कविता समजून घेताना भाग: बत्तीस

By // No comments:

आरसे दिपवून टाकतात डोळे

परीक्षानळी बदलल्याने वा
कागदावरचं सूत्र मागेपुढे फिरवल्याने
रिझल्ट बदलत नसतो रासायनिक समीकरणाचा
हे पक्क ठाऊक असूनसुद्धा
आरसे चमकवले जातात विशिष्ट वेळाने
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर
अन् दिपून जातात काचबिंदू झालेले
गारगोटीगत डोळे

नितळ पाण्यात दिसावा तळ
अथवा झिरझिरीत कपड्यात
दिसावेत नटीचे योग्य उंचवटे
एवढं स्पष्ट उत्तर दिसत असूनसुद्धा
गणित अधिक किचकट केलं जातंय
दिवसेंदिवस शेतीचं

लाखो हेक्टरवर पसरलेला
हा करोडो जीवाचा कारभार
हजारो वर्षापासून जगतोय
आपल्या मूळ अस्तित्वासह
हे दुर्लक्षून दिली जातायत त्यांच्या हातात
हायब्रिड, बीटीसारखी इंग्लिश नावाची वाणं
त्यांनी कसा घालावा ताळमेळ
या ब्रँडेड बियाणांचा अन् उकिरड्यावरच्या शेणखताचा
फुगत चाललेल्या ढेरीगत वाढणाऱ्या
औषध खताच्या किमती
उठताहेत शेतकऱ्याच्या जिवावर
अन् त्यातील विषारी घटक पिकावर

धर्मभेद अन् प्रांतभेदाचं काळाकुट्ट गोंदण मिरवणाऱ्या
या देशाच्या भाळावर आता भरला जातोय
वर्गभेदाचा टिपिकल मळवट कुशलतेने
जाणते-अजाणतेपणाने शांत बसलेले असताना
मला विचारायचंय कलावंत, विचारवंतांना
त्यांच्या विचारांची दिशा

मूठभर हितसंबंधी गटाचं पडतंय प्रत्येक पाऊल
ही दरी वाढण्यासाठी
अन् गळ्यापर्यंत गडलेल्यांना
अधिक खोल गाडण्यासाठी

शेळ्या, कोंबड्या, मांजरं, म्हशी, बैल, म्हातारी, कर्ती,
कच्या-बच्याच्या एकत्रित कुटुंबापेक्षा
२+१ ची पॉलिश फॅमिली
किती इम्पोर्डेड झालीय या डिजिटल इंडियात

हा शंभर मजल्याचा टॉवर
ही नामू मांगाची झोपडी
तो पाचशे करोडचा उद्योग
तो गंगू कैकड्याचा तळ
ते इंटरनॅशनल मार्केटिंग
ती रुपयाला कप दूध विकत
आख्खी सकाळ विकणारी मथुरामाय
ते कपड्याचे, ज्वेलरीचे ब्रँड
तो सूती जडाभरडा पटका
लक्झरी गाड्यांची लॉंचिंग स्पर्धा
आठवडा बाजारात करडाचा होणारा सौदा
हे दिपवून टाकणारे वैभव
हा काळवंडून जाणारा वर्तमान
ही दरी, हा डोंगर वाढवतंय कोण?
समस्त विचारवंतांनो,
तुम्हालाच कळू शकतं या प्रश्नाचं गांभीर्य!


ईश्वरचंद्र हलगरे


प्रश्न कालही होते, तसे आजही आहेत. त्यांचा चेहरा तेवढा बदलला आहे. तसाही तो बदलतच असतो. मुखवटे प्रिय वाटायला लागले की, चेहऱ्याची तशीही फारशी नवलाई राहत नाही. कालच्या प्रश्नांची धार वेगळी होती. आजच्या प्रश्नाचे पाणी वेगळे आहे, एवढेच. प्रश्न तर कायम आहेतच. कदाचित आजचे प्रश्न टोकदार झाले असल्यामुळे अधिक बोचणारे ठरतात. काल माणसासमोर प्रगतीचे कोणते पाऊल प्रथम उचलावे, हा प्रश्न होता. आज अधोगतीपासून अंतरावर ठेवावे कसे, हा प्रश्न आहे. विसंगती घेऊन वहाणारे विचार सुसंगत मार्गाने किनारे गाठतील कसे, ही विवंचना आहे. विद्वेषाचे वणवे भडकलेले असताना सुरक्षित राहावे कसे, त्यांना थांबवावे कसे? हा प्रश्न आहे. जगाचे अन् जगण्याचे प्रश्न गुंतागुंतीचे झाले आहेत. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या साक्षीने अधिक जटिल होत आहेत. कधीकाळी खूप मोठ्ठे वाटणारे जग आज हातात सामावण्याएवढे लहान झाले आहे. स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर ते दिसते. संगणकाच्या पडद्यावर ते आलंय. पण मनावर त्याच्या सुसंगत प्रतिमा काही आकारास येत नाहीयेत. माणसांच्या मनात माणूसपण पेरावं कसं? हा खरा प्रश्न आहे.

प्रश्न आतले आहेत, तसे बाहेरचेही आहेत. त्यांच्याशी संघर्षरत राहावे लागतेच. पण तरीही एक प्रश्न उरतोच, सुरवात नेमकी करावी कोठून अन् कशी? अपर्याप्तता, अस्थिरता संयत, संथ जगण्याला मिळालेला अभिशाप असतो. अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन तो व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करीत राहतो. वेदनांची चिरंजीव सोबत काही टळत नाही. वांझ ओझी निमूटपणे वाहणे नियतीने लिहिलेले अभिलेख ठरत असतील, तर प्राक्तनाला दोष देऊन विचलित आयुष्यात कोणते बदल घडून येणार आहेत? काही ओझी सहजी फेकता येत नाहीत, हेच खरे. असे असले तरी अंतरी अधिवास करून असणारे आस्थेचे धागे सहजी सुटत नसतात.

परिवर्तनाला पर्याय नसतो, हे मान्य! आयुष्यात वसती करून असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करून प्रगतीचे पथ नाही आखता येत हेही खरेच. काळाचे हात धरून चालत आलेल्या आभासी सुखांनी हजार स्वप्ने मनावर गोंदवली. विकल्पांच्या व्याख्या तयार करून पूर्तीसाठी पर्याय दिले गेले. आकांक्षांचा रुपेरी वर्ख लावून आयुष्याला  सजवले. साचे तयार करून सुखाच्या व्याख्या त्यात बसवल्या, पण तळापर्यंत काही पोहचता आलं नाही त्यांना. अभावाचाच प्रभाव असणाऱ्या आयुष्यात अभ्युदयाची स्वप्ने पाहत ओंजळभर सुख चतकोर अंगणी नांदते ठेवणाऱ्या वाटांचा शोध घेत वणवण करणाऱ्या पावलांना त्या काही गवसल्या नाहीत.

प्रशासकीय प्रमाद आणि राजकीय खेळांच्या हितसंबंधांनी होणाऱ्या शोषणातून सामान्यांच्या जगण्याला अधिक केविलवाणेपण येत असल्याने त्यांचे संघर्ष अधिक क्लेशदायी होत आहेत. व्यवस्थेतील साचलेपण वर्तनविपर्यासाच्या कहाण्या होतात, तेव्हा अस्मिताविहीन जगण्याचे ताण अधिक गुंतागुंतीचे होतात. भूमिहीन, बेरोजगार, बेघर, बेदखल समूहाच्या वेदना या कवितेतून दुःखाचे कढ घेऊन वाहत राहतात. परिवर्तनाला प्रगतीचे पंख लाभले; पण सामान्य माणसाची पत आणि त्याच्या जगण्याचा पोत काही प्रगतीच्या वार्ता करणाऱ्या जगाला कळलाच नाही. स्वप्ने सोबत घेऊन आलेल्या पावलांनी ओंजळभर परगणे समृद्ध झाले. पण क्षितिजांना कवेत घेणारा विशाल पट दुष्काळी आभाळासारखा रिताच राहिला. आपलेपणाचा ओलावा घेऊन वाहणारे अनुबंध परिस्थितीच्या आघाताने तुटत आहेत. आस्थेचे प्रवाह आटत आहेत. परिवर्तनाचा हात धरून आलेल्या प्रगतीच्या परिभाषा सुखांचे निर्देशांक दाखवणाऱ्या आलेखाचे शीर्षबिंदू झाल्या, पण सामान्यांच्या मनात सजलेल्या समाधानाच्या व्याख्या काही होऊ शकल्या नाहीत. ग्लोबलच्या बेगडी वेस्टनात लोकल हरवत आहे. हरवलेपणाची सल घेऊन ही कविता एक अस्वस्थपण मनात पेरत जाते.

काळाचे संदर्भ काही असोत. त्यांच्या असण्या-नसण्याचे अर्थ तपासून पाहावे लागतात. समाधानाच्या मृगजळी व्याख्या समृद्धीची गंगा दारी आणत नसतात. समर्थपण समजून घेण्यासाठी व्यवस्थेतील विसंगतीची संगती लावता यायला हवी. कवी ही विसंगती नेमक्या शब्दांत अधोरेखित करतो. विचारांच्या साक्षीने जीवनाच्या व्याख्या करणाऱ्यांना प्रश्न विचारतो. बेगडी झगमगाटात वास्तव झाकोळले जात असेल, फसव्या प्रगतीच्या प्रखर प्रकाशझोतात वैगुण्ये दिसणार नाहीत याची नेटकी व्यवस्था केली जात असेल, तर पसरलेल्या उजेडाला आपलेपणाची किनार लाभेलच कशी? परीक्षानळीतील द्रव्य बदलून प्रयोग करता येतात, पण प्रयोगांच्या नावाने नळी बदलून नवे काही हाती येण्याची शक्यता शून्याइतकी सत्य असते. कागदावर कोरलेली विकासाची सूत्रे मागेपुढे फिरवल्याने समीकरणांच्या निकालात काही फरक पडत नसतो; पण दृष्टिभ्रम मात्र पद्धतशीरपणे पसरवता येतो. हे ठाऊक असूनसुद्धा स्वार्थाला परार्थाची लेबले लावून दिपवून टाकता येते. अर्थात, स्वप्नेही दुर्मीळ असलेल्या डोळ्यांना त्यांचंही अप्रूप वाटत असतं.

नितळ पाण्याच्या तळाशी विसावलेली वाळू, दगड सुस्पष्ट दिसावेत इतकं ठसठशीत चित्र समोर असताना संदर्भांना उगीच महात्म्याची पुटे चढवून उत्तरांच्या व्याख्या अधिक जटिल केल्या जातात. उत्तर दिसत असूनसुद्धा हेतुपूर्वक शेतीमातीचं गणित अधिक किचकट केलं जातंय. विकासाचे आराखडे आखायचे. आलेखांच्या चढत्या रेषा प्रगतीच्या रंगांनी रंगवायच्या. प्रगतीचे सोपान उभे करून आसपासचे परगणे सुजलाम सुफलाम करीत असल्याचे आश्वस्त केलं जातं. पण पुढे काय? लाखो हेक्टरवर पसरलेला करोडो जिवांचा पसारा हजारो वर्षापासून आपल्या मूळ अस्तित्वासह जगतोय. या वाटचालीत त्याने आयुष्याचे काही अर्थ शोधले, संकल्पित सुखांच्या काही व्याख्या तयार केल्या, समाधानाची काही सामायिक परिमाणे आखली. शेतीमातीचे मनोगते ज्ञात असणाऱ्यांना आतल्या आवाजाला प्रतिसाद देणे शिकवावे नाही लागत, पण बाहेरचे आवाज मोठे करून तेच आणि तेवढे वास्तव असल्याचे मनावर अंकित केले जाते, तेव्हा बहिरेपणालाही बरकत येते. प्रतिसादाचे शास्त्रीय पाठ पढवले जातात. प्राप्त परिस्थितीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून हायब्रिड, बीटीसारखी इंग्लिश वाणं आकर्षक जाहिरातींच्या वेस्टनात वेढून हाती सुपूर्द केली जातायेत. मनात संदेह उदित होऊ नयेत म्हणून झगमग प्रकाशात दिसणाऱ्या सुखांचे गारुड घालून आभासी काळजी घेण्यात कोणतेही न्यून राहू दिले जात नाही.

क्रांती वगैरे सारंसारं खरं. पण क्रांतीच्या उदरात सौख्य सामावले असेल अन् तळापर्यंत तिच्या पावलांचा वावर असेल, तर त्यात संदेह असण्याचे कारण नाही. कोणी सामाजिक क्रांतीचे योगदान अधोरेखित करते, कोणी हरितक्रांतीच्या पावलांनी चालत आलेल्या बदलांना मुखरित करतात. असे करू नये असे नाही. यांचे योगदान नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. पण विज्ञानतंत्रज्ञानाचे पंख लावून आलेल्या ब्रँडेड बियाणांचा अन् उकिरड्यावरच्या खतात शेतीचं गणित शोधणाऱ्यांनी नवी सूत्रे घेऊन आलेली समीकरणे सोडवायची कशी? परंपरेने दिलेल्या शहाणपणाचा पराभव आणि प्रगतीच्या परिभाषा घेऊन आलेल्या बदलांचा ताळमेळ घालायचा कसा? परंपरेने दिलेल्या सूत्रांवर शेतीचं अर्थशास्त्र जुळवणाऱ्या शेतकऱ्याला कशी पेलवेल यांची आकाशगामी झेप? सुखांच्या चांदण्यांनी हसणारी क्षितिजे कवेत घेण्यासाठी भरारी घेणारे पंख कोठून दत्तक आणावेत? जमिनीच्या चतकोर तुकड्याला आकांक्षांचे गगन मानणाऱ्याचे पंख कापण्याचे प्रयोग होत असतील, मातीशी सख्य साधणारी मुळंच उखडून फेकली जात असतील तर? त्याच्या आयुष्याच्या अर्थशास्त्रातून अर्थच हरवत असतील, तर जगण्याची अर्थपूर्ण संगती लावायची कशी?

समतेच्या सूत्रांचा उद्घोष करायचा. परंपरेचे किनारे धरून वाहत आलेल्या संस्कारांचा जयघोष करायचा. दीर्घ सांस्कृतिक वारसा असल्याच्या वार्ता वारंवार करीत राहायच्या. साहिष्णूपणाचे गोडवे गायचे. हे दृश्य एकीकडे, तर दुसऱ्या बाजूला दुभंगलेपण आहे ते आहेच. प्रभूची लेकरे सारी म्हणीत प्रार्थनांचे सामुहिक सूर छेडत राहायचे. समूहाची सोबत करीत छेडलेल्या सुरांचे अर्थ सापडतातच असे नाही. तो केवळ सोबतीने केलेला सोपस्कार होत असेल, तर आशयाला कोणते अर्थ राहतात? प्रार्थनांच्या निनादणाऱ्या आवाजात आयुष्याचे सूर सापडण्याऐवजी स्वरांचा साज सुटत असेल, तर जगण्याचे गाणे व्हावे कसे? आपल्या परंपराविषयी आस्था असण्यात गैर काही. त्यांचा रास्त अभिमान असण्यात काहीही वावगे नाही. पण केवळ आम्हीच श्रेष्ठ असल्याचा आग्रह किती संयुक्तिक असतो? आपणच महान वगैरे असल्याचे बेगडी अभिनिवेश घेऊन एखादा परगणा नांदतो, तेव्हा अस्वस्थपणाशिवाय हाती काय लागते? प्रत्येकाला आपल्या आणि केवळ आपल्या वर्तुळांपेक्षा अधिक काहीही नको असते, तेव्हा एकात्मता वगैरे विषय भाषणापुरते उरतात. अभिनिवेशांना आपलेपण समजण्याचा प्रमाद घडत असेल, तर ‘विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे’, हे शब्द फक्त शाळेत म्हटल्या जाणाऱ्या प्रतिज्ञेपुरते उरतात.

एखाद्या गोष्टीचा वाजवी अभिमान असणे एक गोष्ट अन् निरपेक्ष भावनेने तो आचरणात आणणे दुसरी. पहिली इतकी सोपी अन् दुसरीइतकी अवघड कोणतीही नाही. भेदाच्या भिंतींची उंची वाढत असेल अन् ललाटी वर्गभेदाचा मळवट भरून रंगांना वैविध्याची लेबले लावली जात असतील, तर याला वंचनेशिवाय आणखी कोणत्या शब्दांत लिहिता येईल? विखंडीत मानसिकता घेऊन व्यर्थ वल्गना करणाऱ्यांपेक्षा विचारवंतांचे मौन अधिक क्लेशदायक असते. विचारवंतांच्या विचारांनी विश्वाला वर्तनाच्या दिशा कळतात. कळणे आणि वळणे यात असणारे अंतर पार करावे लागते. आखून दिलेल्या वाटेने चालणे सुलभ असते. अज्ञात परगण्यांचा शोध घेण्यासाठी रस्ते शोधावे लागतात. म्हणूनच कवी जाणते-अजाणतेपणाने शांत बसलेल्या विचारी माणसांना विचारतात, तुमच्या विचारांचे प्रवाह नेमके कोणते उतार धरून वाहतात? प्रगतीला परिभाषेच्या मखरात मंडित करून आखलेल्या विचारांच्या कोरीव चौकटी घेऊन मूठभर हितसंबंधी गटांचे पाऊल अंतराय निर्माण करण्यासाठी पडत असेल अन् गळ्यापर्यंत गडलेल्यांना अधिक खोल गाडण्यासाठी असेल, तर अशावेळी विचारांच्या साक्षीने विश्वाच्या कल्याणाच्या वार्ता करणाऱ्यांनी स्वस्थ राहणे कितपत संयुक्तिक असते?

एकीकडे झगमग पाहून डोळे दिपतात, तर दुसरीकडे तगमग पाहून ओलावतात. देखाव्याच्या आकर्षकपणात दुःखे दुर्लक्षित होणे, आपणच आपल्याशी केलेली प्रतारणा ठरते. झगमगाटात सगळंच सुंदर दिसतं असल्याचा भ्रम वाहतो आहे. वेगाचे पंख घेऊन सगळेच विहार करत आहेत. याहून अधिक वेग घेऊन धावायची व्यवस्था होते आहे. शेतीमाती, बैलबारदाना शब्दांचे अर्थ कोशापुरते उरलेत. सुखांच्या शोधात भटकणारी माणसे चकचकीत घरात येऊन विसावलीत. सुखांच्या चौकटी पांघरून बसलेल्या घराचं घरपण मागेच कुठेतरी राहीलं. उरले आहेत केवळ सांगाडे. त्यांना आकार आहे; पण आपलेपण घेऊन वाहणारा ओलावा कधीच आटला आहे. घराचं घरपण नांदत्या गोकुळात असायचं, हे गोकुळच विखरत आहे. सर्वसुविधांनीयुक्त घरे उभी राहिलीत. पैशाने सुखे विकत आणली, पण समाधान उसनवार आणता नाही येत. टू बीएचकेची पॉलिश फॅमिली आयात केली, पण समाधान काही कुठे उत्पादित करता येत नाही. ते अंतरंगात असते. अंतरंगातले रंगच हरवले असतील तर...

आभाळाशी गुज करणारे टॉवर तोऱ्यात उभे राहत आहेत. त्याच्या पायाशी अंग आक्रसून बसलेली नामू मांगाची झोपडी प्रगतीच्या परिभाषेत नाही बसत. तिचं असणं व्यंग वाटू लागते, आभाळाशी स्पर्धा करणाऱ्या उंचीला. बाधा बनून बसली आहे ती. तिच्या अस्तित्वाला विसर्जित करण्याचे प्रयास इमाल्यांच्या सौंदर्याच्या परिभाषेत रास्त ठरतात. करोडो रुपये टाकून उभ्या केलेल्या उद्योगाला गंगू कैकड्याचा तळ कसा सोसवेल? शेकडो वस्तूंचा संभार अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या सुपरशॉप्स, मॉलच्या कल्चरमध्ये अॅग्रीकल्चर नाही सामावत. टॅग टाकून गोंदलेल्या किमती स्कॅन करणाऱ्या झगमग व्यवहाराला रुपयाला कपभर दूध विकण्यासाठी  सगळी सकाळ वणवण करणाऱ्या मथुरामायच्या मनातले काहूर कळेल कसे? तिची तगमग समजेलच कशी? ब्रँडेड कपड्यांचा, ज्वेलरीचा तोरा मिरवणाऱ्यांना फाटक्या कपड्यात वावरणाऱ्या विकल आकृत्या दिसत नसतात. डोळ्यांवर चढलेली ब्रँडसची चमक आसपासची लक्तरे नाही दिसू देत. आभूषणे परिधान करून नितळ अंगकांती अन् कमनीय बांधा मिरवणाऱ्या आखीव सौंदर्याच्या उन्मादाला जडाभरडा पटका पेलवणं अशक्य. लक्झरी गाड्यांच्या विक्रीचे उच्चांक करणाऱ्यांना काळजाचा तुकडा बनून संभाळलेल्या करडाचा बाजारात होणाऱ्या सौद्यातील घालमेल कशी आकळेल?

मती गुंग करून टाकणारे, डोळे दिपवून टाकणारे वैभव, त्याची आसमंतात पसरलेली आभा, हे सुखाचं चित्र एकीकडे. दुसरीकडे आयुष्य करपवून टाकणारं जगणं. क्षणक्षणाने हातातून निसटणारा वर्तमान... ही दरी, हा डोंगर वाढवतंय कोण? खरंतर माणूस हेच एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कसा वागेल, हे सांगावे कसे? जगाची वागण्याची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? अशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून वावरताना नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••