कविता समजून घेताना... भाग: सव्वीस

By // No comments:

जात पण लई मेन असते साहेब...

चोवीस तास उलटून गेले तरी
लागला नाही तपास
की निषेधाचा
एकही उमटला नाही सूर...

चोवीस तास उलटून गेले तरी
कोणी फेकले नाहीत दगड
पोलीस ठाण्यावर
गावातल्या वस्त्या वाड्यांवर
अजून कुणी फेकले नाहीत टायर...

चोवीस तास उलटून गेले तरी
कुणी बसलं नाही
उपोषणाला पुतळ्याजवळ
वा केली नाही कुणी
प्रार्थनास्थळाची तोडफोड...

चोवीस तास उलटून गेले तरी
कुणी केली नाही मागणी
सीबीआय चौकशीची
आणि तातडीने एखादा
कायदा रद्द करण्याची...

चोवीस तास उलटून गेले तरी
मीडियावाल्यांना मिळाली नाही
एखादी ब्रेकिंग न्यूज
वा सुरूही करता आली नाही
एखादी महाचर्चा...

बघून सारं गपगार
विचारलं एकाला की,
खरं आहे ना, ऐकलं ते?
तर म्हणाला तो जोशात
खरंच हाये साहेब खरंच हाये,
झालाय रेपबीप पण अजून तिची
जात नाही कळली,
म्हणून सगळे गपगार हाये...

जात पण लई मेन असते ना साहेब
नुस्तं बाई आहे म्हणून
आपण काढले मोर्चेबिर्चे
आन उद्या निघाली बाई
दुसऱ्याच जातीपातीची तर
हायकमांड ठिईल का आम्हांला...

चोवीस तास उलटून गेले तरी
कळाली नाही बाईची जात
आणि पोस्टमार्टेम मध्येही
सहजासहजी आली नाही लक्षात...

चोवीस तास उलटून गेले तरी
लागला नाही तपास
उमटला नाही निषेधाचा सूरही...


मनोहर विभांडिक

सत्य कल्पितापेक्षा अधिक भयावह असते, असे म्हणतात. यात काही अतिशयोक्त आहे असे नाही. कधीकधी अशा काही अनपेक्षित गोष्टी समोर येतात की, नसला तरी त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. त्या नाकारता येत नाहीत अन् स्वीकारताही. अशावेळी अगतिक शब्दाचा अर्थ आकळतो. इहतली नांदणाऱ्या सुखांचं केंद्र माणूस आहे. पण माणूसपणावरचा विश्वास संपून जावा अशा गोष्टी घडतात. तेव्हा माणूस म्हणून आपल्या मर्यादांची प्रकर्षाने जाणीव होते. माणूस विचारशील वगैरे जीव असला, तरी तो स्वप्नांच्या प्रदेशात विहार करणाराही आहे. कल्पनांचे पंख लेऊन आकांक्षांच्या गगनात विहार करताना त्याला आनंद गवसत असेलही, पण सर्वकाळ तो स्वप्नांच्या झुल्यांवर झोके घेऊ शकत नाहीं ना? वास्तवाच्या वाटेने त्याला चालावेच लागते. हे सगळं ज्ञात असलं, तरी परिस्थितीच्या वणव्यांपासून पलायन करण्याचा तो प्रयास करीतच असतो. सुखांची आस असली, म्हणून ती काही सहजी चालून त्याच्या अंगणी नाही येत. शांतता सुखांच्या परगण्याकडे नेणारा पथ आहे. सहजपणे जगणे माणसाला प्रिय असले, तरी ते आयुष्यात सहजपणे अधिष्ठित नाही होत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते काही वळचणीचं वाहतं पाणी नाही. त्याचे काही आखीव सूत्रे नसतात, ज्यात जगण्याच्या किमती कोंबून अपेक्षित उत्तरे हाती लागतील.

माणूस शांतताप्रिय जीव वगैरे असल्याचं सगळेच सांगत असले, त्याला तसं वाटत असलं तरी हे अर्धसत्यच. अर्थात हे म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल. पण वरकरणी तसे वाटत असले, तरी शांततेच्या परिभाषा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. प्रसन्नतेचा परिमल घेऊन गंधाळणारे क्षण आयुष्यात अनवरत नांदते राहावेत, ही त्याची सार्वकालिक कामना असली तरी माणूस म्हणून त्याच्या जगण्याचे परिशीलन केले की कळते, वास्तव अन् परिस्थितीत केवढे अंतराय आहे. माणसाच्या वाटचालीच्या इतिहास उकरून काढला अन् त्यात थोडं डोकावून पाहिलं, तर किती दिवस असे असतील की, त्या दिवसातले क्षण तो केवळ आणि केवळ आपले समजून जगला? विश्वकल्याणाच्या तो वार्ता वगैरे करीत असला, तरी कल्याणाची परिभाषा त्याच्यापासून सुरु होते अन् त्याच्याजवळ येऊन पूर्ण होते. स्थिर जीवनाचे गोडवे गात असला, तरी त्याचं मन कधी स्थिर असतं? स्थैर्य संपादित करता यावं, म्हणून हाती शस्त्रे धारण करून तो शांती प्रस्थापित करायला निघाला. हाती घेतलेलं शस्त्र शांतीची सूक्ते गाण्यासाठी असल्याचे सांगत आला आहे. जगाला मरणपंथावर नेणाऱ्या युद्धांचा अभ्यास केला की कळते, या विनाशामागे त्याचे धर्मवंशजातीचे अहं उभे आहेत.

माणसाला कोणी समाजशील, विचारशील, समायोजनक्षम वगैरे म्हणत असला अन् तो तसा असला, तरी त्याच्या अंगभूत मर्यादा दुर्लक्षून नाही चालत. या मर्यादाच त्याच्या असण्या-नसण्याचे अर्थ अधोरेखित करतात. कलह एकवेळ मान्य करता येईल. इहतली वास्तव्यास असणारे सगळेच जीव एका मर्यादेपर्यंत कलहाच्या वाटेने चालतात. पण त्यांचे संघर्ष शारीरिक गरजांच्या पूर्तीसाठी आणि पूर्तीपुरते असतात. पूर्ती हा त्यांचा पूर्णविराम असतो. भले जंगलाचा न्याय क्रूर असेलही, पण त्यात टोकाचे अहं नसतात. आपल्या मर्यादा आकळल्या की, पराभव मान्य करून माघार घेण्यात कोणाला वावगे नाही वाटत. पण माणूस मात्र याला अपवाद. माघारी वळताना तो धुमसत असतो. धुमसते ज्वालामुखी माणसांची विभागणी अनेक परगण्यात करतात. कोणाला आपलाच वंश विश्वात विशुद्ध असल्याचा साक्षात्कार घडतो. कोणाला आपल्या धर्मापेक्षा परिणत तत्वज्ञान अन्यत्र आढळत नाही. कुणाला आपल्या जातीचा अभिमान स्वस्थ बसू देत नाही. कोणाला केवळ आपला पंथच विश्वकल्याणाचा रास्त मार्ग वाटतो. प्रत्येकाचे अहं आपणच एकमेकाद्वितीय असल्याचे मानतात. श्रेष्ठत्वाच्या व्याख्या प्रत्येकाने आधीच निर्धारित करून घेतलेल्या असतात. सहिष्णुता वगैरे शब्द अशावेळी अंग आकसून कुठेतरी अंधाऱ्या कोपऱ्यात आपला अधिवास शोधत असतात.

अन्य जिवांच्या जगात जातीचे पेच असल्याचे अद्याप तरी कोणाला अवगत नाही. त्यांच्यातले भेद निसर्गाच्या मर्यादांनी अधोरेखित केलेल्या रेषेपलीकडे कधी जात नाहीत. पण माणसांच्या जगात भेदांच्या भिंती पावला-पावलांच्या अंतरावर उभ्या आहेत अन् त्यांची उंची कशी वाढवता येईल, म्हणून सगळेच प्रयत्नरत असतात. जगात अन्य परगण्यात जात असल्याचे ज्ञात नाही. पण भारत नावाचा खंडतुल्य भाग एकमेव असावा, जेथे माणसांच्या ओळखी नावा-आडनावावरून होतातच; पण त्यातून त्याच्या जातीचे संदर्भ आवडीने शोधले जातात अन् बऱ्याच जणांना ते अधिक महत्त्वाचे वाटतात. भारत विषमतेचे माहेरघर असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच नमूद करून ठेवलं आहे. येथे प्रत्येकाला आपापले मनोरे प्रिय आहेत अन् ते अधिक उंच करायचे आहेत. माणुसकीचे शिखर उभं करायच्या वार्ता कोणी करीत असलं, तरी या शिखरावर आपलं माणूस शीर्षस्थानी कसे असेल, याचीच प्रयोजने शोधली जातात. जातीच्या निर्मूलनासाठी अनेक धुरिणांनी प्रयास करूनही आपण आपल्या विचारविश्वातील विसंगतीला विचलित होऊ दिले नाही. हे अविचल राहणेच आपल्या वेगळेपणाची परिभाषा आहे अन् अनेक प्रश्नांना अधोरेखित करायला एक कारण. विज्ञानतंत्रज्ञान युगाच्या वार्ता करीत असलो, तरी अजूनही फार काही हाती लागलं आहे असं नाही.

देशाचं भविष्य लोकांच्या वर्तनव्यवहारात साकळलेलं असतं. व्यवहारांना नितळपण घेऊन वाहता आलं की, उत्तरांचे विकल्प समोर दिसू लागतात. प्रगतीचे पथ आखता येतात. माणूस नावाचं बहुआयामी विश्व सन्मानाने उभं करता येतं. शेकडो वर्षांचे संचित घेऊन येथील संस्कृती नांदते आहे. तिचे पात्र धरून इतिहास वाहतो आहे, कधी जयाचे उन्माद, तर कधी पराभवाचे शल्य उरात घेऊन. काळाच्या उदरातून अनेक गोष्टी प्रसवल्या. काही मांगल्याचा घोष करीत, काही विसंगतीचे विकल स्वर घेऊन. काळाच्या कुठल्यातरी तुकड्याची सोबत करीत जात जन्मली अन् वाहत राहिली समाजमनाचे किनारे धरून. आजही ती सुखनैव नांदते आहे माणसांच्या मनात. माणूस नावाचा प्राणी जन्मत नाही, घडवला जातो, असं म्हणतात. ही जडणघडण संचित असते त्याच्या वाटचालीचे. भूतकाळाचे परिशीलन घडून वर्तमानात वावरताना भविष्य समृद्ध करण्याचा प्रयास माणसाची अन् त्याच्या इतिहासाची ओळख असते. पण सगळं काही करूनही त्याला व्यवस्थेत विसावलेल्या वैगुण्यांच्या वर्तुळांच्या पार काही होता आले नाही. जातवास्तव येथील अटळ भागधेय आहे अन् याला मिरवण्यात धन्यता मानणारेही आहेत. माणसाला जन्मासोबत ज्या काही गोष्टी मिळत असतील, त्या असोत. पण येथे जन्माने जात आंदण मिळते अन् ती अखेरपर्यंत सोबत करते. जात संपवायच्या वार्ता कोणी कितीही करीत असलं, तरी ते केवळ स्वप्नं आहे, निदान अजूनतरी.

नेमक्या याच वेदनेला घेऊन ही कविता संवेदनांचे किनारे धरून सरकत राहते. आपल्या मातीत रुजलेल्या जात नावाच्या वैगुण्याला अधोरेखित करते. खरंतर प्रगतीचे पंख लेऊन विश्वाला अंकित करण्याची स्वप्ने बघणाऱ्या माणसांच्या जगाला हे भाष्य अभिमानास्पद आहे असे नाही. जात माणसांच्या जगण्यातून निरोप घेऊन कायमची जावी म्हणून सारेच उद्घोष करतात, पण तिलाच आस्थेने जतन करण्यात कोणतीच कसर राहू देत नाहीत. माणूस भौतिक प्रगतीचे इमले बांधत आला, पण त्याला अद्याप माणूस काही उभा करता आला नाही. सुसंगत आयुष्याच्या अपेक्षा करीत असला, तरी जगण्यात विसावलेले विसंगत विचारांचे तुकडे सांधता आले नाहीत. कोण्या मानिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे धागे धरून संवेदनशील मनांना ही कविता प्रश्न विचारते, चोवीस तास उलटून गेले, तरी घटनेचा तपास का लागला नाही? पण हाच प्रश्न काळजाला कापत जातो. त्याच्या आवर्तात अडकवून गरगर फिरवतो. विचारांची आंदोलने उभी करतो. संवेदना जाग्या असणारी मने गलबलतात.

तपास का लागला नाही? या प्रश्नांचे उत्तर जातीच्या चौकटीत बंदिस्त झालं असेल तर... लागेलच कसा? कोण्या मानिनीची झालेली मानखंडना माणसांसाठी महत्त्वाचा विषय नसून, तिची जात अधिक मोलाची. तिच्या जातीचे संदर्भ हाती लागण्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा असते. अनेकांना तिच्या मरणापेक्षा जातीत अधिक स्वारस्य का असावे? आपल्या सार्वजनिक जीवनातील यशाची सूत्रे त्यात एकवटलेली दिसतात म्हणून? की आपापले स्वार्थ साध्य करण्याची संधी तिच्या निष्प्राण देहात सामावलेली असते? कलेवराला जात चिकटवली की येथे मरणालाही महत्त्व मिळतं. पण माणसाला अन् माणुसकीला मूठभर विश्वात ओंजळभर जागा नसावी याला काय म्हणावे?

माणसांच्या मरणाचेही सोहळे व्हावेत, याला संवेदनेच्या कोणत्या निकषात मोजणार आहोत आपण? मरणारा माणूस आहे. अत्याचार झालेला देह माणसाचा आहे, यापेक्षा तो कोणत्या जातीचा आहे, याला महत्त्व असेल, तर आपण कोणत्या प्रगतीच्या वार्ता करीत आहोत? कवी म्हणतो, घडलेल्या घटनेच्या संदर्भात निषेधाचा एकही सूर का उमटला नसेल? कुठल्या तरी घटनेचे धागे हाती धरून कोणी पोलीस ठाण्यावर दगडांचा अनवरत वर्षाव करणारे का गप्प असतील? कुणी गावातल्या वस्त्यावाड्यांवर पेटते टायर फेकून आपल्या पराक्रमाचे पलिते प्रज्ज्वलित करतो. कुणी उपोषणाचं अस्त्र हाती धारण करून पुतळ्याजवळ निषेधाचे फलक फडकावतो. कोणाचा संयम सुटून प्रार्थनास्थळाची तोडफोड घडते. कुणी सीबीआय चौकशीची मागणी करतो, तर कुणी एखादा कायदाच काढून टाकण्याची. मीडियावाल्यांनाही या घटनेत ब्रेकिंग न्यूज मिळाली नाही. कदाचित बातम्या ब्रेक करायलाही जातीच्या वर्तुळांचे परीघ बुलंद असायला लागत असतील. अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी, वैचारिक पातळीवर किती अप्रगत वगैरे आहोत हे सांगणाऱ्या महाचर्चा सुरूही करता आल्या नाहीत. संभवतः अशा चर्चांसाठी माणूस जातीने ओळखण्याइतका कोणीतरी असावा लागतो का? कदाचित टीआरपीच्या अंकात या अभागी आयुष्याचे गणित सामावत नसेल का?

सारं गपगार बघून एकाला विचारलं, खरं आहे ना, ऐकलं ते? तर तो म्हणाला, खरंच हाये साहेब, खरंच हाये. झालाय रेपबीप; पण अजून तिची जात नाही कळली, म्हणून सगळे गपगार आहेत. जात पण लई मेन असते ना साहेब! नुस्तं बाई आहे, म्हणून आपण काढले मोर्चेबिर्चे आन उद्या निघाली बाई दुसऱ्याच जातीपातीची, तर हायकमांड आम्हांला ठिकाणावर राहू देईल का? खरंतर या वाक्यात एक वाहणारी जखम आपणच आपल्याला उसवत नेते. येथेच माणुसकीच्या साऱ्या निकषांचा पराभव होतो. सारे संस्कार, सगळे शिक्षण कुचकामी ठरते. माणसांनी प्रगतीची मिजास करावी असे काय आहे त्याच्याकडे? अशावेळी सुरेश भटांच्या शब्दांची प्रकर्षाने प्रतीती येते ते म्हणतात, ‘पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकाला, कोणी विचारीत नाही माणूस कोण मेला.’

खरंतर मरणाऱ्या बाईची जात कळली नाही. कळेलच कशी? मरणाला कसली आलीय जात? मरण काही जातीची लेबले लाऊन येत नसतं. पोस्टमार्टेम मध्येही सहजासहजी आली नाही ती लक्षात. येईलच कशी? माणसाला जात चिटकवता येते, पण शरीराला कशी चिटकवता येईल? निसर्ग देह घेऊन इहलोकी पाठवतो. माणसे त्यालाही टॅग लावून श्रेष्ठत्वाच्या किमती ठरावतात. ज्याचा  टॅग  मोठा, तो कुलीन ठरत जातो. जातीच्या कक्षा विस्तारत जातात, पण माणूस चौकटीत बंदिस्त होताना संकुचित होत राहतो. तो देह स्त्रीचा असेल तर जातीचे टोकं अधिक धारदार बनतात. कारण जात श्रेष्ठत्वाच्या परिभाषा तिच्या शरीराभोवती घट्ट बिलगलेल्या असतात. जातीची प्रमाणपत्रे घेऊन वावरणारे रक्तशुद्धी, वंशशुद्धीचे अनन्यसाधारणत्व अधोरेखित करण्याची कोणतीही संधी जावू देत नाहीत. माणसाने शरीराच्या व्याधींचे निदान करण्याचे शास्त्र अवगत केले; पण विज्ञानाला अजून देहातील जात काही शोधता आली नाही. ही त्याची मर्यादा मानवी की निसर्गाची देणगी? ती कोण होती? हा प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित राहिला. लागलाच नाही तपास तिच्या जातीचा. म्हणून उमटला नाही निषेधाचा सूर. कदाचित विज्ञानाने जात शोधून काढता आली असती, तर जमा झाले असते का, अन्याय झाल्याच्या वार्ता करीत माणसे शेकडो, हजारोंच्या संख्येने?

‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ कवयित्री बहिणाबाईनी आपल्या कवितेतून हा प्रश्न विचारून काही दशके लोटली आहेत. पण अद्याप या प्रश्नाचे उत्तर काही माणसाला मिळालेय, असं वाटत नाही. कारण ज्याला हा प्रश्न विचारला त्याला ‘माणूसपण’ म्हणजे काय, हे पूर्णतः कळलेले आहे असे म्हणवत नाही. कळले असते तर माणूसपणाची आठवण करून द्यायची आवश्यकताच राहिली नसती. माणूस निसर्गाची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे, असे म्हणताना कितीही चांगले वाटत असले, तरी तो तसा असेलच याची खात्री देणे अवघड आहे. म्हणूनच कदाचित माणसाला ओळखताना काहीतरी निसटतेच.

विश्वातील कोणताही धर्म, त्याचं तत्वज्ञान हिंसेचे समर्थन कधीच करीत नाही. अवघं विश्व एकाच चैतन्याचा आविष्कार असल्याचे मानले जाते. तरीही माणसे असं का वर्ततात? या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड होत आहे. माणुसकीधर्मच महान असल्याचे दाखले जागोजागी उपलब्ध असूनही, संकुचित मनाची मूठभर स्वार्थांध माणसे हा कोणता खेळ खेळत असतील? त्यांना कोणत्या तत्वांची प्रतिष्ठापना करायची असते? धर्मवंशजात जगण्यासाठी आवश्यक आहेत की नाही, हा ज्याच्या-त्याच्या निवडीचा भाग झाला. तो मतभिन्नतेचा विषय असू शकतो. जगण्यासाठी तो आवश्यक आहे का? या प्रश्नाचे उत्तर ज्याचं त्यानेच शोधायला हवं. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: पंचवीस

By // No comments:
वारी

निघाला वारीला
तुझा वारकरी
शेती, माती घरी
सोडुनियां

पेरणीची चिंता
नाही विठू फार
तुझ्यावरी भार
संसाराचा

विठ्ठलाचे नाम
देहाच्या कणात
आषाढ मनात
बरसला

श्वासाचा मृदुंग
पांडुरंग म्हणा
भक्तीरूपी वीणा
झंकारली

कोरडाच गेला
मागचा हंगाम
जगण्यात राम
नाही आता

निरोप ढगाला
सांग विठुराया
घरट्याची रया
उदासली

शेतकऱ्यांसाठी
उघड रे कान
समृध्दिचे दान
देई देवा

गळून पडल्या
जातीच्या साखळ्या
प्रेमाच्या पाकळ्या
फुलारल्या

कुठला दिवस
कुठली रं रात
माणूस ही जात
वारी सांगे

वारीच्या मिसानं
जमे गोतावळा
समतेचा मळा
वाळवंटी

माणसास नको
देऊ युध्द तंत्र
कारुण्याचा मंत्र
देई देवा


नितीन देशमुख


वैशाखाच्या वणव्याने आसमंत होरपळून निघत असतं. जिवांची काहिली सुरु असते. उन्हाळा ऐन उमेदीत असतो. चैत्र, वैशाखाच्या पावलांनी चालत आलेल्या उन्हाळ्याच्या काहिलीत सगळेच कावून गेलेले. शेतकरी कामांच्या पसाऱ्याने हैराण. समोर अनेक प्रश्न उभे. त्यांची उत्तरे पाऊस घेऊन येणार असतो. मनात काही आडाखे बांधलेले. काही स्वप्ने सजवलेली. ती सूत्ररूप स्वप्ने पूर्ण करण्याचा सांगावा घेऊन आषाढाचे आगमन होते. शेतशिवारातून कामांची एकच धांदल उडते. उद्याच्या उज्ज्वल भविष्याची बिजे धरतीच्या कुशीत पावसाच्या साक्षीने पेरली जातात. सगळ्यांनाच घाई झालेली. पेरणीची वेळ साधण्यासाठी सगळीच जमवाजमव चाललेली. कुणाकडे सगळंच काही. कुणाकडे काहीच नाही. काही नाही म्हणून मदतीचे हात शोधले जातात. शेतीची तुंबलेली कामं एकेक करून हातावेगळी होऊ लागतात. दिवसाचे प्रहर अपुरे पडायला लागतात.

कामाच्या धबडग्यात आषाढ ऐन मध्यावर येतो. आषाढाच्या अगमनासोबत वारकऱ्यांच्या मनात विठ्ठलभेटीची ओढ जागू लागते. आसपासच्या वाटांवरून, परिसरातून विठ्ठल नामाचा गजर कानी यायला लागतो. एकीकडे कामांची धांदल, तर दुसरीकडे विठ्ठलाच्या भेटीची आस. या सुखसंवादी द्वंद्वात मन झोके घेऊ लागते. अंतरी वस्तीला असणारा भक्तीचा रंग घननीळ होऊ लागतो. मन पंढरीच्या वाटेने पाखरासारखे घिरट्या घालत असते. पण कामांचा रगाडा काही संपायचे नाव घेत नाही. शेवटी मनातील भक्तीभाव उसळी घेतोच. रस्ते भक्तांच्या पावलांनी चालू लागतात. कुठूनतरी गावशिवाराच्या रस्त्याने भजनाचे सूर कानी येऊ लागतात. दूर क्षितिजाकडून माणसांच्या आकृत्यांचे काही ठिपके दिसू लागतात. अस्पष्ट आकृत्या ठळक होऊ लागतात. कपाळी गंधाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळा आणि मुखी विठ्ठल नामाचा सोहळा घेऊन भक्तांचा मेळा पंढरपूरच्या वाटेने सरकत राहतो. आणखी एक ठिपका मेळ्यात सामावून जातो.

आसक्तीच्या धाग्यांचा गुंता तसाच सोडून पावले वारीकडे वळती होतात. वारकरी आणि विठ्ठलाचे एकरूप झालेलं हे नातं. मनाला कितीही आवर घातला, तरी पावले नकळत ओढत नेतात त्या वाटेवर. मैलोनमैल अनवाणी धावणाऱ्या पावलांमध्ये पंढरीच्या वाटेने पळायचं बळ कुठून येत असेल? कोणत्याही भक्ताला विचारून पाहा, ही सगळी पांडुरंगाचीच कृपा असेच तो सांगतांना दिसेल. विठ्ठल त्यांच्या आयुष्याचा उर्जास्त्रोत असतो. तो त्याच्या विचारातच नाही, तर जगण्यात सामावून एकरूप झालेला.

ही कविता भक्तीच्या ‘अभंग’ रंगांना दिमतीला घेऊन प्रसन्नतेचा परिमल पेरत येते. आयुष्याची प्रयोजने कोणी कुठे शोधावीत, हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा भाग. पण भक्तीचा रंग ज्याच्या मनावर चढला असेल, त्याला सृष्टीच्या मोहपाश विणणाऱ्या रंगांशी कसलं आलंय कर्तव्य. त्याच्यासाठी काळा रंगच एकमेव परिमाण. भक्तीचा कल्लोळ घेऊन वाहणाऱ्या या रचनेतील शब्द विठ्ठलाच्या रंगाइतकेच नितळ. सहजपणाचे साज लेवून आलेले शब्द अंतरीचा आवाज बनून निनादत राहतात मनाच्या गाभाऱ्यात. विठ्ठल भक्तीचा गोडवा घेऊन येणारे हे शब्द भक्ताच्या श्रद्धेइतकेच निर्मळ, निर्व्याज. भक्तीच्या सुरांचे साज लेऊन येणारी ही कविता अंतरीचा भावकल्लोळ आहे. भक्ताने भगवंताच्या चरणी समर्पित भावनेने फुले ठेवावीत, तशी कवी शब्दांची फुले विठ्ठल चरणी समर्पित करतो.   

वारी मराठी मुलुखाचा भावभक्तीसोहळा आहे. मराठी मातीचं सांस्कृतिक संचित. भक्तीचा सहजोद्गार बनून वारीच्या वाटेने वाहणाऱ्या सगळ्या माणसांची जातकुळी एकच, ती म्हणजे विठ्ठल. पांडुरंग त्यांच्या मनाचा विसावा. वारीच्या वाटेने चालणारी माणसे कुणी तालेवार नसतात. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या झुली परिधान करून कुणीही वारीत चालत नसतात. वर्षानुवर्षे काळ्यामातीच्या कुशीत जगण्याचं प्रयोजन शोधणारा येथला साधाभोळा माणूस नशिबाने दिलेलं फाटकं जगणंही आपलं मानतो. उसवलेलं आयुष्य सोबत घेऊन, आहे त्यात सुख शोधत राहतो. ऊनवारा, पाऊस, तहान, भूक कसलीच चिंता न करता श्रद्धापूर्वक अंतःकरणाने पांडुरंग भेटीला नेणाऱ्या रस्त्याने चालत राहतो. सोय-गैरसोय या शब्दांच्या पलीकडे तो कधीच पोहचला. सोयीनुसार त्याच्या सुखांची परिभाषा कधीच नाही बदलली. विठ्ठल हेच त्याचे खरे सुख.

मनाला ओढ लावणारं वारीत असं काय असावं? माणसं वारीच्या वाटेने का धावत राहतात? त्यांच्यात हे सगळं कुठून येत असेल? वारीत एकवटलेली माणसं पाहून नेहमीच एक जाणवतं की, येथे विज्ञानप्रणित निकषांना प्रमाण मानून मनातल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करून हाती फार काही लागण्याची शक्यता नाही. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे भक्तांच्या अंतर्यामी विलसणाऱ्या भावकल्लोळातून शोधायला लागतात. ही सगळी श्रद्धावंत माणसं वारीच्या वाटेने वावरताना मनातला अहं गावाची वेस ओलांडतानाच मागे टाकून येतात आणि माणूस म्हणून एक होतात.

दुःखे, संकटे, समस्या मातीत जन्म मळलेल्या माणसांना नवीन नाहीत. त्यांच्याशी दोन हात करीत आला आहे तो. पण परिस्थितीच सगळीकडून कोंडी करायला लागते. कोरड्या जाणाऱ्या हंगामात तगून राहण्याची उमेद क्षणाक्षणाला तुटत जाते. अंतरी अधिवास करणारा आस्थेचा ओलावा आटत जातो. जगण्यात राम दिसत नाही. आसक्तीचे धागे एकेक करून सुटू लागतात. आयुष्याचं रामायण होण्याची वेळ येते. तेव्हा विकल झालेलं मन उसवणाऱ्या संसाराकडे हताशपणे पाहण्याशिवाय काय करू शकते? काडीकाडी जमा करून उभ्या केलेल्या घराची रया निघत चाललेली. तरीही आभाळाला दया नाही येत, म्हणून तो विठ्ठलाला विनवणी करतो. ओसाड अंत:करण असणाऱ्या आभाळाला आमचं सांगणं नाही कळणार, निदान तू तरी ओथंबलेल्या ढगांना निरोप दे! आमचे आवाज निदान तुझ्या कानी पडू दे! कोणी बंगला, गाडी, माडी मागत असेलही. पण याला यातलं काही नको. पोटापुरती पसाभर समृद्धी पदरी पडावी म्हणून पांडुरंगाला साकडे घालतो.  

वारी साऱ्यांना आपल्यात सामावून घेते. तुम्ही राव-रंक कुणीही असा, सत्तेची वस्त्रे विसरून वारीत विरून जात असाल, तर सगळ्यांनाच माउलीरूप होता येते. कोणत्याही भेदभावाच्या अतित असणारी वारी माणसांच्या विचारांचा परिघ विस्तारत नेते. मनात निर्माण झालेलं मीपणाचं बेट वारीत पार वितळून जातं. मागे उरतं निखळ माणूसपण. चार दिशांनी येणारी चार माणसं, चार दुःखं दिमतीला घेऊन आलेली. या साऱ्यातून मुक्ती मिळू दे, म्हणून त्याला साकडं घालायचं असतं. वारीसोबत वावरतांना अनोळखी मने संवाद साधतात. संवादाचे साकव उभे करून प्रवास घडत राहतो. आपली त्यांची सुख-दुःखे एकमेकांना सांगितली जातात. ऐकली जातात. मनात लपवलेले दुःखाचे कढ वाटून हलके होत जातात. केवळ मलाच दुःखे, वेदना, यातना, समस्या नाहीत, ही जाणीव होऊन जगण्याचं बळ वाढत जातं. आयुष्याची प्रयोजने अधिक गडद होत जातात.

विठ्ठल सर्वसामान्यांचा समन्वयवादी देव आहे. माणसांचं रोजचं अवघड जगणं सुघड करणारा. रोजच्या मरणाला सामोरे जाणाऱ्या माणसांच्या मनात जगण्याचं प्रयोजन पेरणारा. विठ्ठल महाराष्ट्राचा सामाजिक देव. ना त्याच्या हातात कोणती आयुधे, ना कोणती अस्त्रे-शस्त्रे. भक्ताला तो हेच सांगत असावा की, तुझं नितळ, निर्मळ मन हेच जग जिंकण्याचं आयुध आहे, ते सांभाळलं की पुरे. जग जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकलंस तरी खूप झालं.

वंचित, उपेक्षित, अव्हेरलेल्या जिवांचा जगण्याचा एकमेव आधार श्रद्धा असते. वेदनांनी विसकटलेल्या मनात संत-महात्म्यांनी विचाराची बिजे रुजवली. समाजाच्या विचारात परिवर्तन घडवून आणण्याचे काम केले. सर्वसामान्यांची गरज देव आणि श्रद्धा असते, हे पाहून सहज पेलवेल असे दैवत विठ्ठलाच्या रूपाने त्यांच्या हाती दिले. स्वतःची कोणतीही ओळख नसणाऱ्यांना विठ्ठलाच्या रूपाने आधार गवसला. भागवतभक्तीच्या भगव्या पताका मुक्तीचे निशाण बनून फडकल्या. मातीचा गंध लेऊन वाहणारा सत्प्रेरित विचार या पताकेखाली एकवटला. साऱ्यांच्या अंतर्यामी समतेचा एकच सूर उदित झाला. एकत्र आलेली पावले चालत राहिली पंढरपूरच्या वाटेने, मनात श्रद्धेचा अलोट कल्लोळ घेऊन.

भागवतसंप्रदायाची सगळी व्यवस्था उभी आहे श्रद्धेच्या पायावर. जगण्याची साधीसोपी रीत संतानी सामान्यांच्या हाती दिली. जातीयतेचे प्राबल्य असलेला तो काळ. विषमता पराकोटीला पोहोचलेली. माणसातील माणूसपण नाकारणाऱ्या मानसिकता जागोजागी प्रबळ झालेल्या. या विपरीत विचारांच्या वर्तुळांना ओलांडून अठरापगड जातीजमातीची माणसे भागवतधर्माचे निशाण हाती घेऊन एकत्र आली. संतांनी सामान्यांच्या सन्मानाने जगण्याचा विचार दिला. हाच विचार जगण्याचे अभिधान झाले आणि भक्तीचे अंतिम विधान ठरले. तत्कालीन समाजाचा परिवेशच सीमांकित होता. त्यात परिवर्तन घडवून आणणे एक अवघड काम होते. दिवा पेटवून रात्रीचा अंधार थोडातरी कमी करता येतो. पण विचारसृष्टीला लागलेलं ग्रहण सुटण्यासाठी परिस्थितीत परिवलन घडून येणे आवश्यक असते. समाज पारंपरिक विचारांच्या वर्तुळातून पुढे सरकणे आवश्यक होते. सामान्यांच्या विचारकक्षेत असणारा अंधार दूर करण्यासाठी संतांनी सद्विचारांचे पलिते प्रदीप्त करून पावलापुरता प्रकाश निर्माण केला. संतांच्या लेखणी-वाणीतून अभंगसाहित्य प्रकटले.

विठ्ठल सर्वसामान्यांचा हाकेला धावून जाणारा. पुंडलिकासाठी विटेवर वाट पाहत तिष्ठत राहणारा. त्यांनी फेकलेली वीट सिंहासन समजून त्यावर आनंदाने विराजमान होणारा. भक्तांच्या भेटीची ओढ खरंतर त्यालाच अधिक. तो साऱ्यांचाच आहे. तो सापडावा म्हणून सायासप्रयास करायची आवश्यकताच नाही. त्याला भेटायचं तर कुठल्या सोवळ्या-ओवळ्याची वस्त्रे परिधान करून जाण्याची आवश्यकता नाही. हृदयातून उमलून येणारा आणि ओठातून प्रकटणारा प्रत्येक शब्द गीत होतो. त्याच्या नामस्मरणासाठी हातात टाळ असले तर उत्तमच, नसले तर टाळ्याही चालतात. म्हणूनच संत जनाबाई ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ म्हणाल्या असाव्यात. संत सावता कधी विठ्ठलाच्या दर्शनाला धावले नाहीत. त्यांना त्यांचा विठ्ठल कांदामुळाभाजीत दिसत होता. संत सेना महाराजांना आपल्या रोजच्या व्यवसायात आणि जगण्यात सापडत होता. संत नरहरींना विठ्ठल नामाचा व्यवहार कळला होता. म्हणूनच की काय, पांडुरंगालाही भक्तांचा लळा होता.

भगवंताला भक्तांची कामे करण्यात कोणतेही कमीपण कधी वाटले नाही. तो संत जनाबाईंच्या सोबत दळण दळत होता. संत गोरोबांच्या घरी मडकी घडवण्यासाठी चिखल तुडवण्यात त्याला आनंद मिळत होता. संत चोखोबांच्या सोबत गुरे ओढत होता. संत रोहिदासांना चांबडं रंगवून देत होता. संत कबीरांचे शेले विणीत असे. सगन कसायाच्या सोबत मांस विकायला बसत असे. म्हणूनच की काय साऱ्यांना तो आपला आणि आपल्यातील एक वाटत असे. विठ्ठलाने भक्तांच्या हाकेला धावून जाण्याचे व्रत कधी टाकले नाही. या गोष्टी कदाचित विज्ञानयुगात कपोलकल्पित वाटतील. विज्ञानाच्या परिभाषेत असंभव वगैरे वाटतील. याबाबत संदेह नाही. पण विज्ञानाचा प्रदेश जेथे संपतो तेथून श्रद्धेचा परगणा सुरु होतो, हे वास्तवही नजरेआड करून चालत नाही. वारकऱ्यांच्या श्रद्धा विठ्ठल चरणी समर्पित आहेत. श्रद्धेत डोळसपणा असेल, तर भक्तीवर आक्षेप घेण्याचे कारण नाही. श्रद्धाशील अंतःकरण कोणतातरी आधार शोधत असते. त्यांच्या जगण्याला आश्वस्त करणारा आधार विठ्ठल होत असल्यास संदेह निर्माण होण्याचे कारण नाही. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ हे संत नामदेवांचे म्हणणेही अशा भूमिकेत खरेच ठरते. विठ्ठलभक्तीचे साध्यही ज्ञानदीप प्रज्ज्वलित करणे हेच आहे. भक्तीतून भावनांचा जागर करीत भावकक्षा विस्तारत नेणे, हेच संतांच्या साहित्याचे, प्रबोधनाचे उद्दिष्ट होते.

गेल्या सहा-सातशे वर्षापासून महाराष्ट्रातील माणसे आषाढी-कार्तिकीला वारीच्या वाटेने चालत आहेत. संसारातील समस्या, सुख-दुःख सारंकाही विसरून विठ्ठलाच्या ओढीने वारीला जात आहेत. चंद्रभागेतील पाण्याच्या स्पर्शाने पुलकित होत आहेत. विठ्ठलाची भेट व्हावी. त्याच्या पायी क्षणभर माथा टेकवावा, अशी अपेक्षा त्यांच्या मनात असतेच. पण एवढे सायासप्रयास करूनही विठ्ठलाचे दर्शन नाहीच झाले, तरी यांच्या मनात कोणताही राग नाही आणि तसा आग्रहतर नाहीच नाही. नुसत्या कळसाचे दर्शन झाले तरी आत्मीय समाधान त्यांच्या अंतर्यामी विलसते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हे सगळे भक्त का करीत असावेत एवढे सव्यापसव्य? का करीत असावेत एवढे सायासप्रयास? कदाचित आपल्या पाठीशी विठोबा उभा आहे आणि तो जगायला प्रयोजने देतो, असे त्यांना वाटत असेल का? कारणे काहीही असोत, आषाढ मासाचा प्रारंभ झाला की, आजही मराठी माणसाचे मन पंढरपुराकडे धाव घेतं एवढं मात्र नक्की. विठ्ठलभक्तीचं हे बीज जणू त्याच्या रक्तातच पेरून आलेलं असतं. परिस्थितीच्या अवकाशात ते वाढत जातं. दिसामासाने वाढणाऱ्या भक्तीच्या या रोपट्याला आलेलं फळ म्हणजे विठ्ठल. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••