कविता समजून घेताना भाग: एकतीस

By

शब्दांनीच निषेध केलाय मुली

शब्दांनीच निषेध केलाय मुली...
काय लिहू तुझ्यावर?
कळ्यांच्या किंकाळीसाठी,
अजून तरी नाही सापडत शब्द
चिवचिव गाणं गावं तर,
कोणत्या सुरात गाऊ?
कोणतं रोपट लावू
तुझ्या कबरीवर?

उजाड दिसताहेत धर्मस्थळे
मी फकीर...
माझ्या कटोऱ्यात आसवांचे तळे

पुरुषत्त्वाची शिसारी येतेय
मेणबत्त्या पेटवून स्वतःसकट जाळावं इंद्रियांना
आणि
माणुसकीच्या नावाने फुकट करावे चांगभलं

चल अजान होते आहे...
येतो दुवा करुन
आसिफा...
इन्नालिलाही व इन्नाराजवून...

आज तुझ्याविषयी लिहिलं
माझ्या मुलीवर असं
कुणीच लिहू नये कधीच, कोठेच!


- साहिल शेख

आयुष्य एकरेषीय कधीच नसते. त्याचे अर्थ अवगत झाले की, जगण्याची सूत्रे सापडतात. मर्यादांची कुंपणे त्याला वेढून असली तरी सद्विचारांचे साज चढवून ते सजवता येतं. समाजमान्य संकेतांची वर्तुळे आकांक्षांचा परीघ सीमित करीत असले, तरी वर्तनव्यवहार सुस्थापितरित्या पार पडावेत, म्हणून त्यावर मान्यतेची मोहर अंकित करायला लागते. नीतिसंकेतांच्या चौकटीत अधिष्ठित केलेल्या गोष्टी आखून दिलेल्या मर्यादांच्या वर्तुळातून वजा होतात, तेव्हा विवंचना वाढवतात. वर्तनव्यवहार संदेहाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत राहणे वर्तनविपर्यास असतो. माणूस परिस्थितीचा निर्माता असतो की, परिस्थिती माणसाला घडवते? सांगणं अवघड आहे. पण परिस्थितीने पुढ्यात पेरलेल्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, एवढं मात्र नक्की.

काळच असा आहे की श्रद्धा, विश्वासाने बांधलेली मने अन् त्यांना सांधणारी स्नेहाची सूत्रे सैलावत आहेत. आयुष्याच्या बेरजा चुकत आहेत. जगण्याची समीकरणे अवघड होत आहेत. आयुष्याचे अर्थ शोधत निघालेली माणसे अडनीड वाटांकडे वळती होत आहेत. सुखांच्या व्याख्या स्वतःच्या परिघाइतक्याच सीमित झाल्या आहेत. उन्हाचे चटके झेलत नदीचे काठ कोरडे व्हावेत, तसा अंतर्यामी नांदणारा ओलावा आटत आहे. आला दिवस वणवा माथ्यावर घेऊन रखडत चालला आहे. स्नेहाचे किनारे आक्रसत आहेत. ऋतूंचे रंग उडत आहेत. संवेदनांची झाडे वठत आहेत. अवकाळी करपणं प्राक्तन झालं आहे. आकांक्षांची पाखरे सैरभैर झाली आहेत. वाऱ्याच्या हात धरून वाहणारा परिमल परगणे सोडून परागंदा होतो आहे. आयुष्याच्या सूत्रात आस्थेने ओवलेले एकेक मणी निसटून घरंगळत आहेत. जगण्याला असा कोणता शाप लागला आहे? माहीत नाही. पण जगण्याचा गुंता दिवसागणिक वाढतो आहे.

जगाचं वास्तव दिसतं तसं कधीच नसतं. येथे विसंगतीच्या, भेदाभेदाच्या असंख्य लहान-मोठ्या, दृश्य-अदृश्य भिंती उभ्या असतात. प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या फायद्याची आणि न्यायाची परिभाषा मतलब पाहून बदलत असते. माणूस असा का वागतो? या प्रश्नांचे उत्तर अद्याप तयार झाले नाही. कदाचित पुढे जावून ते होईल याचीही खात्री नाही. संस्कारांच्या व्याख्येत तो प्रगत परिणत वगैरे असला, तरी जीवशास्त्राच्या परिभाषेत प्राणीच आहे. त्याच्यातले माणूसपण नीती, नियम, संकेतांनी बद्ध केलेलं असलं, तरी त्याच्यातलं जनावर काही त्याला आदिम प्रेरणांचा विसर पडू देत नाही. माणूस म्हणून कितीही प्रगत असला, तरी त्याच्यातला पशू स्वस्थ बसत नाही. याचा अर्थ अवनत जगण्याचं सरसकटीकरण करता येतं असं नाही. प्रमाद म्हणून एकवेळ त्यांच्याकडे पाहता येईलही; पण प्रमादाचा परामर्श पर्याप्त विचारांनी घेण्याइतके सुज्ञपण विचारांत असायला लागते. विचारांना अभिनिवेशाची लेबले लावून महात्म्याच्या परिभाषा करण्याचा प्रयास होतो, तेव्हा माणुसकीवरचा विश्वास दोलायमान व्हायला लागतो. अंधार अधिक गडद होऊ लागतो. प्रांजळपणाचा परिमल घेऊन वाहणारा विचार अस्वस्थ होतो. हे अस्वस्थपण घेऊन कवी अंतर्यामी उदित होणाऱ्या आशंकांची उत्तरे शोधत राहतो.

‘शब्दांनीच निषेध केलाय मुली’ म्हणण्याशिवाय सामान्य माणूस वेगळं करूही काय शकतो? संवेदना सगळ्या बाजूंनी तासल्या जातात, तेव्हा बोथट महात्म्याशिवाय उरतेच काय आणखी शिल्लक? आयुष्यात आगंतुकपणे आलेली अगतिकता माणूस म्हणून आपणच आपल्याला प्रश्न विचारत राहते. सगळे विकल्प संपतात, तेव्हा हताशेशिवाय हाती काहीही शेष राहत नाही. हतबुद्धपण घेऊन येणारे कवीचे शब्द संवेदनांचे किनारे कोरत राहतात. आपणच आपल्याला खरवडत राहतात. समाजाचे व्यवहार नीतिसंमत मार्गाने चालतात, तेव्हा संदेहाला फारसा अर्थ नसतो. सत्प्रेरीत विचारांना आयुष्याचे प्रयोजन समजणाऱ्यांनी आसपास उभी केलेली नैतिकतेची लहानमोठी बेटे त्यांची उत्तरे असतात. पण मूल्यांना वळसा घालून प्रवास घडतो, तेव्हा उत्तरे काळाच्या पडद्याआड दडतात. त्याच्या विक्राळ आकृत्या तेवढ्या डोळ्यांसमोर फेर धरतात. अंधाराला चिरत चालत येतात अन् परत परत प्रश्न विचारतात, असं का घडतंय?

कोण्या मानिनीची होणारी मानखंडना माणसांनी निर्मिलेल्या मूल्यप्रणीत विचारांचा जय असू शकत नाही. माणूस एकवेळ हरला तरी चालेल, पण माणुसकी पराभूत होणं न भरून येणारं नुकसान असतं. माणूस विचारांनी वर्तला, तर माणुसकी शब्दाला अर्थाचे अनेक आयाम लाभतात. अविचारांनी वागला तर आशय हरवतात. मनात अधिवास करून असणारे विकार चांगुलपणाचं विसर्जन करतात. संस्कारांच्या कोंदणात सामावलेलं सहजपण संपवतात. ज्या प्रदेशात मानिनीच्या सामर्थ्याच्या गोष्टी अधोरेखित केल्या जातात, मातृत्वाचे सोहळे साजरे होतात, वात्सल्याचा गौरव केला जातो, पराक्रमाच्या कहाण्या सांगून सजवल्या जातात, महानतेची परिमाणे देऊन मखरात बसवले जाते, तेथे मनोभंग करणारी घटना घडते, तेव्हा पराभव संस्कृतीचं अटळ भागधेय होते. केवळ मादी म्हणून वासनांकित नजरेने तिच्याकडे बघितले जाते, तेव्हा महात्म्याचे सगळे अर्थ संपलेले असतात.

नऊ-दहा वर्षाच्या मुलीचं वाऱ्यासोबत भिरभिरायचं, झुळझुळ पाण्यासोबत वहायचं, पक्षांसोबत उडायचं, फुलपाखरासोबत बागडायचं वय. जगाच्या कुटिल कारस्थानांपासून कोसो दूर असणारं तिचं निर्व्याज जग अन् त्यातलं स्वप्नवत नितळ जगणं. पण त्या सुंदर स्वप्नांना कराल काळाची नजर लागते. आक्रीत वाट्याला येतं. आघाताने अवघं आयुष्यच क्षतविक्षत होतं. उत्क्रांतीच्या वाटेवरून चालत आलेल्या; पण पशूपासून माणूस न बनलेल्या विषारी नजरा ती केवळ मादी म्हणून अत्याचार करत असतील, तर त्याला माणुसकीच्या कोणत्या तुकड्यात मोजणार आहोत? पशूंच्या जगात मर्यादांचे उल्लंघन नसते. त्यांच्या आयुष्यात अनुनयाला अस्तित्व असलं, तरी अत्याचाराला जागा नसते. माणूस प्रगतीच्या, मूल्यांच्या, नैतिकतेच्या वार्ता वारंवार करतो. हीच असते का प्रगतीच्या वाटेने चालत आलेल्या पावलांची परिभाषा?

निरागस जिवावर घडलेल्या अत्याचाराने व्यथित झालेला कवी काय लिहू तुझ्यावर म्हणतो, तेव्हा माणुसकीच्या सगळ्या परिभाषा परास्त झालेल्या असतात. कोवळ्या कायेवर आघात होताना उठलेल्या तिच्या किंकाळीसाठी कोणते शब्द वापरावे? कळ्यांच्या उमलत्या स्वप्नांचा होणारा चुराडा मांडायला नाहीच सापडत शब्द. आयुष्याचे सगळेच सूर सुटले असतील, ताल तुटले असतील तर चिवचिव गाणं गावं कसं? हतबुद्ध मनाने कोणत्या परगण्यातून सूर शोधून आणावेत? आवाजच गलितगात्र झाला असेल, तर शब्दांना स्वरांचा साज चढेलच कसा? कोणत्या सुरात गाऊ तुझ्यासाठी? विचारणारा कवीचा प्रश्न मनात वसती करून असलेल्या संवेदनांना कोरत राहतो.

काळही क्षणभर थिजला असेल का तिच्या देहाच्या चिंध्या होताना? विकृती पाहून त्यानेही हंबरडा फोडला असेल का? कोमल मनाचे तुकडे होताना कोणत्या दिशा गहिवरून आल्या असतील? देह संपतो, पण मागे उरणाऱ्या आठवणींची रोपटी मनाच्या मातीतून कशी उखडून फेकता येतील? माणूस साऱ्या सुखांच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगणारे सगळेच धर्म का पराभूत होत असतील, विकारांनी विचलित झालेल्या परगण्यात? मांगल्याची आराधना करणारी धर्मस्थळे अविचारांच्या वावटळीत ध्वस्त होत जातात. ती नूर हरवून बसतात, तेव्हा सौंदर्याची परिमाणे संपलेली असतात. उजाडपणाचे शाप ललाटी गोंदवून घडणारी अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण त्यांचं प्राक्तन बनतं.

मी फकीर माझ्या कटोऱ्यात साचलेल्या आसवांच्या तळ्याशिवाय तुला द्यायला काही नाही म्हणताना कवीच्या मनाची अगतिकता सद्विचारांच्या पराभवाचं शल्य बनून प्रकटते. काळजाला लागलेली धग वेदना घेऊन वाहत राहते वणव्यासारखी, वारा नेईल तिकडे. माणसाच्या अंतर्यामी नांदणाऱ्या संवेदनाच पराभूत झाल्या असतील, तर कुठल्या क्षितिजांकडे सत्प्रेरीत विचारांचे दान मागावे? पुरुष म्हणून परंपरांनी मान्यता दिलेलं पुरुषत्त्व मिळालं, ही काही स्वतःची कमाई नसते. पुरुष म्हणून नियतीने काही गोष्टी पदरी घातल्या असतील, तर त्यात कसला आलाय पराक्रम? पण त्याच पुरुषत्वाच्या परिभाषा एखाद्या असहाय जिवाच्या आयुष्याची वेदना होतात, तेव्हा पुरुषपणाचा टेंभा मिरवण्यात कोणतं सौख्य सामावलेलं असतं? मेणबत्त्या पेटवून घटनांचा निषेध करता येतो, पण विरोध म्हणजे अविचारांना मिळणारा विराम नसतो. मुक्तीच्या मार्गावरून प्रवास घडावा, म्हणून प्रार्थनाही केल्या जातात. पण प्रार्थनांच्या प्रकाशात पावलापुरती वाट सापडेलच, याची शाश्वती देता येते का? प्रकाशच परागंदा झाला असेल, आयुष्यात अंधारच नाचत असेल, तर कोणत्या प्रार्थना फळास येतील?

मनाच्या मातीआड दडलेला क्रोध प्रश्न विचारात राहतो, स्वतःसकट जाळावं का इंद्रियांना आणि माणुसकीच्या नावाने फुकट करावं का चांगभलं? कवितेतून वाहणारी वेदना उद्विग्नता घेऊन पसरत जाते विकल मनाच्या प्रतलावरून. अंतर्यामी वसतीला आलेली असहायता माणुसकीच्या पराभवाच्या खुणा शोधत राहते. कुठूनतरी अजान होत असल्याचे आवाज कानी येतात. तेवढाच अंधारात एक कवडसा दिसतो आहे. त्याचा हात धरून निघालो, तर सापडतील काही उत्तरे आपणच केलेल्या आपल्या पराभवाची. मर्यादांचे परीघ घेऊन आलेल्या माणसाला प्रार्थनांशिवाय आणखी दुसरे काय करता येण्यासारखे आहे? प्रार्थनांनी जगाचे व्यवहार बदलतील की नाही, माहीत नाही. पसायदानाचे अर्थ आकळले की, चुकलेल्या पावलांना अन् भरकटलेल्या विचारांना आपलेपणाचा ओलावा लाभतो. पण संवेदनांनीच जगण्यातून काढता पाय घेतला असेल तर? आसिफा तुझ्यासाठी दुवा करुन येतो, म्हणून कवी नियंत्याच्या पदरी निवारा शोधतो. या दुवा सफल होऊन मुक्तीचे मार्ग दाखवतील, ही आस मनात अधिवास करून असते.

अभागी जिवासाठी लिहणं घडल्याची खंत कवीच्या मनात अस्वस्थपण पेरत राहते. हे लिहिण्यात काही सुखांचा शोध नव्हता. आपणच आपल्यापासून उखडत चालल्याची वेदना अजूनही तशीच वाहते आहे त्याच्या विचारातून. एक निरागस जीव अविचारांच्या वणव्यात भस्मसात झाला. उमलण्याआधीच कळी कुरतडली गेली. मातीच्या कुशीत माती होऊन कोवळा देह विसर्जित झाला. पण माणुसकीचाही पराभव झाला. माणूस म्हणून जगण्यावर अनेक प्रश्नचिन्हे अंकित झाली. हळहळ व्यक्त करण्याशिवाय काही करू शकत नाही, ही माझी अगतिकता. असं कवी म्हणतो, तेव्हा ‘पराधीन आहे पुत्र जगी मानवाचा’ म्हणतात यावर विश्वास ठेवावा लागतो. भविष्यात माझ्या किंवा कोणाच्या मुलीवर असं कुणीच लिहू नये कधीच, कोठेच, म्हणून विश्वाचे व्यवहार नियंत्रित करणाऱ्या शक्तीकडे पदर पसरून मागण्याशिवाय सामान्य वकुब असणारा माणूस काय करू शकतो?

माणसांच्या जगण्याला मोहरलेपण देणारे, माणसाची प्रतिष्ठा राखणारे भेदरहित जग आकारास आणण्याची वार्ता करायची. त्यासाठी एकीकडे त्याला आश्वस्त करायचे आणि दुसरीकडे विसंगतीने नटलेलं आणि रक्तलांच्छित खेळाने रंगलेलं जग सोबतीला आहे ते आहेच. त्याचे विसकटलेले रंग अजूनही माणसांना बदलता आलेले नाहीत. जगणे उसवत आहे. सामान्य माणसांनी अशा जगण्याला नशीब म्हणून स्वीकारायचे, आला दिवस असंख्य प्रश्नांच्या आवर्तात भिरभिरत राहायचे, हे प्राक्तन होऊ पाहत आहे. नियतीने नशिबी लादलेले भोग घेऊन माणसे अस्वस्थ वणवण करीत आहेत. जग कसे आहे, कसे असावे, याबाबत जाणकारांचे मत काही असो, जगाच्या व्यवहाराचे पीळ कसेही असोत. सामान्यांच्या आकलनापलीकडील या गोष्टी असतात. कोण चूक, कोण बरोबर, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायला त्यांना नियती उसंतच देत नसते. त्यांचं जगणंचं वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यासारखे, असंख्य प्रश्नांच्या आवर्तात गरगर फिरणारे.

कलहाने फाटलेले आणि संघर्षाने विटलेले जग सोबत घेऊन माणूस किती काळ सुखाच्या शोधात भटकणार आहे? आपलेपणाचा ओलावा आटलेलं, ओळख हरवलेल्या चेहऱ्याचं जगणं आम्ही पुढच्या पिढ्यांच्या हाती देणार आहोत का? माणूस म्हणून प्रत्येकाला अस्तित्व असणारं जगणं देण्यासाठी काहीच न करणारं जग देणार आहोत का? आरंभ, स्थिती, लय क्रमाने जिवांची जीवनयात्रा सुरु असते. देहासह नांदणारे चैतन्य एक दिवस संपते. शिल्लक काहीही उरत नाही. उरल्याच तर स्मृती. पण एखाद्याच्या जाण्याने अनेकांच्या पापण्यांच्या कडा ओलावतात. अंतर्यामी अनामिक अस्वस्थता दाटून येते. ओळखीचे कोणी असेल तर माणसे हळहळतातच; पण अशीही काही माणसे असतात, ज्यांना आयुष्यात आपण कधीही पाहिले नसते. ना त्यांचा देश ठाऊक असतो, ना त्यांचे नाव-गाव ठावूक असते. त्यांचे अनपेक्षितपणे जाणे समोर येते आणि विचलित होतो. ज्याच्याजवळ वेदनांनी गहिवरणारं मन अन् सहवेदना बनून प्रकटणारी भावना आहे, डोळ्यांमध्ये आसवांचे दोन थेंब आहेत अशी माणसे अस्वस्थ होतात, हे अस्वस्थपण माणसातील माणूसपण शिल्लक असल्याचे द्योतक असते. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment