बाईचं सौभाग्य
पहिलं न्हाणं आलं तेव्हा
आईनं घेतली होती भुई सारवून हिरव्यागार शेणानं
पोतरली होती चूल गढीच्या
पांढऱ्या मातीनं
अन्
पाटावर बसवून घातली होती डोक्यावरून आंघोळ
पाच सवाष्णी बोलवून भरली होती खणानारळाने ओटी
पोर वयात आल्याचा आनंद
तिच्या चेहऱ्यावर मावत नव्हता
आणि
आज आरश्यात बघितले की
पांढरं आभाळ चिरत जातं खोलवर काळीज
मळवटभरली बाई जाताना बघितली
भरदुपारी देवदर्शनाला की,
तिला बघून केवढा आनंद वाटायचा तेव्हा
आता लांबूनच देते मी तिला मनोमन आशीर्वाद
अन् माझी पडू नाही सावली तिच्यावर
म्हणून दूरूनच करते वाकडी वाट
आई म्हणायची,
बाईनं मुंड्या हातानं अन्
रिकाम्या कपाळानं करू नाही स्वयंपाकपाणी
पारोश्या अंगाने वावरू नाही घरभर
हीच सांगावांगी पुढे नेत मीही घालते आता
माझ्या पोरींना हातात बांगड्या अन्
रेखते कपाळावर लाल रंग
शेताच्या बांधावरून जाताना हात जोडून म्हणते
साती आसरांना,
येऊ नाही आपल्या वाट्याचं लिखित
लेकीबाळीच्या वाट्याला..
अर्चना डावखर-शिंदे
*
‘बाई’ या शब्दात अर्थाचे अनेक आयाम अनुस्यूत आहेत. ते सहज आहेत. जटिल आहेत. आकलनसुलभ आहेत, तेवढेच अवघडही आहेत. तर्कसंगत आहेत, तसे विसंगत आहेत. या नावाभोवती विस्मयाचे वलय आहे, तशी वैषम्याची वर्तुळे आहेत. कुतूहल आहे. कौतुक आहे. संदेह आहे, तसा स्नेह आहे. अपेक्षा आहे, तशी उपेक्षा आहे. वंदन आहे, तशी वंचनाही आहे. खरंतर परस्पर विरोधी अर्थांचे अनाकलीय गुंते तिच्या असण्या-नसण्याभोवती काळाच्या वाहत्या प्रवाहाने आणून गुंफले आहेत. नकाराचा हा काळा आणि स्वीकाराचा तो पांढरा, अशी टोकाची विभागणीही त्यात आहे. आहे आणि नाही या बिंदूंना जोडणाऱ्या संधीरेषेवर असणारा रंगही त्यात आहे. ‘बाई’ या शब्दाला परंपरेने सुघड, अवघड करता येईल तेवढे केलेच; पण त्याभोवती मर्यादांची वर्तुळे आखण्यात कोणतीही कसर राहू दिली नाही. संस्कृतीने तिच्या सामर्थ्याचे गोडवे गायले. तिच्या विजिगीषू वृत्तीचा सन्मान केला, तसे तिच्यातील ‘ती’ असण्याला गृहीत धरले आहे.
प्रज्ञेच्या वाटेने पडणारी पावले चिकित्सक विचारांच्या दिशेने प्रवास करायला प्रेरित करतात. मनात उदित होणाऱ्या कुतुहलातून माणसाने अनेक ज्ञात-अज्ञात परगण्यांचा धांडोळा घेत त्यांना मौलिकता प्रदान केली. पण जिच्या अस्तित्वाने त्याच्या अंगणात आनंद अवतीर्ण होऊ शकतो, तिला समजून घेण्यास तो कमी पडला, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. त्याच्याइतकंच तिचंही अस्तित्व नांदतं असूनही, केवळ तिचं देहाने वेगळं असणं पुरुषपणाला अस्वस्थ करीत राहिलं असावं. खरंतर आताही त्याच्या विचारांच्या वर्तुळात फार क्रांतिकारक वगैरे बदल झाले आहेत असे नाही. तिच्याठायी असणारे सर्जन तिचं सामर्थ्य सिद्ध करायला पुरेसे आहे. म्हणूनच की काय, तिच्याशी तुलना करताना पुरुष स्वतःला संभ्रमाच्या सीमारेषेवर शोधतो आहे. या संदेहामुळेच तिच्या आकांक्षांचे आकाश सीमांकित करण्याची कोणतीही संधी त्याने हातची जावू दिली नाही. तिच्याकडे निसर्गदत्त सर्जनक्षमता आहे, तशी मातीच्या उदरातून अंकुरित होणाऱ्या निर्माणाला वास्तवात आणण्याची कल्पकताही. म्हणूनच माता आणि मातीचं सामर्थ्य त्याला अचंबित करीत आलं असावं. तिच्या निर्मितीत प्रसाद, माधुर्य, ओज एकवटलं आहे. अंकुराला रूजवण्याचं सामर्थ्य निसर्गाने केवळ तिच्याठायी पेरले. म्हणूनच की काय तिच्याभोवती एक अनामिक गूढ नांदते राहिले आहे. आयुष्याचे अर्थ तिच्या असण्याशिवाय आकळत नाहीत. तिचं असणं हेच एक निर्मितीचे कारण असते. ती नांदी असते आयुष्याला नवे आयाम देणारी.
मातृत्वाच्या पथावर पडणाऱ्या पावलांच्या आणि त्याचं सुतोवाच करणाऱ्या खुणांचा अर्थ कवयित्री या कवितेतून शोधतात. भविष्याच्या पटलावर कोरल्या जाणाऱ्या निर्माणाचा अन् त्यातून उगवून येणाऱ्या सातत्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात. बाईच्या जगण्याला पूर्णत्व देणारा क्षण संवेदनशील अंत:करणाने शब्दांकित करतात. परंपरेच्या चौकटीत कोरलेल्या संकेतांनी ‘बाईपण’ समजून घेतात. नियतीने म्हणा किंवा निसर्गाने, काहीही म्हटले तरी अर्थ एकूण एकच. अंकुराला रुजवण्याचे प्राक्तन नियतीने केवळ ‘तिच्या’ ललाटी लेखांकित केलं आहे. ही जाणिव सोबत घेऊन सर्जनाच्या या सोहळ्याला आत्मीय अनुबंधातून समजून घेताना कवयित्री ‘बाई’ शब्दामागे असणारे अर्थ शोधत राहतात.
निरागसपणाचे बोट धरून काळाच्या संगतीने चालणारा तिचा अल्लड प्रवास आयुष्यातील एक वळण पार करून ‘बाईपण’ देणाऱ्या वाटेवर येऊन विसावतो. तिच्या आकांक्षांना गगन देणारे निसर्गाचे चक्र तिच्यातील पूर्णत्वाला अंकित करते. तिचं ‘बाई’ असणं अधोरेखित करणारा हा क्षण. मनात अगणित स्वप्ने रुजवणारा. म्हणूनच की काय तो आस्थेचे अनेक अनुबंध आपल्यासोबत घेऊन येतो. कृषीसंस्कृतीत रुजण्याला केवळ उगवण्यापुरते अर्थ नाहीत. त्यात सातत्य आहे. संयोग आहे. साक्षात्कार आहे. रुजणे, अंकुरणे, वाढणे, वाढवणे आहे. मातीच्या कुशीत दडलेल्या बीजाला अंकुरण्यात अर्थपूर्णता लाभते. जी गोष्ट भुईची, तीच बाईचीही. दोन्हींच्या ठायी अंकुरणे आहे. म्हणून त्याचा सोहळा साजरा करणे संस्कृतीने कृतज्ञभावाने जपलेलं संचित आहे. पावसाच्या पहिल्या सरींना साद देत माती उगवून येण्याचा सांगावा घेऊन येते. तसा बाईच्या आयुष्याला पूर्णत्व देणारा हा क्षण तिच्यातील सर्जनाच्या बिंदूत सामावलेला असल्याने त्याला भावनिक पातळीवर जोडले गेले असावे.
वयात आल्याचं आवतन घेऊन आयुष्याच्या दारावर दस्तक देणारा क्षण तिच्या मनात आकांक्षांची अनेक बीजं पेरतो. संक्रमणाच्या रेषा पार करून आलेला हा आनंद आईशिवाय आणखी कोणाला उत्कटतेने कळू शकतो? त्या क्षणाला सजवण्यात, साजरा करण्यात तिला कृतार्थ वाटते. आयुष्याचे सर्जक अर्थ तिला त्यात दिसू लागतात. त्या क्षणांना वेचण्याची तयारी म्हणून तिने भुई शेणाने सारवून घेतली. चूल मातीने पोतरून घेतली. पोरीला पाटावर बसवून सुस्नात अंघोळ घातली. ज्यांची कूस उजवली आहे, त्यां सवाष्णींच्या हातांनी औक्षण करताना, खणानारळाने ओटी भरताना, पोर वयात आल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतं. बाई म्हणून जगण्याला पूर्णत्वाची चौकट लाभत असल्याचे समाधान तिच्या प्रत्येक कृतीत सामावते. रुजण्याचे अर्थ तिला लेकीच्या आयुष्याच्या या वळणावर नव्याने गवसतात. रुजण्याचे संकेत, उगवण्याचे संदर्भ ती त्यात कोरून घेते.
वयात येतानाचा तिचा सगळ्यात प्रिय सवंगडी असतो आरसा. तिच्या निकट सहवासाचा हा धनी. त्याच्याशी हितगुज करताना ती हरकून जाते. आपणच आपल्याला पाहताना मोहरून येते. चेहऱ्याचा चंद्र कितीदा तेथून उगवून आलेला पाहते. तरीही पुन्हापुन्हा नव्याने शोधत असते त्याला. त्याच्या बिलोरी कवडशांशी खेळत राहते उगीच. मनाचं आसमंत असंख्य चांदण्यांनी भरून घेते. ललाटी कोरलेला कुंकवाचा चंद्र साक्ष असतो तिच्या सुभाग्याची. खूण असते सौभाग्याची. अहेवपण तिची आकांक्षा असते. कुंकवाच्या वर्तुळात तिच्या आयुष्याची सगळी सूत्रे सामावलेली असतात. काळाच्या आघाताने या सौख्याला ग्रहण लागते, तेव्हा तोच आरसा काळीज कापत जातो. अहेवपण तिच्या आयुष्याच्या सार्थकतेचे परिमाण असते. कुंकवाच्या रंगाने भरलेलं आभाळ भावनांचे मेघ घेऊन वाहत राहतं तिच्या जगण्यातून. त्याचे रंग विरले की, तेच आभाळ तिला नकोसे होते. पांढरं कपाळ स्वप्नातही नसावं, म्हणून रोजच नियंत्याकडे कामना करीत असते. मळवटभरली बाई भरदुपारी देवदर्शनाला जाताना बघितली की, तिला बघून केवढा आनंद वाटायचा तेव्हा. सवाष्ण असण्याचे सगळे संकेत आनंदाचं अभिधान बनून विहरत राहायचे वाऱ्यासोबत तिच्या अवतीभोवती. दुर्दैवाच्या आघाताने तिचं सौभाग्य प्राक्तनाच्या वावटळीत सापडतं अन् क्षणात आयुष्याचे सगळे संदर्भ बदलतात. सैरभैर झालेल्या ढगांनी चुकल्या वाटेने निघून गेल्यानंतर आभाळ सुने सुने वाटावे तसे. पांढऱ्या कपाळासह कोणासमोर जाणेही तिला नको होते. आपली सावली कोण्या सौभाग्यवतीवर पडू नये, म्हणून दूरूनच वाट वाकडी करते.
आईच्या मनात सौभाग्याची संकल्पित चित्रे कोरली आहेत. तिच्या मनी विलसणारे सुभाग्य हातातील काकणांच्या आवाजाचा साज चढवून किणकिणते. कपाळावरचा कुंकवाचा रंग केवळ अहेवपण अधोरेखित नाही करत, तर त्या वर्तुळात तिच्या आयुष्याच्या कहाण्या कोरल्या गेल्या आहेत. काकणे, कुंकूशिवाय स्वयंपाक करून नये. हे कोणीतरी रुजवलेले संकेत मुलगीही पुढे नेते आहे, कळतं नकळत. कदाचित तिचं कपाळ अहेवपण गोंदून नांदणे नियतीला नको असेल. सुन्या कपाळाच्या वेदना तिने मनाच्या मातीत गाडून टाकल्या असल्या, तरी आठवणींच्या सरींसोबत त्या उगवून येतात. जखमांवर धरलेल्या खपल्या निघून वाहू लागतात. आपल्या लेकींच्या जगण्यात असे प्राक्तनभोग असू नयेत, ही भीती तिच्या मनाला कासावीस करते. शेताच्या बांधावरून जातांना हात जोडून साती आसरांना आपल्या वाट्याचं विधिलिखित लेकींच्या नशिबी येऊ नये म्हणून मागणे मागते.
ती आयुष्याच्या वाटेवरून प्रवास करीत राहते, अंतर्यामी आस्थेचे अनुबंध कोरून घेत. तरीही तिच्याभोवती मर्यादांची कुंपणे का घातली गेली असतील? प्रघातनीतीच्या परिघात का बंदिस्त केलं असेल तिला? तिच्या परिघाला का सीमित केले गेले असेल? ती ‘बाई’ आहे म्हणून? खरंतर हे प्रश्न अनेक वर्षांपासून कितीतरी मानिनींच्या मनावर आघात करीत आहेत. त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूनही तिच्या हाती फार काही का लागत नसावं? रूढी, परंपरांचे संकेत पेरून संस्कृतीच्या प्रवाहाने तिचा पैस का कमी केला असेल? तिच्या असण्याला सीमित करणारा विचार परंपरांच्या पात्रातून वाहतो आहे. कधी संस्कृतीने दिलेल्या संचिताच्या झुली पांघरून. कधी संस्कारांचे फेटे परिधान करून. तो सहजी बदलणार नाही. विज्ञानतंत्रज्ञानाने प्रगतीची आभाळ उंची गाठली असली, तरी परंपरांचा प्रवाह काही सहज आटत नसतो.
लोकरुढींचा पगडा मनावरून सहजी मिटत नसतो. कदाचित त्यामागे घडलेल्या आघातांनी आलेली हतबलता असेल किंवा प्रवाहाच्या विरोधात निघण्याचा धीर नसेल. कारणे काही असोत. तिच्या ‘बाई’ असण्याचे अर्थ संस्कृतीप्रणीत संकेतांनी सीमांकित केलेल्या चौकटीत आणून अधिष्ठित केले आणि सांभाळलेही जातायेत. या सीमांचं उल्लंघन करू पाहणारे असंख्य अगतिक आवाज आक्रंदनाच्या आवर्तात हरवले आहेत. हा प्रवाह जसा रूढीपरंपरांचा आहे, तसा परंपराप्रिय विचारांना प्रमाण मानण्याचासुद्धा आहे. तसाच नारी देह घेऊन जगण्याचाही आहे. परंपरेने बंदिस्त केलेलं जगणं जगणारी मानिनी व्यवस्थेच्या वर्तुळात नियतीनिर्मित, परिस्थितीनिर्मित आघात सहन करीत राहते. आत्मशोध घेत नव्या क्षितिजांकडे निघू पाहते; व्यवस्थेच्या खुंट्याशी करकचून बांधलेलं जगणं सोबत घेऊन, फाटलेल्या आभाळाला टाके घालण्याचा प्रयत्न करीत. सारं काही सहन करून पापण्याआड पाणी लपवत, कधी गळ्यातले हुंदके गळ्यातच गिळून आयुष्याचा उसवलेला पट सांधते आहे, सावरते आहे, आवरते आहे. आपल्या नशिबी असणारे भोग निदान भविष्यात उमलणाऱ्या आयुष्यात नसावेत या आशेने चालते आहे. पदरी पडलेलं भागधेय सोबतीला घेऊन, भाग्य बदलण्याच्या कांक्षेने.
चंद्रकांत चव्हाण
**
0 comments:
Post a Comment