कविता समजून घेताना... भाग: अठ्ठावीस

By

देऊळ

बाई, तुम्ही माझ्या
वाकड्या तिकड्या अक्षरांना
कधी हसला नाहीत
तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना,
मी दिलेल्या मोडक्या तोडक्या उत्तरांवर
कधी रागावलाही नाहीत!

शाळेत, उपाशी पोटात
मिळलं ते ढकललं हावरटासारखं
म्हणून कधी मला झिडकारलं नाही
अन् जमलं तसाच केला कसाबसा अभ्यास
म्हणून कधी मला फटकारलं नाही

नाही घातला कधी कोलदांडा
नाही घातली कधी कपाळाला आठी
नाही घेतली कधी हातात काठी
उलट... उलट या पाखरावर
तुम्ही झाडासारखी मायाच केली भरभरून!

बाई, शिकण्यातलं शहाणपण
नाही आलं मला,
पण तुमच्या मायेतून
पंखात नवं बळ आलं
सबंध आकाश पेलण्याचं!

बाई, आता खूप वर्षांनंतर,
ती पडकी शाळा पाहतो मी येता जाता-
तेव्हा तुमची आठवण येते
अन् क्षणात त्या पडक्या शाळेचं,
देऊळ होऊन जातं

एकनाथ आव्हाड

शाळा एक भावकाव्य असतं, जीवनाने जीवनासाठी लिहिलेलं. त्याचे आयाम कळतात, त्याला आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी अन्यत्र आपलेपणाचे अनुबंध शोधायला लागत नाहीत. अंतर्यामी असणाऱ्या आस्थेतून ते आकारास येतात. ‘शाळा’ असा एक शब्द आहे, जो कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जगण्याशी जुळलेला असतो. निमित्त काहीही असो, सुजाण होण्याची एक वाट शाळेच्या दिशेने वळते एवढं नक्की. शाळा शब्दासोबत अभ्यास, परीक्षा, पुस्तक, शिक्षक आणि शिकणं एवढंच चित्र उभं राहत नाही. शाळा नाव धारण करून एक प्रतिमा मनाच्या प्रतलावर प्रकटते. शाळा, शिक्षक आणि शिक्षण हे परस्पर पूरक शब्द. यांच्या साहचर्यातून जगण्याचं आभाळ समृद्ध करणारी व्यवस्था उभी राहते. शिकविण्याचं शाळा एक साधन आहे, भलेही ते एकमेव नसेल. अफाट, अमर्याद नभांगणाखाली माणूस स्वतःही शिकू शकतो, ती स्वयंसाधना असते. अन्य जिवांना औपचारिक शिक्षण देण्याची आवश्यकता नसते. त्यांच्या गरजा देहधर्माशी निगडित असतात; पण माणसांना घडवावं लागतं. मनी वसणाऱ्या कुतूहल, जिज्ञासापूर्तीसाठी निश्चित दिशा द्यावी लागते. ती शिक्षणातून गवसते.

माणसाच्या आयुष्याचे चक्र भविष्याभोवती गरगर फिरत असतं. फिरायलाही हवं. कारण आजच्या प्रयत्नातून पुढच्या प्रवासाचे पथ आकारास येत असतात. आनंदप्राप्तीसाठीच तर माणसाची सारी धडपड चालेली असते. आनंदयात्रिक बनण्यासाठी आधी आनंदाचं झाड आपल्या अंगणात लावावं लागतं. पण यातील किती झाडं बहरतात, फुलतात? परीक्षेत मिळवलेल्या गुणांपेक्षा जगण्याच्या गुणवत्तेचं मोल अधिक असतं. ते टक्केवारीत कसं होईल? किती गुण मिळाले, असं विवक्षित वेळ निघून गेल्यानंतर कोणीच कोणाला विचारत नाही. मिळवलेले गुण दिसावेत म्हणून काही कोणी गुणपत्रक गळ्यात घालून वावरत नाही. परीक्षेतील गुण महत्त्वाचेच, त्यावर उद्याचे भविष्य ठरते, हे सीमित अर्थाने खरंय. पण भविष्य ठरविणारा तो काही एकमेव घटक नाही.

नुसत्या माहितीच्या गोण्या भरणे म्हणजे शिक्षण नाही. शिक्षणाचा संबंध ज्ञानाशी आणि ज्ञानाचं नातं जगण्याशी असतं. असावं. हे नातंचं हल्ली उसवत चाललं आहे. मागच्यावर्षी वर्गात काय शिकलो, ते यावर्षी आठवत नाही. आमचे शिकणे त्या वर्षापुरते. वर्ग बदलला की, अभ्यास विसरतो आणि ते शिकवणारा मास्तरसुद्धा. निष्क्रिय कर्मयोग आचरणे म्हणजे शिक्षण का? मुळात आपल्या शिक्षणपद्धतीत आणि परीक्षापद्धतीत काही वैगुण्ये आहेत. ज्याची स्मरणशक्ती तीव्र, तो प्रज्ञावान ठरतो. प्रज्ञेला पैलू पाडणारी बऱ्यापैकी बरकत अन् प्रतिष्ठा असणारी क्लास नावाची व्यवस्था आहेच दिमतीला. येथे काही पैसे पेरून स्मरणशक्तीला कार्यान्वित करण्यासाठी अभ्यासाच्या सरावाचे अनेक प्रयोग करून कर्मयोग साधला जातो. परीक्षेत नेमक्यावेळी नेमके आठवून तंत्रबद्धरित्या पाठ केलेली आणि घोटून, तासून, तपासून घेतलेली उत्तरे लिहिणे म्हणजे गुणवान का?

जगातील साऱ्याच यशस्वी माणसांनी परीक्षेच्या गुणवत्तायादीत स्थान मिळवले होते का? लौकिक अर्थाने तंत्र असलेल्या कोणत्याही मंत्रात न अडकलेली उत्तुंग व्यक्तित्वे इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहिले तर सहज हाती लागतात. त्यांनी कर्तृत्वाची शिखरे उभी केली. मान्य आहे, साऱ्यांनाच काही सारं होता येत नाही. गुणांचा आणि गुणवत्तेचा संबंध असतोच असा किती? अशी कितीतरी माणसे असतील, जी परीक्षेतील गुणांच्या उंचीत कमी पडली; पण अंगभूत गुणवत्तेने त्यांनी यशाची परिमाणे अधोरेखित केली.

तंत्रशरण पद्धतीत अन् परिस्थितीत आजही फारसा बदल घडला आहे, असं नाही. तुम्हाला आवडो अगर न आवडो बोर्डाने ठरवलेले अन् शाळांनी निवडले तेच विषय घ्या आणि पास होऊन दाखवा. यासाठी परीक्षा नावाचं आव्हान समोर उभं. बरं, या पद्धतीविषयी किती तज्ज्ञांचे ही दोषरहित मूल्यमापनपद्धती असल्याचं मत आहे? वर्षभर घोका अन् दोन-तीन तासात ओका. बस्स, एवढंच. योग्यवेळी योग्य तेच आठवून अपेक्षित उत्तरे लिहिली की, गुणपत्रिकेत उत्तम गुण येऊन विसावतात. बाकी कौशल्यांच्या प्रकटीकरणासाठी कितीसा वाव असतो? महात्मा गांधी म्हणाले होते, ‘आमच्या शिक्षणपद्धतीत दोन्ही हातांचा वापर कधी होत नाही आणि जो एक हात वापरला जातो, तो गृहपाठ, उत्तरपत्रिका लिहाण्यापुरताच.’ अर्ध्याच क्षमता वापरात येत असतील, विकसित होत असतील, तर या व्यवस्थेला परिपूर्ण तरी कसे म्हणता येईल?

गुणांवरून गुणवत्ता ठरवण्याच्या आजच्या जगात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद विद्यार्थी म्हणून शिकायला असते, तर गुणवत्तायादीत आले असते का? छत्रपती शिवाजी महाराज काही राज्यशास्त्र विषयात गोल्ड मेडलीस्ट नव्हते, संत तुकाराम महाराज समाजशास्त्राचे पदवीधर नव्हते, संत ज्ञानेश्वरांनी काही तत्वज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा, राजनीतीचा अभ्यास करणारे सगळेच स्वकीय-परकीय इतिहासकार, विद्वान एकमुखाने महाराजांच्या राजनीतीला गौरवान्वित करतात. महाराजांविषयी लिहताना त्यांच्या लेखणीला बहर येतो. ‘बुडती हे जन देखवे ना डोळा’ म्हणीत अंतर्यामी अस्वस्थता निर्माण करणारी भावना संत तुकाराम महाराजांच्या वर्तनात समाजाविषयी असणाऱ्या आस्थेतून, कळवळ्यातून प्रकटली होती. ती निर्माण व्हावी, म्हणून त्यांच्याकडे समाजशास्त्रीय विचार वृद्धिंगत करणारे शिकवणी वर्ग नव्हते. तो अंतरीचा जिव्हाळा होता. ‘बंधू-भगिनी’ या दोनच शब्दांनी जगाच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या नावापुढे केवळ बॅचलर ऑफ आर्ट, ही पदवी होती.

‘रायबाचं लग्न नंतर, आधी कोंडाण्याचं’ म्हणणारे तानाजी मालुसरे, ‘लाख मरोत, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’ म्हणीत महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे बाजीप्रभू कोणत्या शाळेत त्याग, समर्पण, स्वामिनिष्ठा शिकले. न्यूटन, आईन्स्टाईन, एडिसन त्यांच्या विद्यालयांच्या गुणवत्ता यादीत आले होते का? कर्तृत्वाची शिखरे निर्माण करणाऱ्या या लोकांच्या लोकविलक्षण जीवनकथा माहीत असूनही अंगभूत गुणवत्तेला नाकारून गुणपत्रकातील गुणांचा आग्रह का, कशासाठी? यशस्वी होणं गुणांवरच अवलंबून असेल तर मग बहुसंख्य माणसे, जे गुणवत्ता यादीत कधीच आले नाहीत, ते जगायला अपात्र ठरतील. आणि गुणवत्ता यादीत आलेले असतात, त्यापैकी बऱ्याच जणांचे काय चालले आहे, त्यांनी पुढे जाऊन काय केले आहे, हे तरी आपणास कुठे माहीत असते?

काळ कोणताही असू द्या. विद्यार्थी तोच असतो. त्याच्या भावस्थितीचा आपण पुरेसा विचार करतो का? इवलासा अंकुर वाढत, वाढत आकाश कवेत घेण्याचे स्वप्न घेऊन ऊन, वारा, पाण्याशी सख्य साधत जमिनीत रुजतो. सुरक्षेचे कवच असले, तर निर्वेधपणे त्याची वाढ होते. मुलांना आश्वस्त करणारं भावनिक सुरक्षेचं कुंपण आपण कधी देणार आहोत? विद्यार्थ्याचा कर्तृत्वसिंधू उचंबळून यावा, म्हणून आपला जीवनबिंदू अर्पून त्याला असीमता प्रदान करणे अवघड असते का? सळसळत्या हिरव्या पानांत, झुळझुळणाऱ्या झऱ्यात, गाणाऱ्या पक्षांच्या गळ्यात, वनराईत नेणाऱ्या वळणावळणाच्या वाटेत, नदीच्या खळाळत्या पाण्यात खरं शिक्षण सामावलेलं आहे. पुस्तकं दडली आहेत. ती उघडून वाचण्यासाठी आम्ही त्यांना तेथे कधी नेणार आहोत का?

शिक्षण एक पद्धती आहे. ती आत्मसात करावी लागते. ती प्रयत्नसाध्य आहे. या प्रयत्नात कदाचित काही चुका जाणते-अजाणतेपणी घडतीलही. अपयश पदरी येईल; पण अपयश हा काही शेवट नसतो. फारफारतर यशाचा चुकलेला मार्ग असू शकतो, रस्त्याचा शेवट नाही. रस्ते आणखीही आहेत. नसतील तर नव्या वाटा तयार करता येतात. चाकोरीतला रस्ता कोणतंही नवं ठिकाण शोधू शकत नाही. निरीक्षणबळावर न्यूटन थोर शास्त्रज्ञ होतो. मदर तेरेसा सेवेने जग फुलवतात. बाबा आमटे आनंदवनात आनंदाचे मळे उभे करतात. थोडे वेगळे काम करायची तयारी असली, थोडी युक्ती असली की, यशाचे मार्ग निर्माण करता येतात. यशस्वी होण्यासाठी कशावरतरी श्रद्धा असावी लागते. ही श्रद्धास्थाने शाळा, शिक्षक झाले तर... कारण, श्रद्धेच्या बळावर एकलव्यसुद्धा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होऊ शकतोच ना!

शाळा केवळ परीक्षा घेऊन उत्तीर्ण-अनुतीर्णतेचे ठसे अंकित करणारे उद्योगकेंद्रे नसतात. येथे येणारी मुले उत्तीर्ण होण्यासाठीच येत असली अन् उत्तीर्णतेची मोहर आयुष्यावर अंकित झाल्याशिवाय चालणार नसले, तरी पुस्तकी ज्ञानातून प्राप्त पदवी म्हणजे सर्वकाही असते, असेही नाही. संपादित केलेली पदवी दिलेल्या परीक्षा, सोडवलेल्या उत्तरपत्रिका, निर्धारित अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याचं प्रमाण असते. यशस्वी आयुष्याचं परिमाण नसतं. सुख-दुःख, समस्या, संकटे यात उत्तीर्ण होण्याएवढं प्रगल्भ मन क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे मिळणाऱ्या अनुभवातून घडवावं लागतं. ते संवेदनशील संस्कारांतून आकारास येत असतं.

मुलांना त्यांच्या आवडीचे अध्यापक मिळाले की, ते आभाळाच्या उंचीशी स्पर्धा करतात. शिक्षक होणे काही योगायोग नसतो, तो योजनापूर्वक आचरणात आणलेला कर्मयोग असतो. जगण्याच्या गणिताची समीकरणे सोडवणारी सूत्रे कदाचित शिक्षकी पेशात सामावली असतील. भाकरीचं उत्तर गवसत असेल येथून. असे असले तरी केवळ सुखांचे साचे घडवून अंगीकृत कार्याला नैतिकतेच्या चौकटीत अधिष्ठित नाही करता येत. त्याला आस्थेचे अनुबंध असले की, प्रघातनीतीचे परीघ पार करता येतात. स्वप्नांना खुणावणाऱ्या क्षितिजांकडे पावले वळती करता येतात. ती आली की, आकांक्षांना आभाळ आंदण देता येतं. ही कविता संवेदनांचे सूर शोधत मनाच्या प्रतालावरून वाहत राहते. सुखांची सुटलेली सूत्रे साकळून आणू पाहते. स्नेहाच्या परगण्यात समाधानाच्या परिभाषा शोधते. मातृवत ममता करणाऱ्या शिक्षिकेप्रती असणाऱ्या आदराचा अध्याय कोरून कृतज्ञतेचं भावकाव्य लेखांकित करते.

समस्यांचे अर्थ समजले की, संवेदनांना सौंदर्य लाभतं. उपेक्षेने जगण्याला प्रश्नांकित केलेल्या घरातलं हे पोर. ना कोणत्या सुविधा, ना पर्याप्त साधने. सकाळ उगवते भाकरीचा प्रश्न घेऊन अन् संध्याकाळ येते भुकेची समस्या घेऊन. रात्र अवतरते भाकरीची स्वप्ने बांधून. विवंचना जगण्यातील शहाणपणाची सांगता करते. जगण्याची उत्तरे शोधतांना पर्याय हरवतात, तेथे कसली आली आहेत आयुष्याला आशयघन उत्तरे? ज्यांच्या आयुष्यातून आशय हरवला आहे; त्याला अभ्यासाचे मोल माहीत नसते, असे नाही. पण पोटात खड्डा पाडणाऱ्या भुकेला हे कुठे ठाऊक असतं? उपाशी पोटाला पक्वानाच्या चवीचे सोहळे नाही साजरे करता येत. मिळलं ते उपाशी पोटात हावरटासारखं ढकलत राहतो, म्हणून कधी बाईंनी झिडकारलं नाही. कसाबसा अभ्यास केला म्हणून फटकारलं नाही की, शिक्षणात कोलदांडा घातला नाही. आकाश हरवलेलं पाखरू सैरभैर होतं. आपलेपणाचा आसरा शोधत राहतं. वावटळीत घरटं विसकटलेल्या पाखराला डहाळीचा आधारही आश्वस्त करणारा वाटतो. बाई गोंधळलेल्या पाखराला क्षणभर विसावा देणारी सावली नाही झाल्या, तर वात्सल्याचा वर्षाव करणारे झाड बनून आश्वस्त करीत राहिल्या. शिकण्यातलं शहाणपण भलेही नसेल आलं त्याला, पण ममतेच्या स्पर्शाने पुलकित झालेल्या पंखात आकाश पेलण्याचं बळ आलं. आभाळ हरवलेल्या पाखराला आकांक्षांची क्षितिजे दाखवणारी दिशा गवसली.  

पडकी शाळा पाहतो, तेव्हा त्याला बाईंची आठवण प्रकर्षाने येते अन् त्या पडक्या शाळेचं देऊळ होऊन जातं. आस्थेचे अनुबंध भक्तीचे आयाम धारण करतात. देव असतो की नाही, माहीत नाही. पण देवत्त्वाची परिमाणे अधोरेखित करणारी माणसे इहतली वसतीला असतात. त्यांच्यापेक्षा देव आणखी वेगळा नसावा. या मुलाला शिक्षिकेच्या रुपात देवत्व गवसलं. त्यांचं असणं त्याच्यासाठी तीर्थक्षेत्राइतकं पवित्र असतं. काळाच्या पटलावरून बऱ्याच गोष्टी नियतीने निर्धारित केलेल्या वाटेने वाहून जातात. ऋतूंच्या बदलांचे आघात झेलत शाळा जीर्ण झाली. तिच्या भिंतींनी धीर सोडला. छताने जमिनीशी सख्य साधत शरणागती पत्करली. नियतीच्या पावलांनी परिक्रमा करून एक वर्तुळ पूर्ण केलं. आरंभ, स्थिती, अंताच्या वाटेने निघालेल्या वस्तूंना विसर्जनाचे सोहळे संपन्न करावे लागतात. काळच त्यांचं प्राक्तन लेखांकित करतो. असं असलं तरी काही गोष्टी नियतीच्या अभिलेखांना आव्हान देत नांदत्या असतात. संस्कारांनी मनात कोरलेल्या आठवणींना ना ऋतूंचे सोहळे संपवू शकत, ना निसर्गाच्या मर्यादा बांध घालू शकत. मनात वसतीला असलेल्या आस्थेच्या ज्योती तेवत राहतात. भक्तीचे दीप प्रज्वलित राहतात. सद्विचारांचे पदर परिस्थितीने उभ्या केलेल्या वादळांपासून वातींना सुरक्षित राखत प्रकाशाचं पसायदान मागत असतात.

संवेदनशीलता सोबत घेऊन आल्याशिवाय या पेशाचे मोल समजणे अवघड. शिक्षकाची ओळख त्याचं निरामय चारित्र्य असतं, तसंच परिणामकारक अध्यापनही. सुंदर शिल्प साकारण्यासाठी कलाकाराच्या सर्जनशील हाताचा स्पर्श दगडाला घडावा लागतो. त्याला ओबडधोबड दगडातील सौंदर्य तेवढे दिसते. त्यातला अनावश्यक भाग काढून तो ते साकारतो. मुलांच्या मनातील विकल्पांचे तण शिक्षकाला वेळीच काढता आले की, त्यांचं जीवन सौंदर्याची साधना होते. अध्यापन समर्पणशील कलावंताची साधना असते. गायकाला रियाज करून सुरांना धार लावावी लागते. तलवारीला पाणी असल्याशिवाय मोल नसतं. म्यान रत्नजडीत अन् तलवार गंजलेली असेल, तर तिचं मोल शून्य असतं.

परंपरेच्या चौकटीत फारफारतर धडे, कविता, गणिते, सूत्रे, व्याख्या शिकवून शिक्षक होता येईलही; पण विद्यार्थिप्रिय अध्यापक नाही होता येणार. शिक्षक म्हणून मिळणारा आदर परिघापलीकडे जाऊन काही शोधल्याशिवाय मिळत नसतो. भोवताल बंदिस्त करणाऱ्या चौकटींचे सीमोल्लंघन केल्याशिवाय आकांक्षांचे आकाश हाती लागत नसते. शिक्षक नावाच्या शिखराला आदर तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा त्या शिखराची उंची लोकांच्या मनातील उंचीपेक्षा काकणभर अधिक असते. शिक्षकाची अनास्था, उदासिनता, निष्क्रियता आदराची सांगता करीत असते. पोटार्थी शिक्षण आणि शिक्षक परिस्थितीत परिवर्तन कसे घडवू शकतील? मुलांच्या मनात शिक्षकांप्रती असणारा आदर उगवत्या सूर्यासारखा स्वाभाविक अन् उमलत्या फुलाइतका सहज असतो. शिक्षणातून संपादित केलेल्या जुजबी ज्ञानावर पोट भरण्याची सोय लावता येते. ती कौशल्ये पुस्तकातील धड्यांमधून मिळतात; पण जीवनासाठी शिक्षण घेताना त्याचे स्त्रोत शोधावे लागतात. या स्त्रोतांच्या शोधाची एक वाट शाळा अन् शिक्षकाच्या दिशेने वळणारी असावी. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment