कविता समजून घेताना... भाग: एकोणतीस

By // No comments:

दावण

पेरणीच्या ऐन मोक्याच्या क्षणी
नसायचे पैसे जेव्हा
बि-बियाणांसाठी बापाकडे
तवा बाप हताश होवून
डोकावायचा नकळत
मोठया आशेने गुरांच्या गोठ्यात

त्याचा काळवंडलेला चेहराच
सांगायचा कहाणी एकेक
नि:शब्द गुरांना
त्यांना उमगायचं होष्यमान
बापाच्या फाटक्या जिंदगानीचं

घरात खायला दाणा
नसला तरी चालेल
पण गोठ्यात दावण
भरगच्च भरलेली पाहिजे
अशी त्याची दांडगी धारणा

पोटाची भक्की
खोलवर गेलेली गुरे
द्यायचीत बापाला धीर
व्हायचीत अस्वस्थ,
तर कधी गंभीर
नड भागवली पाहिजे
हे त्यांना जणू ठाऊकच

डोळ्यातली आसवं रोखून
बाप कुरवाळायचा गुरांना
फिरवायचा हात मायेने
त्यांच्या अंगाखांद्यावरून
चालायचा संवाद त्यांचा मनोमन
तेव्हा त्यांचेही डोळे
पाझरायचीत हळूहळू

तशी एकेक नड जेव्हा
वाढतच गेली वावराची
एखादया रोग्याच्या रोगासारखी
तसं एकेक जनावर
हद्दपार होत गेलं गोठ्यातून
कधी सावकाराच्या खुंटयाला
कधी खाटीकाच्या वेशीला
तर कधी दलालीच्या बाजारात

नड तेव्हाही भागत नव्हती
ती आताही भागत नाही
सावट संकटाचं अजून
सावरायचं थांबत नाही
अशा वेळी बाप
पाहतो पाणावलेल्या डोळयांनी
परत गोठयाकडे...

तेव्हा
दिसतोय रिता रिता
आस्तित्व गमावलेला
नुसताच चौकोनी आकाराचा
गोठयाचा सांगाडा

तेव्हा
दिसतेय कुठेतरी
लटकलेली वेडीवाकडी
गुरांची रिकामी दावण...


सचिन शिंदे
••

जगण्याची काही सुनियोजित सूत्रे असतात? की जगणं आयुष्याचे किनारे धरून स्वाभाविकपणे वाहत राहते, नियतीने कोरलेल्या उतारांच्या संगतीने? माहीत नाही. पण आयुष्याला प्रयोजने असतात. नसली तर शोधावी लागतात. शोधून नसतील सापडत, तर निर्माण करायला लागतात. आयुष्याला लागलेले आसक्तीचे रंग काही सहजी नाही सुटत. रंगात रंगवून घ्यावं लागतं आपणच आपल्याला. काहीना सापडतात ओंजळभर थेंब. काहींच्या हातून निसटून जातात पाऱ्यासारखे. कधी वंचना पदरी पडते. कधी उपेक्षेचे अध्याय समजून घ्यावे लागतात. जीवनग्रंथाची एकेक पाने उलटत भविष्याच्या पडद्यापलीकडे दडलेली अक्षरे वाचायला लागतात. जगणं काही योगायोग नसतो. योजनापूर्वक साधलेला कर्मयोग असतो तो. ते सहजसाध्य असतं, तर संघर्षाला काही अर्थ राहिले असते का? नियतीने अंथरलेल्या वाटांनी जीवनाचा धांडोळा घेत धावावे लागते. धावणं काही कुणाला चुकलं आहे असं नाही. काहीच्या आयुष्याची नियती झाडाझडती घेत असते. काही झडून जातात परिस्थितीने पेटवलेल्या वणव्यात. कधीकधी प्रसंगच असे काही समोर उभे ठाकतात की, त्यांना भिडूनही हाती फारसे काही नाही लागत. शोधूनही विकल्प नाही सापडत. पलायनाचा पथ समोर दिसत असला, तरी पळून जाण्यात पराक्रम नसतो, आयुष्याचे सार्थक नसते अन् हीच जाणीव माणसाला अनेक आघातांना पचवून उभं राहायला शिकवते.

नियती कोणाच्या पदरी कोणते दान टाकेल, हे काही कोणाला सांगता येत नाही. काहींच्या जगण्यात आनंदाचे मळे बहरलेले असतात. काहींच्या आयुष्याचे ऋतू उजाड झालेले. ओसाडपण नकोशी सोबत करीत राहते. एक ऋतू पदरी वंचना घालून गेला, म्हणून प्रतीक्षेचे मोसम संपतातच असे नाही. आसक्ती कूस बदलून येणाऱ्या ऋतूंची प्रतीक्षा करायला लावते. आयुष्याला आस्थेचे अनुबंध चिकटलेले असतात. ते सहजी नाही सुटत. खरवडून नाही काढता येत त्यांना. त्यांना सोडून जगणं नाही घडत. त्यांच्या सोबतीने चालणे घडते. पायाखाली वाटा अंथरलेल्या असल्या, तरी मुक्कामाची ठिकाणे गाठण्यासाठी अनभिज्ञ दिशांचा शोध घ्यावाच लागतो. संसार सारासार विवेकाची सूत्रे घेऊन सजवायचा असतो. एकवेळ सुखाची सूत्रे शोधता येतील; पण समाधानाची समीकरणे सोडवणे अवघड. पर्याप्त समाधानाची परिभाषा अद्याप तयार झाली नाही. समाधानाच्या नांदत्या प्रदेशांकडे पोहचण्यासाठी स्नेह साकव बांधायला लागतात. पण स्नेहाचे संदर्भच सुटले असतील, तर कोणत्या क्षितिजांकडे आस्थेने बघावे?

जगाचे दैनंदिन व्यवहार नियत मार्गाने सरू असतात. त्यांच्या पासून विलग कसे होता येईल? व्यवस्थेने प्रत्येकाच्या विस्ताराचे परीघ तयार करून घेतले असतात. काहींच्या वाट्याला आकांक्षांचे गगन आंदण म्हणून आलेले असते. आयुष्याच्या वर्तुळाभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा काहींच्या जीवनसाफल्याच्या सीमांकित परिभाषा ठरतात. प्रत्येकाच्या डोळ्यात लहानमोठी स्वप्ने सजलेली असतात. त्यांच्या असण्याशी त्याचे अनुबंध जुळलेले असतात. त्यांचा सहवास सुखावणारा असतो. उगवणारा प्रत्येक दिवस नवे आव्हान घेऊन इहतली अवतीर्ण होत असतो. कोणाच्या झोळीत काय पडेल, हे सांगता येत नाही इतकेच. काहींना सर्वच, तर काहींना काहीच नसण्यातली विसंगती पावलोपावली प्रत्ययास येते. काहींनी सर्वत्र असायचं, काहींनी कुठेच नसायचं, हा वर्तन विपर्यास नाही का? विपर्यासाच्या साच्यात ओतलेल्या आयुष्याच्या चौकटी जगण्याचा परीघ सीमित करतात. आकांक्षांच्या गगनात विहार करणारी स्वप्ने स्नेहाचे सदन शोधत राहतात. ती अस्वस्थ वणवण असते आपणच आपल्याला शोधण्याची. जीवनग्रंथाच्या पानांवर अंकित झालेल्या अक्षरांचे अर्थ शोधत राहतो कुणी. कुणी कोरत राहतो आकांक्षांचे आकार धारण करणारे शब्द. ज्यांच्या आयुष्यातून आशयच हरवला आहे, त्यांच्या जगण्याचे अर्थ हरवतात. अंकित झालेलं प्रत्येक वाक्य अर्थहीन कवायत बनते.

व्यवस्थेच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करून कोणी उपेक्षित राहत असेल, तर याला जगण्याची संगती म्हणावे कसे? व्यवस्थेतील विसंगतीवर ही कविता भाष्य करते. बदलत्या काळाची परिमाणे हाती धारण करून चालत आलेल्या विकासाच्या वार्तांनी मनाला क्षणभर मोह पडतो. आपल्या अभ्युदयाच्या धूसर खुणा त्यात दिसू लागतात. अर्थव्यवस्थेच्या वर्धिष्णू आलेखाच्या रेषा आयुष्याच्या प्राक्तन रेखा वाटायला लागतात. व्यवस्थेच्या वर्तुळात विकास वगैरेही झाला. रेखांकित केलेल्या वर्तुळांचे परीघ विस्तारले. त्याला नाकारण्याचे कुठलेही प्रयोजन नाही, पण सामान्य वकुब असणाऱ्यांच्या दारी दस्तक देऊन तो विसावला का? हा प्रश्न संदेहाच्या वर्तुळात प्रदक्षिणा करीत राहतो. कुणी तुपाशी अन् कुणी उपाशी असणं, ही काही समत्वदर्शी विकासाची परिभाषा नाही होऊ शकत.  

आकाशात जमा होणाऱ्या ढगांचा अदमास घेत शेतकरी प्रत्येक वर्षी आपल्या पदरी पडलेल्या दानाचे अंदाज बांधत राहतो. स्वप्ने पाहतो. गेला हंगाम वंचनेचे अध्याय आयुष्यात लेखांकित करून गेला. निदान पुढे तसे होणार नाही म्हणून आस लावून असतो. यंदाचा हंगाम कसा असेल, याचे काही आडाखे बांधले जातात. स्वप्ने समाधानच्या पावलांनी मनाभोवती फेर धरू लागतात. समृद्धीचे माप पदरी टाकण्यासाठी घराकडे निघालेल्या लक्ष्मीच्या पावलांकडे राबणारे डोळे लागलेले असतात. निदान वर्षभर जगण्याएवढी संपन्नता दारी येत असल्याचा आनंद मनात मोहरलेपण घेऊन फुलत असतो. मनी वसतीला उतरलेली स्वप्ने मातीच्या कुशीत रुजवण्यासाठी घेतलेले कष्ट फळाला येण्याची खात्री असते. मनाला कुरतडत रहाणारं कर्ज उतरवून घ्यायचं असतं. उरलेच चार पैसे गाठीला अधिक, तर मुलामुलींचं लग्न उरकून घ्यायचं असतं. नसेल हे जमत तर चार खणांच्या घराचं थोडं का होईना, रूप पालटता आले तर घ्यावे पालटून असा विचार मनात घर करीत असतो. कारभारणीसोबत संसाराच्या सुखवार्ता करण्यात कारभारी विसावलेला असतो. स्वप्नांना भरलेले रंग आस्थेच्या क्षणांना घनगर्द करीत असतात. अंतरंगातून उमलणाऱ्या भावनांना संवेदनेचा मोहर यायला लागतो. स्वप्नांमध्ये रममाण होऊन उमेद बांधत असतो आणि... एक दिवस सारं होत्याचं नव्हतं होतं. हातातोंडाशी आलेला घास दैवाच्या खेळाने विखरून जातो.

मनात साकळलेली इंद्रधनुष्यी स्वप्ने करपतात. नियतीच्या एका फटक्यानं सारी राखरांगोळी होते. मागे उरतात खिन्न, उदास अस्वस्थतेचे भग्न अवशेष. स्वप्नांचा असा अचानक चुराडा होताना तगमग तीव्र होत जाते. जगण्याला काळाची नजर लागते. जीवनाचे सारे रंग क्षणात पालटतात. मागे उरतो आयुष्याला व्यापून टाकणारा हताशेचा भयाण अंधार. हरवलेली स्वप्ने घेऊन अंधारवाटेने चालायचे असते, आशेच्या किरणाच्या शोधात. हाती आलेल्या कवडशाच्या साक्षीने प्रकाश पेरायचा असतो त्याला. पावलापुरत्या उजळलेल्या वाटेने चालत येणारी स्वप्ने मनपटलावर गोंदवून पुन्हा काळ्या आईच्या कुशीत रुजवायची असतात. आसपास दैवाने केलेल्या पराभवाच्या खुणा दिसत असतात. त्यांचा मागोवा घेत चालणे प्राक्तन बनते. उसवलेल्या जगण्याला टाके घालण्यासाठी तो उभा राहतो. दैवाला आणि देवालाही आव्हान देत.

संवेदनांच्या किनाऱ्यावर उभे राहून वेदनेचे अर्थ आकळत नसतात. वंचनेचे अध्याय वाचता येतात, त्याला वेदनांचे अर्थ वेचता येतात. रोजचं मरण काय असतं, हे उपेक्षेच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडल्याशिवाय कळेल कसे? विखंडीत स्वप्नांचे प्रदेश वसवणे सोपे नसते. विखरत जाण्याच्या वेदना सांगून समजतातच असेही नाही. तुटत जाणाऱ्या आयुष्याच्या तुकड्यांना सांधण्यासाठी कोणते धागे हाती घ्यावेत? आयुष्यच बेभरोशाचं झालं असेल, तर विश्वास ठेवावा तरी कुणावर? नसलेच कोणते विकल्प हाती, तर स्वतःला पणाला लावण्याशिवाय उरतेच काय शिल्लक? प्रत्येक वर्षी बाप आयुष्याशी झटत नियतीसोबत जुगार खेळतो. उगवून येण्याची आस मनात कायम ठेऊन असतो. लढूनही रिकाम्या ओंजळी उरण्याची वेदना घेऊन कविता संवेदनांचे काठ कोरत राहते. एक अस्वस्थपण घेऊन वाहत राहते, मनाच्या प्रतलावरून. उसवलेपण घेऊन आयुष्याचे अर्थ शोधत वावरणारा बाप प्रातिनिधिक मानला, तरी तो काही अपवाद नाही. नियतीने ललाटी लेखांकित केलेल्या प्राक्तनाशी झगडणारा बाप आसपास नजर वळवली, तरी कोणत्याही परगण्यात सहज दृष्टीस पडेल. त्याची नावे, वसतीची ठिकाणे तेवढी बदलतात; पण अंतरी पेटलेल्या वणव्याची दाहकता तीच. वेदनांच्या वाहत्या जखमाही तशाच अन् संघर्षही सारखाच.  

गुरावासरांनी आबाद गोठा अन् गोठ्याशी जुळलेले जगण्याचे अनुबंध आकळण्यासाठी अंतर्यामी आस्थेने ओथंबलेलं आभाळ वसतीला असायला लागतं. तो केवळ स्वार्थपूरित व्यवहाराचा परिपाक नसतो. गोठ्यात निवाऱ्याला असणारे जीव केवळ प्राणी नसतात बापासाठी. जीव गुंतला असतो त्यांच्यात. सुख-दुःखाचे सवंगडी असतात ते एकमेकांचे. नात्यांची लेबले लावून त्यांना अधोरेखित करता येत नसेल. पण कधी कधी तेच त्याचे मायबाप, बहीणभाऊ, सगेसोयरे होतात. भलेही त्यांना बोलता येत नसेल. प्रगतीच्या परिभाषा नसतील अवगत त्यांना; पण अनुबंधांचे आयाम आकळलेले असतात, असं म्हणणं अतिशयोक्त असलं तरी असंभव नाही. नेमक्या याच नात्याला घेऊन ही कविता मनात एक अस्वस्थपण पेरत जाते. बापाचं आणि मुक्या जित्राबांचं हे जगणं कोणत्या व्याख्या सांगून मांडता नाही येत. ‘जावे त्याच्या वंशा’ असं का म्हणतात, ते अनुभवावे लागते. बापासाठी ही जनावरे केवळ चार पायाचे प्राणी नाहीत. त्याच्या आयुष्याच्या आभाळाला चारही दिशांनी आपल्या माथ्यावर पेलून धरणारे खांब आहेत.
 
अडीनडीला धावून येणारे हे जीव केवळ जीव लावत नाहीत, तर जीव ओततात धन्यासाठी. शेतकऱ्याच्या जगण्यात पेरणीचे ऐन मोक्याचे क्षण अनेक प्रश्नांचे आवर्त उभे करणारे. पडत्या पावसाच्या साक्षीने हे क्षण वेचता आले की, आयुष्यातल्या संकल्पित सुखांचे संदर्भ वाचता येतात. पण प्रत्येकवेळी ते वेचता येतातच असं नाही. केवळ हाती पैसा नसल्याने पडणाऱ्या पाण्यासोबत स्वप्ने वाहून जातांना पाहण्याच्या भळभळत्या जखमा ठसठस ठेऊन जातात. अशावेळी हताशेशिवाय हाती उरतेच काय? काळजाला चरे पाडणारं दुःख सांगायचं तरी कुणाला? जगण्यासाठी भटकंती आणि कर्जासाठी भिक्षांदेही, हे प्रत्येक हंगामाआधी दिसणारं दृश्य. बापाकडे बी-बियाणांसाठी पैसे नसतात, तेव्हा मोठया आशेने गुरांच्या गोठ्यात डोकावतो. त्याच्या विवंचनेची उत्तरे कदाचित तेथे विसावलेली असतात. त्याचा काळवंडलेला चेहरा प्रारब्धाच्या एकेक कहाण्या सांगतो. गुरांनाही त्याच्या आयुष्यात प्राक्तनाने पेरलेले अभावाचे अध्याय दिसतात. उमगतं त्यांना त्याचं भविष्य. अवघं आयुष्य फाटकेपण पांघरून आलेलं. जिंदगीचे सगळे धागे विसकटलेले. एक ठिगळ लावायचं तर दुसऱ्या जागी उसवणं. ज्याचं जीवनच निराशेच्या आवर्तात आवरलं गेलं, त्याला सावरायचं कसं?
 
घरात खायला दाणा नसला तरी चालेल, पण गोठ्यात दावण भरगच्च भरलेली पाहिजे या धारणेने जगणारा बाप जित्राबांना जीव लावतो. आपलं पोट भरायची मारामार, तेथे या जिवांना जगवायचं कसं? याची टोचणी मनाला लागलेली. त्यांच्या पोटाची खळगी पुरेशा चाऱ्याअभावी हातभर खोल गेलेली. पण ही उपाशी गुरेच त्याला धीर देतात. तीही त्याच्या वेदनांना पाहून अस्वस्थ होतात. घरात उभी राहिलेली नड भागवली पाहिजे, हे त्यांना जणू ठाऊकच असतं. डोळ्यातली आसवं रोखून बाप कुरवाळतो त्यांना, फिरवतो हात मायेने त्यांच्या अंगाखांद्यावरून. कितीतरी वेळ हा मूक संवाद चालेला असतो त्यांचा मनोमन. डोळे झरू लागतात. जगण्याच्या वेदना निथळू लागतात थेंब बनून. पाझरत राहतात अभावाचे एकेक कढ.

अडचणी त्याच्या पाचवीलाच पूजलेल्या. एकाचं उत्तर शोधावं, तर आणखी दहा प्रश्न समोर उभे. वावराची एकेक नड असाध्य रोगासारखी वाढतच जाणारी. त्यावर शेवटचा पर्याय म्हणून एकेक जनावर हद्दपार होत जातं गोठ्यातून. त्यांना निरोप देताना होणारी बापाच्या मनाची घालमेल यंत्राच्या चाकांमध्ये गुंतलेल्या वेगाला कळावी कशी? हरवत जातात नजरेतून अन् ढकलली जातात डबडबलेल्या डोळ्यांनी कधी सावकाराच्या खुंटयाला, कधी खाटिकाच्या वेशीला, तर कधी दलालीच्या बाजारात. घरासाठी गोठा सोडून जाणाऱ्या जिवांच्या जाण्याने नड भागली असे अपवादानेही घडलं नाही. तशी आताही भागत नाही. संकटाचं सावट सावरायचं काही नाव घेत नाही. थांबत नाहीत दैवाने मांडलेले खेळ. नियती हाती सूत्रे घेऊन खेळत राहते. बाप पाणावलेल्या डोळयांनी गोठयाकडे पाहत राहतो. रिकाम्या गव्हाणी सोबत घेऊन पडलेला, आस्तित्व गमावलेला, हंबरणं हरवलेला नुसताच चौकोनी आकाराचा त्याचा सांगाडा तेवढा शिल्लक उरलेला असतो. गजबजलेलं गाव कधीच उठून गेलं असतं. मागे उरतात फक्त ओसाड खुणा. जनावरांच्या गळ्यात कधीकाळी विसावलेल्या दावणीचे दोर कुठेतरी वेडेवाकडे लटकलेले आठवणींचे कढ घेऊन.

जगण्यासाठी झगडणाऱ्या साऱ्यांनाच नियतीने नेमून दिलेल्या परीक्षेला सामोरे जावेच लागते. यात सगळेच उत्तीर्ण होतील, असं नाही. नाही उत्तीर्ण होता येत काहींना दुर्दैवाने. सत्व पाहणाऱ्या प्रवासात थकतात, ते हरतात. हरले म्हणून थांबतात अन् थांबलेले परिस्थितीच्या आघाताने विखंडित होऊन विखरतात. नियतीच्या खेळलेल्या खेळाने जगण्याला अवकळा येते. आयुष्याचा बहर जाळणारा वणवा वाढत राहतो. त्याच्या दाहकतेत जगणं करपून जातं. तरीही काळाचे किनारे धरून वाहावे लागते. काही गोष्टी विस्मरणाच्या अंधाऱ्या कोशात विसावतात. विस्मृतीची वसने परिधान करून काळाचे हात धरून निघून जातात. पण आसक्ती काही सहजी टाकून नाही देता येत. नव्याने साज चढवावे लागतात आयुष्याला. जीवनगीत गाणारे सूर शोधावे लागतात. नियतीने दिलेले दान पदरी घेऊन जगण्याचा शोध घेण्यासाठी माणसं मुकाटपणे चालतात. मनाचीच समजूत घालतात. आजचा दिन आयुष्य मातीमोल करून गेला म्हणून काय झालं. निदान येणारा दिवस तरी जीवनात सफलतेचे रंग भरणारा असेल. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••