कुंपण
लोखंडी काटेरी तारांच्या कुंपणात
कित्येकदा सुरक्षित असणारी ती
कुंपणातच रांगते, बागडते
बनून राहते कैदी कुंपणाची
जेव्हा वयात येते
तेव्हा होते डोईजड ती
म्हणूनच कित्येकवेळा
पडतात डोईवर अक्षदा
अन् बांधून दिले जाते
कोणाच्यातरी दावणीला
सुटत जाते एक कुंपण अन्
होते दुसऱ्या कुंपणात रवानगी
फरक काय तो एवढाच
कैदी तीच राहते
भोगाचा सदरा बदलतो भोगवटा नाही
बदलत राहते फक्त कुंपणाचे वर्तुळ
नवीन कुंपणात गुंफेत ती
स्वच्छंदपणे गगनात उडण्याची स्वप्ने पाहते
जी तिला पाहायला मिळालीच नव्हती कधी
पण होतो राजरोस चुराडा स्वप्नांचा
रोजच्या एकसुरी जगण्याला कंटाळून
जेव्हा ती लांघू पाहते
ही काटेरी नात्यांच्या लक्ष्मणरेषा
गळ्यात काळेमणी घालून निर्धास्तपणे
तेव्हा ती पुन्हा होते रक्तबंबाळ
ह्या नवीन कुंपणाच्या काटेरी तारांनी
बये,
फक्त कुंपणच बदललंय गं
काटेरी तारा तर त्याच आहेत
- प्रज्ञा सुधाकर भोसले
*
बाईचा जन्म नको घालू शिरीहरी
रातन् दिस पुरुषाची ताबेदारी
लोकगीताच्या या ओळी कधीतरी वाचल्याचे आठवतेय. परंपरेने पदरी दिलेल्या चौकटीत आयुष्याचे अर्थ शोधतांना आलेल्या अनुभवातून कोण्यातरी विकल मनाने ही खंत व्यक्त केली असावी. जग नियतीने निर्माण केले; पण पुरुषाने त्यावर स्वामित्व मिळवले. त्याच्या सत्तेवर आणि मत्तेवर चालणाऱ्या जगात बाई म्हणून वाट्याला येणाऱ्या वेदनांची गीता आहे हे गीत. पुरुषीसत्तेच्या महाकाय भिंतीनी तिला बंदिस्त केले. ध्वस्त करण्याचा प्रयत्न करून त्यांचा एक टवकाही उडवता आला नाही. सगळं काही करून परिस्थितीत तसूभरही बदल घडणं शक्य नसल्याने, मनातला सल लोकगीताचे किनारे धरून वाहत राहिला असावा. वाहता वाहता पाणी शुद्ध होते, तसा तो होऊ शकला नाही. वर्षे सरत गेली; पण ना समजून घेणारा कोणी सहृदय तिला भेटला असावा. ना तिच्या आयुष्यात आनंदाचा कवडसा आला असावा. अखेर ज्याने हे भागधेय लेखांकित केले, त्यालाच का म्हणून विचारू नये, या भावनेतून प्रकटलेलं हे दुःख असावं.
आजही स्त्रीच्या आयुष्याच्या चित्रात फार क्रांतिकारक वगैरे बदल झाले आहेत असं नाही. हा विपर्यास नाही का? प्रगतीच्या वाटांवरून चालत आपण खूप पुढे आलो, पण विचारांनी किती पावलं पुढे सरकलो? माणूस परिस्थितीचा निर्माता नाही होऊ शकत हे मान्य; पण परिवर्तन करणारा प्रेषित अवश्य होऊ शकतो. याचं भान किती जपलं? आखून दिलेल्या चाकोरीत ती निमूटपणे चालते आहे. ठरवलेल्या चौकटी आणि ओढून दिलेल्या मर्यादांच्या रेषा, हेच आपले भागधेय मानून आयुष्याचे नव्याने अर्थ शोधते आहे. अर्थात ते हाती लागतीलच असे नाही. व्यवस्थेच्या भिंतींवर डोके आदळूनही फार काही घडत नाही. नियतीलाही ते बदलता येत नाहीत, म्हणून कोणातरी पुरुषाची अंकित होऊन जगणे क्रमप्राप्त, या विचाराने वर्तते आहे. विचारांना परंपरांचा पायबंद पडला की, शृंखला विखंडित करणं कठीण. आयुष्याच्या कोणत्याही स्थितीत ती असली तरी पिता, पती, पुत्र या पुरुषी नात्यांशिवाय तिच्या जीवनाला गतीच नाही अन् त्यावाचून प्रगतीही नाही, हा विचार व्यवस्थेने वर्षानुवर्षे रुजवला. ती आश्रित राहण्याची कोणतीही संधी हातून जावू दिली नाही.
स्त्रीच्या आयुष्याच्या वेदनेला घेऊन ही कविता सरकत राहते मनाच्या प्रतलावरून, विचारांची वादळे पेरत. तिच्या नशिबी असणाऱ्या भोगांचा कातर स्वर कवितेच्या आशयाला उंचीवर नेतो. स्त्रीजन्माच्या वेदनांना शब्दांकित करणारी ही कविता शब्दांचं अवडंबर न करता तिच्या भळभळत्या जखमांसोबत वाहत राहते, मनात एक अस्वस्थपण जागवत.
काळ गतीची चाके पायाला बांधून पुढे पळत असतो. वाहत राहतो आपलेच किनारे धरून. त्याच्या वाहण्याला बांध घालता नाही येत. बदल ही एक गोष्ट अशी आहे, जी कधीही बदलत नाही. काळ काही कोणासाठी थांबायचं सौजन्य दाखवत नाही अन् बदल काही कोणाची प्रतीक्षा करत नाही. त्यांना टाळून मुक्कामाची ठिकाणेही कुणाला गाठता येत नाहीत. बदलांना सामोरे जाणे क्रमप्राप्त. पण बहुदा बरकतीची गणिते आखताना काही प्राधान्यक्रम ठरवले जातात. फायद्याचा परीघ संकुचित करणाऱ्या गोष्टींकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं जातं. अर्थात, असे करण्यातही कुणाचातरी स्वार्थ असतोच. काळाचा कोणताही तुकडा यास अपवाद नसतो. वाट्याला आलेल्या तुकड्यात प्रत्येकाच्या आयुष्याची सूत्रे सामावलेली असतात. ती वैयक्तिक असतात, तशी सामुहिकही असतात. नियतीने हाती दिलेल्या तुकड्यांना घेऊन आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी मार्ग मात्र स्वतःच निवडायला लागतात. काहींसाठी परिस्थिती पायघड्या घालून स्वागताला उभी असते, काहींच्या वाटा वैराण असतात, एवढाच काय तो फरक.
लेकीच्या जन्माचं स्वागत वगैरे गोष्टी कितीही सुंदर वाटत असल्या, तरी तिच्या जगण्याला आयुष्यभर सुंदरतेचे परिमाण लाभेलच असे नाही. कन्येच्या जन्माने आनंदित होणारे अनेक असतीलही, पण तिला तिच्या तंत्राने जगण्याचे स्वातंत्र्य उमद्या मनाने देणारे किती असतात? तिच्या आयुष्याला वेटोळे घालून बसलेल्या बंधनाचे पाश सैल करण्यासाठी पुढे येणारे आहेत, नाही असे नाही; पण त्यातून मुक्तीचा मार्ग काढणारे किती असतील? आयुष्याच्या कोणत्या पडावावर स्त्री स्वतंत्र असते? तिच्या आयुष्याची फक्त अवस्थांतरे होत असतात. वेदनांची अंतरे कुठे कमी होतात? मनी विलसणाऱ्या चांदण्यात नाहत, वाऱ्याशी गुजगोष्टी करीत, आकाशातल्या चमचमणाऱ्या चांदण्यांना वाकुल्या दाखवत आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत जगणं किती जणींच्या नशिबी असतं? एक शैशवावस्थेचा काळ तिच्या आयुष्यातून वजा केला तर, तिच्या जगण्यात शून्यच सामावलेलं आहे, विश्वाची पोकळी व्यापून काकणभर शिल्लक उरणारं. दिसामासांनी ती वाढायला लागते, तसा तिच्याभोवती असणाऱ्या शून्याचा विस्तार होत जातो. आकांक्षाना बंदिस्त करणाऱ्या भिंतींची उंची वाढत जाते. त्या अधिक भक्कम होत राहतात. आपण उभ्या केलेल्या कैदखाण्यात तिचे श्वास गुदमरत आहेत, याची जाणीव व्यवस्थाप्रणीत परंपरांना प्रमाण मानणाऱ्यांना असते का? आभाळ पंखावर घेण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पाखराच्या पंखांमधून उमेद काढून आकाश आंदण देण्याच्या गोष्टी करत विहारासाठी नव्या दिशा दाखवाव्यात, असं काहीसं घडतं. आश्वस्त करणारी अभिवचने देऊन भोवती उभी केलेली कुंपणे स्वप्नात वसतीला आलेल्या क्षितिजांना कशी काय साकळून आणतील? कुंपणांना समाजमान्य प्रतिष्ठा प्राप्त होते, तेव्हा स्वातंत्र्याचे सूर हरवतात. जगण्याची गाणी बेसूर होतात.
यौवनात पदार्पण करताना कुंपणांचे काटे अधिक टोकदार होतात. वयात येणे जणू तिच्यासाठी अवघड प्रश्न असतो. तिच्या आयुष्याच्या चौकटींना सीमांकित केलेल्या तुकड्यात अधिष्ठित करण्याच्या प्रयासांवर व्यवस्थापुरस्कृत मान्यतेची मोहर उमटवली जाते. तिच्या मार्गावर घातलेले मर्यादांचे बांध मापदंड ठरतात तिच्या जगण्याचे. जगण्याचा वेग अवरोधीत करणाऱ्या वाटा तिच्या आयुष्यातल्या चैतन्याच्या खळाळत्या प्रवाहांचा प्रवास संपवतात. तिच्या निसर्गसुलभ असण्याला नियंत्रित करण्यात धन्यता मानली जाते. मनात गोंदलेल्या वाटेने चालण्याचा प्रयत्न केला, की ती उच्छृंखल ठरते. देखणेपण तिच्यासाठी अपराध ठरू शकतो. वाढतं वय तिच्या आप्तांसाठी चिंतेचा विषय बनतो. आपल्यांनाच तिचं ओझं वाटू लागतं. सप्तपदीच्या वाटेने चालत उंबरठ्याचं माप ओलांडल्याशिवाय तिच्या असण्याला पूर्तता नाहीच. उफाळती आग घरात कशी सांभाळायची? धगधगता निखारा पदरी का बांधून घ्यायचा? उधाणलेला वारा कोंडता कसा येईल? यापेक्षा तिला उजवून टाकणे सगळ्यांनाच श्रेयस्कर वाटायला लागते. तिची स्वप्ने, तिच्या मनाची मनोगते अशावेळी गौण ठरतात. कन्यादानाचे उत्तरदायित्त्व पार पडले की, आयुष्याचे सार्थक. खरंतर कन्या काही वस्तू नाही दान म्हणून कोणाच्या झोळीत टाकून द्यायला. पण पुण्यसंचयाच्या यादीत दान म्हणून तिचा समावेश करून व्यवस्थेने तिचं वस्तूकरण केलं. एक वस्तूचं मोल आणखी दुसरं काय असू शकतं? दानाच्या समाजमान्य संकल्पनेने तिच्या मनात अधिवास करून असलेलं आकांक्षांचं आभाळच काढून घेण्याचा पद्धतशीर प्रयोग केला जातो.
विवाह तिच्या आयुष्याला नवे आयाम देणारा निर्णय, पण यात ती असतेच किती? गायीला कुणाच्या दावणीला बांधले तरी ती काही ओरडून, हंबरून तक्रार नाही करत. परंपरेच्या खुंट्याला बांधण्याची दावीच एवढी भक्कम असतात की, त्यांना तोडायचा प्रयत्न करून फारसे काही हाती लागण्याची शक्यताच नसते. तिचे फक्त स्थानांतर होते, स्थित्यंतर नाहीच. एक कुंपणाचे वर्तुळ तेवढे बदलते. काट्यांची टोके कुठे सुटतात. आयुष्यातले भोग काही सुटत नाहीत. पिंजरा बदलला म्हणून कैद असण्याचे अर्थ बदलतातच असं नाही. आयुष्याच्या एका अध्यायाचे पाने उलटतात. दुसरा लिहिला जातो, एवढाच काय तो फरक. पानांवर सुखं अधोरेखित करणारी समाधानाची विरामचिन्हे असतातच कोठे? एक कुंपण सुटले, दुसरे नवे आले, इतकाच काय तो बदल. पण जखमांची ठसठस तीच असते. वेदनांची परिभाषा आहे तीच कायम असते.
मनी विलसणाऱ्या स्वप्नांची सुखचित्रे ती रेखाटत राहते. पण स्वप्ने स्वप्नेच राहतात, त्यांना वास्तवाचा स्पर्श कधी घडत नाही. जणू ती खुडून फेकण्यासाठीच असतात की काय? मनात कोरून घेतलेल्या संकल्पित सुखांचे एकेक तुकडे होत राहतात. सर्वबाजूंनी दुभंगत असताना अभंग राखण्याचा प्रयत्न करते ती. चाकोरीत चालणाऱ्या आयुष्याला मोहरलेपण देण्यासाठी झटत राहते, झगडत राहते आपणच आपल्याशी अन् अस्मितेवर होणाऱ्या आघातांशी. अपेक्षाभंगाचं दुःख पदरी बांधून खेळत राहते निखाऱ्यांशी. कूस बदलून अंगणी येणाऱ्या ऋतूंची वाट पाहत परिस्थितीच्या झळा झेलत राहते. कधी लांघू पाहते मर्यादांच्या नकोशा वर्तुळांना. खेळत राहते रुढींच्या टोकदार काट्यांशी, जखमा झेलत. पण हेही इतके सहज कोठे असते? परंपरेचा पायबंद पडलेल्या परिघात प्रदक्षिणेशिवाय तिच्या हाती काही लागत नाही. लक्ष्मणाला रेषा ओढून स्त्रीच्या मर्यादा रेखांकित करता आल्या. कदाचित तो परिस्थितीजन्य विकल्प असेल; पण सीतेच्या आयुष्यात आलेल्या अगतिकतेच्या अध्यायांचे काय? आज रामायण नसेल, पण मर्यादांच्या कहाण्या मात्र चिरंजीव आहेत. भले त्यांची रूपं बदलली असतील, पण अर्थ तेच राहिले आहेत.
परवशतेचे पाश पडले असतील, तेथे आकाश विहरायला वाट्यास येणे कठीणच. स्त्रीचे वस्तूकरण करून तिच्यावर मालकी सांगणारा विचार परंपरेने विणून ठेवला असल्याने त्याचा पीळ इतक्या लवकर सैल होणे अवघड. फलस्वरूप पुरुषाची मालकी सांगणाऱ्या निशाण्या स्वच्छेने म्हणा किंवा परंपरेने दिल्यात म्हणून किंवा आणखी कोठल्या कारणाने असतील, आजही ती मिरवत असेल का? तिच्या आयुष्याचे परीघ सीमांकित करणारी हीसुद्धा कुंपणेचं नाहीत का? स्त्री म्हणून जगण्याची समाजमान्य सूत्रे वर्षानुवर्षे तिच्या मनात रुजवली जात असतील, तर प्रतिकाराची मूळं विस्तारण्यासाठी अवकाश मिळतेच किती? परंपरेने दिलेली बंधने स्वीकारावीत किंवा नाकारावीत, हा वैयक्तिक प्रश्न. पण बंधनं मिरवण्यातच समाज धन्यता मानत असेल तर... कुंपणे कायम राहतात, त्यांचे काटेही अबाधित असतात तसेच. वर्तुळे तेवढी बदलतात, म्हणून जखमांच्या परिभाषा अन् वेदनांचे अर्थ बदलतातच असे नाही, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
**
आभार!
ReplyDelete