तताना संस्कारप्रेरित प्रवास घडतो. संस्कृतिप्रणित असं काही जगण्यात सामावलेलं असतं, तेव्हा उदात्त शब्दाचे अर्थ आयुष्यात सापडतात. नैतिकतेच्या परिभाषा करून मूल्यांची अगत्याने प्रतिष्ठापना करायला लागते. तो एक प्रवास असतो तमाकडून तेजाकडे चालण्याचा.

कवयित्री बहिणाबाईनी ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ हा प्रश्न विचारून काही दशके लोटली आहेत. पण अद्याप या प्रश्नाचे उत्तर काही माणसाला मिळालेय, असं वाटत नाही. माणूस आपला वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना आकाश हरवून बसतात. आकाश अफाटपण विसरलं की, समोरची क्षितिजे खुजी होत जातात. माणूसपण संकुचित विचारांच्या वर्तुळांनी वेढलं गेलं की, त्यातील सहजपणा संपतो. स्नेह, सौहार्द, सौजन्याचा विसर पडला की, जगण्यात उच्छृंखलपणा येतो. माणूस विचारांचं प्रतीक आहे, तसा विकारांचे प्रतिबिंबही आहे. विचारांपेक्षा विकार प्रबळ होतात, तेव्हा प्रश्न अधिक जटिल होत जातात. सारासारविवेकाने विचारविश्वातून काढता पाय घेतला की, माणसं जगण्यातील सहजपण हरवून बसतात. चाकोरीतल्या वाटांचे विस्मरण माणूसपणावर अंकित झालेलं प्रश्नचिन्ह असतं.

ही कविता एक अप्रिय, पण सत्य घेऊन चालत राहते. शब्द वादळ घेऊन येतात आपल्यासोबत. उधाणलेल्या समुद्राच्या लाटांसारखे आदळत राहतात एकामागे एक. पाणी साचायला लागले की, डबके होते. वाहता-वाहता ते नितळ होतं, पण साचलं की त्याला कुजण्याचा शाप असतो. समाजातील सर्वच विचार कालसंगत अन् नीतीसंमत चाकोऱ्यातून चालत असतात, असे नाही. मर्यादांच्या रेषा पार होताना कुंपणे अधिक भक्कम करायची आवश्यकता असते. समाजाचे दैनंदिन व्यवहार सुस्थापितरित्या पार पडावेत म्हणून कधी भीतीच्या, तर कधी नीतीच्या भिंती उभ्या केल्या जातात. समाज एकतर भीतीवर चालतो किंवा नीतीवर. हे एकदा मान्य केले की, त्याप्रमाणे माणसांच्या वर्तनाचे व्यवहार ठरत जातात. स्त्री-पुरुष निसर्गाने निर्माण केलेल्या जिवांच्या केवळ जाती नाहीत. दोघांच्या सहवासातून सर्जनाचे सोहळे संपन्न होतात. जीवशास्त्राच्या परिभाषेत त्यांना प्राणी म्हणून अधोरेखित करता येईलही. ते केवळ कृतक नाहीत. तर जगण्याला अर्थ देणारे विचार आहेत. मर्यादांचे तीर धरून प्रवाह वाहत राहिले, तर आसपासचे परगणे संपन्न होतात. पण अविचाराच्या वाटेने पडणारे एक पाऊल संस्कारांची गंगोत्री प्रदूषित करतो. कोण्या मानिनीच्या जगण्याचे आयाम तिने स्वतः निर्धारित करावेत. तिचं आकाश तिने आखून घ्यावे. आपल्या पंखांवर विश्वास ठेऊन गगनाला गवसणी घालावी, पण कोणी पंखच कापून घेत असेल तर...

स्त्रीला फक्त मादी रुपात पाहिलं जातं, तेव्हा नजरेतील नितळपण हरवून विकारांचा वावर वाढतो. आकर्षण निसर्गदत्त देणगी असली, तरी संस्कृतीने तिला अनुनयाच्या वाटेने वळते केले. स्वतःच्या अनुज्ञेने स्वीकारलेल्या समर्पणाला समाजमान्य संकेतांचे अडसर नसतात. अशावेळी तो आणि ती केवळ दोन देह नाही राहत. त्यांच्या संयोगाने स्नेहाचे सोहळे संपन्न होताना नवे अनुबंध बांधले जातात. आकांक्षा अंकुरित होतात. पण अनुनयाचा अधिक्षेप करून, अनुरागाला नाकारून ती आपल्या अधिनस्थ असावी म्हणून बलाचा वापर केला जातो, तेव्हा नीतिसंकेतांचा पराभव नियतीचे अटळ अभिलेख ठरत असतात. विचारांमध्ये वासना विसावते, तेव्हा स्त्रीच्या रूपांमधलं सोज्वळ सौंदर्य संपून तिच्यातील फक्त मादी उरते. ती केवळ शारीरिक पातळीवर मोजली जायला लागली की, विचारात विकृतीचं तण वाढायला लागतं. विकृत नजरेत तिचं वय, तिचा दर्जा, तिच्या आकांक्षा, तिच्या स्वप्नांना अर्थ नसतो. त्याला फक्त वासनापूर्तीचे स्थान तिच्यात गवसत असतं. सौंदर्याच्या परिभाषा तिच्या देहाशी येऊन भिडतात, तेव्हा सुंदरतेची परिमाणे संपलेली असतात.

तिच्या असण्या-नसण्याचे संदर्भ तिच्या देहात पाहिले जातात, तेव्हा संस्कृतीने आखलेल्या चौकटींचे अर्थ हरवतात. तिने परिधान केलेल्या कपड्यांमध्ये संस्कृती शोधली जाते, तेव्हा मूल्यांचे गगन आपलं सदन हरवून बसते. स्कर्टमधून दिसणाऱ्या तिच्या मांड्यां संस्कारांचे उल्लंघन कसे ठरू शकते? देह ओरबाडण्यासाठी तिचं मादी असणं पुरेसं असतं विकृताना. तिचं वय कारण नसतंच त्यांच्यासाठी. विश्वासाने काका म्हणणारी चिमुरडी फक्त त्यांच्या नजरेत एक देह म्हणून उरते. शाळेच्या युनिफॉर्ममधील मुलगी तेच वाटायला कारण ठरते. समिना अंगभर वस्त्रे परिधान करून असते, पण वस्त्रांच्या आत असणारी समिना; समिना असतेच कुठे,  ती केवळ मादी असते. नखशिखांत शरीर झाकूनही चेतवत असते पुरुषी देहाना. मीना कुठे वेगळी आहे तिच्यापेक्षा. साडीतलं तिचं असणं उतू जाणं असतं वासनांकित नजरेत. तिच्या देहाच्या रेषा पाहून निष्पाप पुरुषांची माती होते. वेश कोणताही असो. सलवार-कुरता, साडी किंवा असो मिनी स्कर्ट ती फक्त बाईच असते. तिचा बांधा त्याच्या नजरेत आमंत्रण असते. त्यांच्या दृष्टीने ती चवचाल असू शकते किंवा छपरी, छचोर, छम्मकछल्लो किंवा आयटम, असं आणखी बरंच काही. तिच्या देहाची मापं काढणारा मात्र सौंदर्याचा पूजक असतो. अश्लील बोलणारा मित्रांमध्ये मर्द ठरतो. मर्दपणाच्या व्याख्या देहाशी निगडीत झाल्यावर नवं काय घडणार आहे?

राणी पद्मिनीचं सौंदर्य पाहून बेईमान होणारा अल्लाउद्दिन इतिहासाच्या पानांत विकृतीचे अध्याय कोरून गेला असला, तरी त्याच्या विचारांचा वारसा संपलेला नाही. तो काळाच्या अफाट प्रस्तरात हरवला असला, तरी त्याच्या वासनांकित विचारांचा वारसा चालवणाऱ्या विकृतांचा राबता रस्त्यावरच्या गाडीवर, सिग्नलला, शेजारी, शाळेत कुठेही असू शकतो. पदरापर्यंत पोहोचणारे हात सगळीकडेच सापडतील. ते परकेच असले पाहिजेत असे नाही. नात्यांचे पदर धरून येणारे आपलेही असू शकतात. वासनेच्या शिकार होणाऱ्या निष्पाप पद्मिनींच्या जिवाचा मात्र जोहार होतो. वासना, विकार, संवेदना निसर्गाची अनिवार ओढ असतील, मान्य. पण मनाच्या पलीकडे उभ्या असलेल्या मेंदूच्या आज्ञा अधिक उन्नत असतात. मनाला स्वैर संचाराचा शाप असेलही, पण त्याच्या नियंत्रणाची सूत्रे मेंदूच्या हाती असावीत. सुभेदाराची लावण्यवती स्नुषा हाती लागूनही तिच्या आरस्पानी सौंदर्याकडे बघताना तिच्यात मातेची ममता शोधणाऱ्या नजरेला मनापेक्षा मेंदूचं विकसन असायला लागतं. तिला सन्मानाने परत पाठवण्याएवढी उंची विचारांना संपादित करायला लागते. ज्यासमोर हिमालयही थिटा वाटायला लागतो. त्याही राजाला देह निसर्गानेच दिला होता. सारे मनोव्यापार देहासोबत जुळले होते; पण संस्कारांसोबत जुळलेले त्याचे विचार सौंदर्याची परिभाषा वात्सल्यात पाहत होते.

तिने स्वातंत्र्याचा अर्थ लावला असेल तिच्यापुरता. कदाचित परिधान केलेल्या कपड्यांइतकाच. तिची वेशभूषा तिचं स्वातंत्र्य असेलही. पण पाहणाऱ्याच्या नजरेत कुठे नितळपण आहे? त्याची नजर कुठे आहे लक्ष्मणासारखी परिणत, ज्याने जानकीची केवळ पावलेच पाहिली. एवढं सश्रद्ध मन अंतर्यामी भक्तीचे झरे जिवंत असल्याशिवाय आयुष्यात कसे नांदेल? नजरेत विकार असले की, आयुष्यात विखार वाढत जातो. विकारांना विचारांनी नियंत्रित करता येतं. पण वासनांचे पापुद्रे सोलून काढायला लागतात. स्वतःला खरवडून काढायला लागतं. तिने परिधान केलेले कपडे असतीलही कमी होत गेलेले. पण कपड्यांपेक्षा मन अधिक विवस्त्र असतं. कपडे देहाच्या मर्यादा दाखवतात. पण मनच विवस्त्र असेल, तर ते आयुष्याच्या मर्यादा उघड्या करतं. अशावेळी ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे....’ म्हणून मनाला उपदेश करणाऱ्या रामदासांच्या विचारांचा पराभव अटळ ठरतो. मनाला संयमाची वसने परिधान करून वावरायला लागतं. मेंदूच्या बंधनाशिवाय ते अधिक विवस्त्र असतं.

काळाच्या बदलत्या आयामांनी साकळून आणलेली मोहतुंबी सुखे मनाला सुखावत आहेत. संकुचित जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. उच्छृंखलपणाचे वारे वाहत आहेत. मनाचं आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं आहे. ‘मी’ नावाच्या संकुचित परिघाभोवती मन घिरट्या घालू लागलंय. काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि हाती विज्ञानाने दिलेली निरांजने असताना अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत आहेत? अविवेकाची सांगता करण्याची संधी सोबत असताना माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत आहेत? ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व-तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्यांच्या आकांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचे सहज रूप असतो. तो आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणे समाजाची सार्वकालिक आवश्यकता असते. तो समजून घ्यावा लागतो. त्यासाठी आपणच आपल्याला आधी तपासून पाहावे लागते. मनावर साचलेल्या धुळीचे थर पुसून काढावे लागतात, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

1 comment: