कविता समजून घेताना... भाग: सात

By

 सिस्टरीनबाई

सिस्टरीनबाई पोलिओ, गव्हार
आणि धनुर्वातबरोबरच
एक थेंब बुद्ध, एक थेंब महावीर
आणि जमलंच तर एक थेंब पैगंबरही
द्या माझ्या पोराला
कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला

बाळंतपणाच्या आधीच मी माझ्या आईला बोलले
पोराला पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळ
बाकीच्या कुठल्याच रंगाचा आत्ता भरवसा नाय आपल्याला
जातीच्या नावापेक्षा मातीशी नाळ जोडावी माझ्या पोराची
म्हणून नामदेवाच्या वाटीतलं तूप,
तुकारामाच्या ऊसाचा रस,
मौलवीच्या ईदची खीरही पाजली बटाबटा

तरीही वजन कमीच भरलं माझ्या पोराचं
बहुतेक वजनाचं कारण
भजनच असावं तुकोबाचं
संचारबंदीमुळं कीर्तन-भजनंच झाली नाहीत
दंगलीच्या काळात
चार ओव्या, चार भारुडं ऐकली असती
तर मेंदूचं वजन वाढलं असतं थोडं

पण काळजी करू नका सिस्टरीनबाई
फुल्यांच्या सावित्रीला सांगितलंय मी
रोज तुझ्या हौदाचं पाणी गरम करून
चोळून जात जा माझ्या पोराला
धर्माबिर्माचा विषाणू डसूच नये
म्हणून हल्ली न चुकता सकाळचं पसायदान
दुपारचं दास कॅपिटल आणि लयंच रडलं पोरगं
तर संविधानाचं पान देते मी चघळायला

जातीची गटारं तुंबायला लागली
की तापाची साथच येते आमच्या वस्तीत
तेव्हा कपाळावर पट्टीच ठेवते मी
चवदार तळ्याच्या पाण्यात बुडवून
सिस्टरीनबाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगते
गरोदरपणा परीस जातीच्या कळा लई वाईट बघा

म्हणून निरोप द्या माझा
जन्माचा दाखला लिवणाऱ्या साहिबला
धर्म आणि जात यांचा रकाना
रिकामाच सोड म्हणावं त्याला
कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला

- उमेश बापूसाहेब सुतार, कोल्हापूर
*

जीवसृष्टीचा इतिहास उत्क्रांतीचा आहे. माणूस आपला इतिहास क्रांतीचाही असल्याचे म्हणतो. पण तो क्रांतीपेक्षा क्रौर्याचाच अधिक असल्याचे इतिहासाच्या पानात थोडं डोकावून पाहिलं तरी कळतं. विश्वाला सुंदर करण्याच्या वार्ता कित्येक वर्षापासून तो करतो आहे. पण वास्तव हेही आहे की, त्याला ना शांतता प्रस्थापित करता आली, ना निखळ सत्याचा ठाव घेता आला. इतिहास कधी शांततेचा राहिला आहे? कधी धर्माच्या, कधी जातीच्या, कधी वंशाच्या नावाने तो रक्तरंजित होत राहिला आहे. हाती लागलेल्या काळाच्या तुकड्यात संत, महात्म्यांनी, प्रेषितांनी जगाला नंदनवन करण्याची स्वप्ने पाहिली. प्रयत्न करून पाहिले. पण ना ते उभे राहिले, ना उभे राहत आहे, ना उभे करण्यासाठी सहकार्याचे हात साखळ्या बनून जुळत आहेत. माणूस चंद्रावर जावून आला. मंगळावर त्याची याने घिरट्या घालत आहेत. पण त्याच्या मनापर्यंत काही विज्ञानाला पोहचता आलं नाहीये. तो बदलला आहे असे दिसत नाही. कंठशोष करून शांततेचे महत्त्व माणूस माणसाला सांगत असला, तरी शांतीच्या परिभाषा काही त्याच्याकडून लेखांकित होत नाहीयेत.

जगात नैसर्गिक आपत्तींनी जेवढी माणसे मारली गेली नसतील, तेवढी धर्मकारणाने झालेल्या कलहाने मारली गेल्याचे इतिहासाने नमूद करून ठेवले आहे. पण ऐकतो कोण? प्रगतीच्या पाऊलखुणा गोंदवत पुढे पळणाऱ्या जगाला वेदनांचे अर्थ खरंच कळत नसतील का? की उन्मादाच्या व्याख्या पाठ असणाऱ्यांना कारुण्याची सूत्रे आकळत नसतील? सहकार्यासाठी पुढे पडलेल्या एक पावलात सुख नांदते ठेवण्याएवढं सामर्थ्य सामावलं आहे. पण पहिलं पाऊल उचलायचं कुणी? धर्म, जात, वंशश्रेष्ठत्वाची वर्तुळे भोवती आखून घेतली की, विचार आंधळे होतात. हे आंधळेपण माणूस आंधळेपणाने मिरवतो आहे का? कधी क्रुसेडस्, कधी जिहादसाठी, तर कधी धर्मरक्षणार्थ अवतारकार्य हाती घेण्याचे आश्वस्त करतो आहे. नव्या युगाला धरतीवर अधिष्ठित करण्याच्या वल्गना करतो आहे. पण युगांना आकार देणारा विचार काही त्याला गवसत नाहीये. युगप्रवर्तक बनण्याच्या नादात युगानुयुगे तो जटिल प्रश्नांना जन्म देतो आहे.

विस्कटलेला वर्तमान पाहून संवेदनशील मनात अस्वस्थ तगमग वाढत आहे. सगळीकडेच एक अनामिक अस्वस्थता नांदते आहे. होरपळ माणसांची नियती झाली आहे. जगणं आत्मकेंद्री झालं की, सज्जनांचे सामर्थ्य विकलांग होते. सामर्थ्याला स्वार्थाच्या वर्तुळांनी वेढल्यावर प्रतीत होणारी प्रतिबिंबे केवळ आकृत्यांपुरती उरतात. देहाचं आंधळेपण निसर्गशरण अगतिकता असेल; पण डोळ्यांवर स्वार्थाच्या पट्ट्या बांधून अंधाराची सोबत स्वीकारली असेल, तर दोष उजेडाचा असू शकत नाही. ही कविता अविचाराच्या अंधाराकडे लक्ष वेधत आपणच आपल्याला खरवडून काढते. माणूस माणसापासून सुटत चालला आहे. जोडून ठेवणारा एकेक सांधा निखळतो आहे. आज बदलता येत नाहीये. निदान येणारा उद्या उज्ज्वल विचारांनी घडवता येईल, या विश्वासाने मनातील व्यथा मांडती झाली आहे. मातृत्वाच्या मार्गावर कोण्या मानिनीची पाऊलं पडत आहेत. सर्जनाचा हा सोहळा निसर्गाने सजीवांना बहाल केलेला सर्वोच्च आनंदाचा क्षण. पण आनंदच विवंचनेचं कारण बनतो, तेव्हा प्रश्न समोर उभा राहतो, आपण खरंच उत्क्रांतीच्या वाटेने चालत आलेलो परिणत जीव आहोत का?

निसर्गाकडून येणाऱ्या आजारांचा प्रतिबंध कुठल्याश्या औषधाने करता येतो, पण अविचारांसाठी अजून तरी औषध शोधता आलं नाही. हिंसा माणसाच्या आत असलेल्या पशुत्वाचा प्रवास असेल, तर अहिंसा प्रतिवाद आहे, माणूस घडवण्यासाठी. भगवान बुद्ध, भगवान महावीर, प्रेषित मोहमद पैगंबर मानव्याची, कारुण्याची सार्वकालिक सर्जनशील रूपे आहेत, माणसाला माणूस करू पाहणारी. महात्म्यांची ही मांदियाळी स्मृतीरूपाने सोबत करूनही, त्यांनी दाखवलेल्या रस्त्याला जगण्याचा मार्ग का करता आलं नसेल आपल्याला? हिंसेने केवळ जीव जातात, पण अहिंसेची स्पंदने घेऊन प्रकटणारे प्रत्येक पळ विश्वाला चैतन्य प्रदान करतात. जात, धर्म, वंशाच्या बेगडी अस्मितांनी भाकरीच्या परिघाभोवती पोट घेऊन फिरणाऱ्या माणसांच्या जगण्यात अनेक प्रश्न उभे केले आहेत. माणसांना कृतक करणाऱ्या अभिनिवेशांच्या विषाणूपासून जग सुरक्षित राखायचं असेल, तर सर्वांभूती ममत्व आणि सर्वांप्रती समत्वदर्शी संवादापेक्षा अधिक सुंदर विचार आणखी काय असू शकतो?

सृष्टी अनेक रंगानी सजलेली. तिचे विभ्रम मनांना सतत संमोहित करत आले आहेत. क्षितिजाला उजळीत येणाऱ्या सूर्याच्या पहिल्या किरणांवर कोणाची मालकी नाही. पश्चिम क्षितिजावर पसरणारी लालिमा कोणाची खाजगी जागीर नाही. झाडापानाफुलांचे रंग कोणाच्या आज्ञेने आनंदाची पखरण करीत नसतात. इंद्रधनुष्याचे रंग काही अद्याप कोणाला खरेदी करता आले नाहीत. पण माणसांनी रंगांना आपल्या मालकीची लेबले लावण्यात धन्यता मानली. लाल, पिवळा, हिरवा, केशरी, निळा, भगवा आदि रंगांवर आपल्या बेगडी अस्मितांच्या रंगांचं लेपण करून सीमित केलं. रंगांवरून जातीच्या व्याख्या अन् धर्माच्या परिभाषा अधोरेखित होऊ लागल्या अन् रंगांचं स्वभाविक असणं हरवलं. निदान अजूनतरी पांढऱ्या रंगावर आपल्या संकुचित अस्मितेचा रंग टाकून कोणी अधिकार सांगितला नाही. सध्यातरी शांततेची गाणी गात तो माणसांना साद घालतो आहे. कदाचित उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा आधार म्हणून हा रंग असेल का? म्हणून की काय पांढऱ्या कापडात आपल्या बाळाला गुंडाळण्यास ती सांगतेय. अन्य रंगांवर विश्वास करावा, असं काही राहिलं नाही. त्याचं नातं चौकटीत गोठवलेल्या मतांशी आहे. मातीपासून ती कधीचीच दुरावली आहेत. म्हणून मुलाला मातीच्या गंधाचा स्पर्श व्हायचा असेल, तर तो माणसांच्या मोहात पडणारा असावा. माणसांनी निर्मिलेल्या संकुचित विचारांच्या समर्थनात नाही. त्यासाठीच नामदेवाच्या वाटीतल्या तुपाची चव त्याला सर्व प्राणीमात्राप्रती ममत्वाचा प्रत्यय देणारी वाटावी. तुकारामाच्या उसाचा गोडवा त्याला समष्टीत सापडावा. मौलवीच्या ईदची खीर त्याला भेदांच्या भिंतींपलीकडे माणुसकी असते आणि ती जाणीवपूर्वक जपावी लागते, हे सांगणारी असावी असे वाटते. भजन-कीर्तन, ओव्या, भारुड ही संचिते संस्कारांची गंगोत्री आहेत. त्यातून नुसता इतिहास वाहत नाही, तर जगाला सुंदर करणारा विचार वाहतो आहे. माणसाने ती ऐकून आचरणात आणली असती तर...

वंचितांच्या वेदनांचा अर्थ शोधणाऱ्या जोतीबा-सावित्रीच्या हौदातल्या पाण्याने माणसा-माणसात ओढलेल्या विषमतेच्या रेषा धुवून काढता येतीलही. पण मनांवर ओढलेल्या रेषांचे ओरखडे मिटवणारे स्त्रोत कुठून शोधावेत? धर्माचा विषाणू डसू नये म्हणून प्रयत्न झाले, नाही असे नाही. सगळेच धर्म सहकार्य, सहिष्णुता, स्नेह हीच माणसाची सार्वकालिक श्रीमंती असल्याचे सांगत आलेत. पण माणूस मूळचा आहे तोच आहे. तो काही बदलायला तयार नाही. जगाच्या प्रवासाच्या उद्याच्या वाटा उजळायच्या असतील, तर आजचा अंधार पार करीत निघावं लागेल, हाती आस्थेच्या पणत्या घेऊन. पसायदान, दास कॅपिटल, संविधानाचे तेवते दीप पावलापुरता प्रकाश द्यायला हाती आहेत, फक्त त्यांचे कवडसे अंतर्यामी पोहचायला हवेत. जातीची गटारं तुंबायला अविचारांचा कचरा साचल्याचे कारण पुरेसे असते. जगणं जातीभोवती प्रदक्षिणा करायला लागलं की, प्रगतीचे परीघ हरवतात. स्वप्नात विलसणारी क्षितिजे परकी होतात. प्रत्येकाचे अहं टोकदार होतात. कोणी रोटीचे, कोणी बेटीचे व्यवहार आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मांडतो. जातीसाठी माती खाणारे अनेक अश्राप आयुष्यांची माती करतात. कुणी गावातून कोपऱ्यावर ढकलला जातो. कुणी गावकुसाबाहेर हाकलला जातो. तर कुणी गावाच्या परिघाबाहेर फेकला जातो.

विषमतेच्या तणकटाचा समूळ विच्छेद करायचा, तर त्याच्या मुळांचा आधी विचार करायला लागतो. चवदार तळ्याच्या घोटभर पाण्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांची युगानुयुगाची तहान शमवण्याचा प्रयत्न केला. पाणी मुक्त झाले, पण मनांच्या मुक्तीसाठी कोणता सत्याग्रह करायला हवा? गरोदरपणाच्या कळांपेक्षा जातीच्या कळा वाईट. प्रसववेदनांच्या पोटी अपत्यप्राप्ती आहे, पण जातीच्या वेदनांच्या पोटी फक्त कळा आहेत. म्हणून आपल्या अपत्याच्या जन्मदाखल्यावर धर्म, जात निर्देशित करणारे रकाने रिक्त सोडण्याची विनंती ही मानिनी करते आहे. कोणी कोणता धर्म स्वीकारावा, कोणती जात निवडावी, कोणत्या विचारप्रणाली अंगीकाराव्या, हे त्याचं स्वातंत्र्य असावं. इहलोकी जन्माला आलेला जीव स्वतंत्र असेल, तर कुणीतरी मूठभरांनी प्रमाणित केलेल्या तंत्राने जगण्याची सूत्रे का तयार करावीत? धर्माशिवाय अन् जातीविना जगणे विज्ञानप्रणीत जगात असंभव आहे का?

नीतिहीन महात्म्याच्या दिवसाचं महत्त्व वाढत आहे. सगळीकडे संवेदनाशून्य गुंता वाढत चालला आहे. माणसाचं मन साऱ्या व्यवहारांचं केंद्र असतं. मनाचं नातं मनाशी असावंच, पण त्याची सोयरिक मेंदूशी असावी. मेंदू बटिक झाला की, पहिला बळी जातो स्वातंत्र्याचा. माणसाचा अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंतचा प्रवास प्रगतीची यशोगाथा आहे. प्रगतीची मिरास त्याच्या पदरी आहे. पण त्याच्या अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांचं काय? त्याकडे असणाऱ्या मनाचं काय? मोठमोठ्या जयांचा धनी असलेल्या माणसाला जगणं संकुचित करणाऱ्या विचारांवर अद्याप नियंत्रण का मिळवता आले नसेल? वानराचा नर आणि नराचा नारायण होणे जिवांचं निसर्गनिर्मित प्राक्तन असतं. जगण्याचे स्वार्थपरायण, स्वयंकेंद्रित गुंते पाहताना मनात नकळत एक शंका येते, माणसाचा प्रवास उत्क्रांतीच्या उलट्याक्रमाने तर नाही होतये?
- चंद्रकांत चव्हाण
**

3 comments: