कविता समजून घेताना भाग: तीस

By // No comments:

 
तुझं वहाणं काळाची गरज आहे

बये,
तू कुठवर वाहणार आहेस?
अजून किती दूरवर
किती दिवस...

किती पाहिलेस उंच सखल प्रदेश,
किती ओलांडलेस नवे नवे देश,
तू कुणाच्या बाजूने आहेस गं?
मातीच्या की आभाळाच्या?

तुझ्या पाण्यात कधी मातीचा गढूळ रंग आहे
तर कधी आभाळाचं निळं अंग आहे
कधी तू आईच्या दुधाची आठवण करून देतेस
कधी निर्मळ, नितळ तर कधी लख्ख होऊन जातेस

तू कधी पोटात गुळगुळीत खडे जपतेस
कधी कडेवर काळेभोर खडक घेतेस
कधी कधी वाढवतेस शंखशिंपले
कधी निर्माल्य, कधी अस्थी

कधी मासळीला वाढवता वाढवता
मासळीसम लयदार झोके घेत पुढे जातेस
कधी कधी विषारी सर्पांनाही सांभाळून नेतेस
बये,
अशी कशी, अन तू कुठे वहातेस?

तुला कुणी नदी, कुणी सरिता म्हणतं
तू स्रीलिंगी झालीयस का?
का म्हणून...?
तुला पुरुष वाचक नामही धारण करता आलं असतं?
पण नाही...

तुलाही अनेक कुळांचा उद्धार करायचा असेल
तुलाही इथला गाळ सुपीक करायचा असेल

तू वहात रहा अखंड
थांबू नकोस
हवे तर लोक बांध घालतील,
बंधारे बांधतील
धरणं बांधतील
आपापसात भांडतील
पसाभर पाण्यासाठी

तू सांडू शकतेस पाणी त्यांच्यासाठी
पण त्यांचे रक्त नाही सांडू शकत

तू कृष्णा, कोयना, गोदावरी असू शकतेस
तू भिमा, नर्मदा अथवा तू गंगाही असू शकतेस

तू असू शकतेस बारमाही अथवा हंगामी
हवं तर तू तुझा हंगामही बदलू शकतेस
पण बये तुझं वहाणं इथल्या काळाची गरज आहे

-शंकर अभिमान कसबे


‘नदी’ या एका शब्दात इहतली नांदणाऱ्या जिवांच्या आयुष्याचे सगळे अर्थ सामावलेले आहेत. संस्कृतीचे संदर्भ साकळले आहेत. परंपरांचं संचित साठलेलं आहे. नदीचा प्रवाह केवळ पाणी घेऊन वाहत नसतो. इहतली अधिवास करणाऱ्या जिवांच्या अस्तित्वाचे प्रश्नही त्यासोबत सरकत असतात. तिच्या असण्यात त्यांच्या अस्तित्वाचे अंश विसावले असतात. देहाला चैतन्य देणारी श्वासांची स्पंदने जिवांचं जगणं असलं, तरी तिच्या असण्यासोबत त्यांचं नांदणं असतं. तिचे किनारे धरून संदर्भ रुजलेले असतात संचिताचे. प्रघातनीतीच्या चौकटी तिचं पात्र धरून वाहत असतात. किती वर्षे झाली असतील, किती ऋतू आले अन् गेले असतील, परिवर्तनाचे किती तुकडे तिच्या अथांगपणात सामावले असतील, काळाचे किती विभ्रम पाहिले असतील तिने, माहीत नाही. पण सगळं सगळं सोबत घेऊन ती वाहत राहते पुढे, आपलं असं काही शोधत. तिच्या अफाट, अमर्याद असण्याला समजून घेताना हातून काहीतरी निसटतेच. अर्थात, ही माणसांची मर्यादा आहे अन् तिच्या अथांग असण्याचं तात्पर्य. तिचं असणं जिवांना जेवढं आश्वस्त करणारं, तेवढंच नसणं सैरभैर करणारं. माणसाच्या जगण्याचा इतिहास तिच्या भूगोलात सामावलेला आहे.

स्मृतीच्या पटलाआड दडलेल्या काळाचे संदर्भ कवेत घेऊन नदी वाहत असते. भविष्य तिच्या उदरात लपलेलं असतं अन् सुख वर्तमानात विसावलेलं. किनारे धरून वाहणारा प्रवाह केवळ पाणी नसतं. प्रदेशाची संस्कृती आणि तेथे अधिवास करणाऱ्या लोकांच्या सुसंस्कृतपणाला घेऊन ते वाहतं. पाण्याचा धर्म उताराच्या सोबत चालणे असला, तरी मर्यादांचे बांध घालून त्याला हव्या असलेल्या मार्गाने वळते करता येते. वळण्याचे आयाम आकळतात, त्यांना उमलण्याचे अर्थ अवगत असतात. बहराच्या परिभाषा समजून घेता येतात, त्यांना परिवर्तनाच्या संदर्भांची उकल करता येते. म्हणूनच की काय माणसाने तिला आपल्या ओंजळभर आयुष्यात अधिष्ठित केलं. तिचं अनन्यसाधारण असणं अधोरेखित केलं. जिवांचा अन् नदीचा अनुबंध ओथंबलेपण घेऊन आस्थेचे किनारे शोधत सरकत राहतो. या ओलाव्याला विलग नाही करता येत. म्हणूनच कृतज्ञ भावनेतून माणसांनी तिला मातृस्थानी अधिष्ठित केलं असेल का? मातेच्या ममतेला विशेषणांनी मंडित करता येत असलं, तरी तिच्या असण्याला अधोरेखित करणारं काहीतरी राहून जातंच. नदीच्या प्रवाहातून वाहत आलेल्या ओलाव्याला कुठल्या विशेषणांमध्ये सीमांकित नाही करता येत. तिचं असणंच मुळात अनन्यसाधारण असतं.  

जगण्याची काही सूत्रे असतात. आयुष्याची समीकरणे असतात. त्यांची उत्तरे शोधत प्रवास घडतो. प्रवासाच्या वाटा अधिक सुखकर व्हाव्यात, म्हणून माणसे कशावर तरी श्रद्धा ठेवून वर्ततात. कोणाला निसर्गाच्या अगाध सामर्थ्यात ते दिसते. कोणाला ईश्वर नाव धारण करून नांदणाऱ्या निराकारात आयुष्याचे आकार गवसतात. कोणाला आणखी काही. मनात उदित होणारी विचारांची आवर्तने त्यांचे निर्धारण करतात. विचारांमध्ये द्वैत असू शकते, आकलनाचे अन् आस्थेचे अनुबंध निराळे असू शकतात; पण पाण्याबाबत मात्र सगळ्यांची श्रद्धा एकाच प्रतलावरून प्रवाहित होते. जगाच्या कुठल्याही परगण्यात गेले तरी झरे, नद्या, विहिरी आणि तळी बहुतेक सगळ्यांच्या आस्थेचा विषय आहेत. धर्मांनी निर्धारित केलेल्या समजूतींनी पवित्र मानली आहेत. नदी केवळ एक शब्द नसतो. तिच्याभोवती अनेकांच्या आस्था जुळलेल्या असतात. त्या सामाजिक असतील, सांस्कृतिक किंवा आणखी काही. केवळ आध्यात्मिक, धार्मिकच नाही, तर अर्थाचे आणखी काही आयाम असतात तिच्या असण्याला. अनेकांच्या अंतर्यामी उदित होणाऱ्या आकांक्षाना घेऊन ती वाहते. ती फक्त पाण्याचा प्रवाह नसते. तिच्याशी भावनिक सख्य जुळलेलं असतं.

‘गंगा’ असेल, मक्क्यामधलं ‘झमझमचं’ पवित्र जल असेल किंवा ‘दी रिव्हर जॉर्डन’ ही ख्रिश्चन धर्मात पावन मानलेली नदी. देश वेगळे असले, धर्म निराळे असले, परंपरा भिन्न असल्या, आस्थेचे रंग आगळे असले, तरी पाणी सगळ्या रंगांना आपल्याच रंगांत रंगवते, एवढं मात्र खरं. पाण्याशी असणाऱ्या अनुबंधांची अनेक कारणे शोधून सांगता येतील. काही लौकिक, काही पारलौकिक म्हणून विभागता येतील. पण त्याने आस्थेचे सगळे आयाम आकळतीलच असे नाही. प्रश्न श्रद्धेचा असतो. श्रद्धा असा परगणा आहे, ज्याची मीमांसा करणे कधी सुगम नव्हते आणि आजही आहे असे नाही. विज्ञान जेथे थांबते, तेथून श्रद्धेचा परगणा सुरु होतो अन् श्रद्धा डोळस उत्तर द्यायचे थांबल्या की, त्या वाटेने अंधश्रद्धा चालत येतात. शेवटी काय, अंतर्यामी वसती करून असलेल्या अनुबंधांना सिद्ध करण्यासाठी माणसाला प्रतीके लागतात. देव, मंदिर किंवा अन्य काही असेल. काही म्हटले तरी त्याने आस्थेत काही फारसा फरक पडत नाही. विचारांच्या वर्तुळात विहार करणाऱ्या अमूर्त संकल्पनांना भक्तीच्या चौकटीत अधिष्ठित करण्यासाठी कोरलेली ही सगळी प्रतीके. त्याचा विनियोग कोण कसा करतो, यात सगळं काही सामावलं आहे. एखाद्या बिंदूतून शक्यतांच्या अनेक रेषा जन्मतात, तेव्हा निर्णय सदसदविवेकबुद्धीने घेणे अधिक श्रेयस्कर असतं. कारण प्रत्येकाच्या काही धारणा असतात, काही धोरणे असतात. काही जमा असतात, काही खर्च असतात. त्यांची गणिते तेवढी जुळवता यायला हवीत.

गावोगावी असणारे पाण्याचे लहानमोठे स्त्रोत लोकांच्या आस्थेचे विषय आहेत. जगातल्या बहुतेक सगळ्या संस्कृती, वस्त्या नद्यांकाठी, पाण्याच्या सानिध्यात बहरल्या, हे माहीत नसणारा माणूस विरळाच. जलस्त्रोत त्याच्या जगण्याला आश्वस्त करणारा घटक आहे. त्यांच्या असण्या-नसण्याशी त्याचं आयुष्य निगडीत आहे. टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांमधे मेसोपोटॅमियाची संस्कृती वाढली. नाईल नदीकाठी इजिप्तची संस्कृती बहरली. यांगत्से आणि हुआंग नद्यांकाठी चीनची संस्कृती जन्माला आली. गंगेकाठी हडप्पा उभं राहिलं. सिंधू केवळ पाण्याचा प्रवाह नाही. त्याच्या आश्रयाने आयुष्याच्या संचिताचे संदर्भ रुजले आहेत. बहरणाऱ्या प्राक्तनाचे अभिलेख कोरले आहेत.  

बये, तू कुठवर वाहणार आहेस? अजून किती दूरवर, किती दिवस...? असा प्रश्न विचारणारा कवी आदिम बंधांना साद घालतो आहे. जगण्याच्या परिघाशी जुळलेल्या पाण्याला समजून घेत ही कविता वाहत राहते, विचारांचे तीर धरून. ऋषीचे कुळ अन् नदीचे मूळ शोधू नये असं म्हणतात; पण आपल्या अस्तित्वाची मुळं समजून घ्यायची असतील, तर स्त्रोतांच्या उगमस्थानी नांदणाऱ्या चैतन्याचा अंश समजून घेता यायला हवा. वाहत्या पाण्याला फक्त उताराच्या परिभाषा अवगत असतात. उताराने कोरलेल्या वळणांना वळसे घालत, आलिंगन देत ती धावत राहते पुढे, आणखी पुढे; संगमस्थळी पोहचून समर्पित होण्याची आस अंतर्यामी घेऊन. धावत असते, एखाद्या अभिसारिकेसारखी. किती उंचसखल प्रदेश पादाक्रांत केलेले असतात तिने. किती देशप्रदेश कवेत घेते. तिच्या वाहण्याला कोणता धर्म नाही. वाहणे हाच तिचा धर्म. कुठल्या वंशाला ती आपलं समजून घेत नाही. ना कुणाच्या बाजूने उभी राहते. ना कोणाच्या विरोधात.

मातीच्या कणातून ती पाझरते. आभाळाच्या अफाटपणाला वेढून घेते. तिच्या पाण्याला मातीचा गढूळ रंग बिलगून असतो, तसा आभाळाचा रंगही लपेटून घेते. आईच्या दुधाची सय असते ती. जपवणूक असते जिवांच्या भरण-पोषणाची. सगळं सगळं सामावून घेते आपल्या उदरात. दगडधोंडे घेते कुशीत, तेवढ्याच तन्मयतेने गुळगुळीत खडेही जपते. कधी कडेवर काळेभोर खडक घेऊन चालते. शंखशिंपले जतन करून वाढवते, तर कधी कोणी समर्पित केलेलं निर्माल्य आपल्या अथांगपणात आटवून घेते. अस्थींच्या रूपाने उरलेल्या मूठभर अस्तित्वालाही घेते आपल्या कुशीत सांभाळून. किती जिवांचा संसार तिच्या पाण्यावर तरंगत असतो. तळाशी ओंजळभर जग निर्माण करून जगत असतो. निर्व्याज जिवांना जीव लावते, तशी विषारी सापांनाही सांभाळून नेते. अमृत बनून वर्षाव करते, तशी विषही पचवून पुढे पळत राहते.

काळाची सगळी एकके घेऊन तिचं वाहणं असतं. कुठून अन् कसं? हे कागदावर आखलेल्या नकाशांच्या आकृत्यात रेषा ओढून सांगता येईलही. दाखवता येईल तिचा वळणे घेत पळणारा प्रवाह. करता येईल निर्देशित तिचा मार्ग. देता येईल एखादे नाव, ओळख म्हणून. म्हणेल कोणी आणखी काही. अर्थपूर्ण किंवा अगत्यपूर्वक. कुणी नदी म्हणतं, कुणी सरिता आणखी कुणी काही. तिचं स्रीलिंगी असणं ममतेचा स्पर्श घेऊन येतं. तिच्या असण्याचे सगळे संदर्भ वात्सल्याच्या वर्तुळात ऐकवटतात. तिच्या ‘ती’ असण्यात वेदनांचे वेद सामावले आहेत. स्वतः आटत राहते, पण आसपासच्या परगण्यांच्या पदरी प्रसन्नतेचा परिमल पेरून जाते. खरंतर एखादं पुरुषवाचक नामही धारण करता आलं असतं तिला. पण वात्सल्याचे स्त्रोत बनून झरणाऱ्या प्रवाहाला ममतेच्या वर्तुळात अधिष्ठित करता आले असते? कदाचित नाही. तिला एकाच वेळी आई अन् बाप होता येतं. पण बापाला आई होणं अवघड असतं. ममतेचे, वात्सल्याचे वाहते स्त्रोत कोमल भावनांच्या उदरातून जन्माला येतात. कदाचित कुळांचा उद्धार करण्यासाठीच स्त्रवत राहिले असतील ते ममतेचे तुषार बनून तिच्या प्रवाहातून. तिला करायचे असतील इथल्या प्रदेशाचे चतकोर तुकडे सुपीक वगैरे. म्हणून ती वाहत असेल का?

मर्यादांचे बांध घालून तिच्या वाहण्याला नियंत्रित करता येतं, बंधारे बांधून अडवताही येतं, आभाळाशी स्पर्धा करू पाहणारी धरणं उभी करून तिच्या मुक्त विहाराला सीमांकित करणंही काही अवघड नसतं. तीही आपलं अंग आक्रसून घेत आज्ञेत रहाते. कधी ओंजळभर पाण्यासाठी लोकांचे अहं जागे होतात. पाण्यासारखं रक्त वाहतं. प्रत्येकाला स्वार्थ तेवढे सापडतात. रोहिणीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोळी हाती शस्त्र धारण करून परस्परांच्या विरोधात उभे राहतात. सिंधूच्या पाण्यात वाटपावरून कलहाचे शिंतोडे उडत राहतात. ब्रह्मपुत्राचं पाणी समूहांच्या अस्मिता टोकदार करणाऱ्या संघर्षाचे कारण असू शकतं. केवळ देशाच्या सीमाच नाही, तर पाणीप्रश्न अस्वस्थतेचे कारण बनतो. हंडाभर पाण्यासाठी घडणारी मैलोनमैल पायपीट अन् कळशीभर पाण्यासाठी होणारी भांडणे; पाण्याचं नसणं किती तापदायी असतं याचं प्रत्यंतर असतं. ओंजळभर पाण्यासाठी जिवावर उठणाऱ्या माणसांसाठी नदी पाणी सांडू शकते, पण रक्त नाही. पृथ्वीचं अस्तित्व पाण्याच्या प्रवाहांनी सजलं आहे. निसर्गाने पृथ्वीला बहाल केलेली देणगी आहे ते. पाण्यासाठी युद्धं झाली आहेत, आणि पुढेही संहार होण्याची शक्यता कुठे नाकारता येते? पाण्याला अस्मितेचे आयाम लाभायला अनेक कारणे आहेत. वर्तमानाच्या वर्तुळात ते विसावलेले असतात. ते ऐतिहासिक असू शकतात अथवा पौराणिकही. पाणी अरत्र, परत्र, सर्वत्र असतं. सजीवांचा देह पाण्याच्या आश्रयानेच तर सुखनैव नांदता असतो.  

ती कृष्णा, कोयना, गोदावरी असू शकते. भिमा, नर्मदा अथवा गंगाही असू शकते. किंवा थेम्स, टेनेसी, ड्यूनॅब, मिसिसिपी, कांगो किंवा आणखी काही असू शकते. कोणतंही नाव धारण करून वाहत असली, तरी तिचं असणं जिवांची आवश्यकता आहे. ती बारमाही दुथडी भरून वाहणारी असेल अथवा हंगामी. तिच्या असण्याशी आयुष्याचे हंगाम जुळलेले असतात. बहरण्याचे ऋतू एकवटलेले असतात, तिच्या भरलेल्या पात्रात. आयुष्य बांधलं गेलंय तिच्या असण्याशी. जगणं प्रवाहित ठेवायचं असेल, तर तिचं वाहत राहणं गरजेचं आहे. अनिवार्य आवश्यकता आहे ती आयुष्याची. काळाचे लहानमोठे तुकडे दिमतीला घेऊन जीव झगडत असतात. कलह असतो तो टिकून राहण्याचा. पाणी केवळ पदार्थ नसतो, जीवन असते जिवांचे. आयुष्याचे अर्थ वाहतात त्याच्यातून. ओंजळभर पाण्याच्या स्पर्शाने सगळेच जीव आश्वस्त होतात. शुष्क पडलेलं पात्र पाहून विचलित होतात. विस्ताराची वर्तुळे सीमित करणारी कुंपणे वेढून असतात जगण्याला. काळाच्या मर्यादांचे बांध पडतात सगळ्यांनाच. पण नदीला मर्यादा पडल्या तर... मर्यादांचे अर्थच संपतील, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••