कविता समजून घेताना भाग: तेहतीस

By // No comments:

झऱ्याजवळच होते राहत


झऱ्याजवळच होते राहत
पण घडे भरून
घेतलेच नाहीत
नदी तर वहात
होती शेजारूनच
काठाकाठानेच
राहिले हिंडत

पाऊस कोसळायचा
घरांभोवती
धुवांधार
आंत आंत
कोरडीच रहात गेले
कोरडीच

फुलवले फुलांचे
ताटवे सभोवती
एकही फूल नाही
माळू शकले केसांत

दवबिंदूंना राहिले गोंजारीत
पण म्हणावी अशी
भिजलेच नाहीं
भिजलेच नाहीं

साऱ्या ऋतूंनी
आपलं मानलं
माझ्याभोवती
फेर धरला सतत
मी मात्र एकाकीच
होत गेले
एकाकीच...
एकाकीच...!


प्रा. डॉ. सौ. रामकली पावस्कर

आयुष्य असा एक शब्द ज्याचा अर्थ शोधत निष्कर्षाप्रत पोहचण्यास आयुष्य अपुरे पडते. पण याचा अर्थ असा नाही की, त्याचे अर्थ शोधण्याचा प्रयास कोणी केला नाही. सृष्टीत सर्वत्र कुतूहल पेरलेलं आहे. ते वाचायचं. वेचायचं. त्याचे अर्थ समजून घेण्यासाठी मनाच्या मातीत आकांक्षेचे अंकुर रुजवता यायला हवेत. तेवढा ओलावा अंतरी जपता यावा. समाधानाचा सांगावा घेऊन येणाऱ्या वाटा शोधता याव्यात. सुखांच्या चांदण्या मनाच्या आसमंतात पेरता आल्या की, प्रकाशाचे कवडसे साद घालू लागतात. आयुष्याला साफल्याचा गंध लाभावा, पर्याप्त समाधान अंगणी नांदते राहावे, ही स्वाभाविक कांक्षा असते. आयुष्याकडे पाहण्याच्या प्रत्येकाच्या काही धारणा असतात. काही विचार असतात. काही श्रद्धा असतात. काही गणिते, काही सूत्रे असतात. ते घेऊन उत्तरे शोधावी लागतात. शोधाला पर्यायी विकल्प नसतो. आहे ते अन् आहे तेवढंच आपलं म्हणून चालत राहावं. उपसत राहावं स्वतःच स्वतःला. शोधत राहावं प्रत्येकवेळी नव्याने आपणच आपल्याला. कुणी वणवण म्हणेलही याला. ही भ्रमंतीच जगण्याची श्रीमंती असते. हा शोधच आयुष्य असतं नाही का? जो कधी पुरा होत नाही. काही थोडं हाती लागावं. पण पुढच्याच पावलावर आणखी दुसऱ्या विभ्रमांनी खुणावत राहावं. शेवटी सगळे सुखाच्या शोधातच तर भ्रमंती करत असतात. समाधानाचे तुकडे वेचून आणण्याची आस अंतर्यामी घेऊन पळतात. ओंजळभर ओलाव्यात अंकुरत राहतात. समाधानाच्या कळ्यां साकळत जगणं सजवत राहतात. म्हणूनच की काय संत तुकाराम महाराज ‘सुख पाहता जवापाडे...’ म्हणाले असतील का? नेमकं काय असेल, असं म्हणताना त्यांच्या मनात? आयुष्यावर लोभावीन प्रीती करावी, असं काहीसं सांगायचं असेल का त्यांना? असेलही! तसाही माणूस लोभाशिवाय वेगळा असतो का?

आयुष्याच्या अनेकांनी अनेक परिभाषा केल्या. सांगितल्या. लिहिल्या. विवेचन केलं. पण त्यातील नेमकी कोणती परिपूर्ण असेल? की अद्याप तशी तयार झाली नाहीच. असेल तर ती संपूर्ण असेल का? समजा पूर्ण असती, तर माणसाला अस्वस्थ वणवण करायची आवश्यकता असती का? म्हणतात ना, पूर्णत्वाच्यापलीकडे उभे नश्वरतेचे कडे. कदाचित ही अपूर्णताच आयुष्याचे अर्थ शोधायला प्रेरित करते. अंतर्यामी चैतन्य नांदते ठेवते. तसंही आयुष्य काही सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. तसं असतं तर सगळेच आनंदाच्या झोक्यांवर झुलताना दिसले असते. कुठे अपेक्षा आहे, तर कुठे उपेक्षा. कुठे वंचना आहे. कुठे मनोभंग, तर कुठे तेजोभंग आहे. कुठे केवळ सैरभैर धावणं आहे. कुठे प्रभाव, तर कुठे अभावाचाच प्रभाव. किती खेळ खेळतं आयुष्य ओंजळभर भावनांसोबत. आयुष्य कुणाला परीक्षा वाटते. कोणाला आनंदतीर्थ. कोणाला सुखांचा शोध. कोणाला आणखी काही. कोणाला काय वाटावं, हा वैयक्तिक निवडीचा भाग. अर्थात, असं वाटण्यात वावगं काहीच नाही. कोणाला काय वाटते, म्हणून अयुष्याचे अर्थ सुगम होतातच असंही नाही.

दुपारच्या निवांत वेळी घरासमोरील आंब्याच्या झाडाखाली कुठलंस पुस्तक वाचत विसावलो होतो. दूर कुठेतरी ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ गाणं सुरु आहे. त्याचे बोल ऐकू येतायेत. ते ऐकून वाचनावरून लक्ष विचलित झालं अन् त्यातील शब्दांवर नकळत मन रेंगाळत राहिलं. खरंतर याआधी हे गाणं ऐकलं नाही, असं नाही. खूपवेळा ऐकलं असेल. पण कधीकधी एखादा क्षण असा येतो की, शब्दांमध्ये असणारा आशय शोधण्यापेक्षा मनातील प्रतिमांचे अर्थ आपण त्यात शोधू लागतो. शब्दांना त्यांचा स्वतःचा अर्थ असला, स्वतःचं अवकाश असलं, तरी त्यास दूर सारून मनातल्या प्रतिमांची फुलपाखरे सुरांभोवती पिंगा घालायला लागतात, शब्दांभोवती उगीचच फेर धरून विहरायला लागतात.

या गाण्यातील शब्दांचा आशय, अर्थ कोणाला काय अपेक्षित असेल, तो असो. पण त्यातल्या ‘ओझे’ शब्दावर उगीचच रेंगाळत राहिलो, मनातल्या अर्थाचं अवकाश शोधत. तसंही माणसाचा स्वभाव आपण काही करण्यापेक्षा, शक्य झाल्यास स्वाभाविकपणे एखादे काम दुसऱ्याकडून करून घेण्याचा असतो. देता आले तर कुणाच्यातरी खांद्यावर ओझे देण्याचा असतो. तसं पाहता कुठलेही ओझे काही कोणी स्वच्छेने स्वीकारीत नसतो. कारणवश ते दत्तक दिले जाते किंवा परिस्थितीवश आपले म्हणून स्वीकारावे लागते. अर्थात हा सगळा परिस्थितीचा प्रासंगिक परिपाक असतो. ओझं शब्दात लादण्याचाच भाग अधिक असतो, नाही का?  मग ते स्वतःचं असो अथवा दुसऱ्याचं. तसंही माणसं आयुष्यभर लहानमोठी ओझी सोबत घेऊन वावरत असतात. ती कधी आप्तस्वकीयांनी, कधी स्नेह्यांनी आपलेपणाने हाती दिलेली असतात. कधी व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना परिस्थितीने पुढ्यात आणून टाकलेली. कधी आपणच स्वेच्छेने स्वीकारलेली. ती टाळता येत नाहीत आणि त्यापासून दूर पळताही येत नाही. कुठली ना कुठली ओझी घेऊन आयुष्य सरकत असते पुढे, वाटेवरच्या वळणाला वळसा घालून. कुडीत श्वास असेपर्यंत ओझ्यांना घेऊन माणूस वावरत असतो. हा प्रवास त्याच्यापुरती एक शोधयात्रा असतो. आपलं असं काही शोधत तो चालत राहतो. क्रमसंगत मार्गाने पुढे सरकत राहतो. तशी ओझीसुद्धा रंग, रूप बदलत जातात. त्यांना प्रासंगिक परिमाणे लाभत असतात. नवे आयाम मिळत असतात. आपापली वर्तुळे सांभाळत माणसं आयुष्याच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत राहतात.

कुणाच्या खांद्यावर कशाचे ओझे असेल, हे सांगणे तसे अवघड. संसाराचे ओझे भार या अर्थाने मोजले जात नसले तरी ‘सोसता सोसेना संसाराचा ताप, त्याने मायबाप होऊ नये’ असे म्हणताना संसारसुद्धा एक ओझं असतं, असं आडमार्गाने का असेना; कोणीतरी सूचित करीत असतो. इच्छा असो, वा नसो हे ओझं ओढावं लागतं. घर नावाची चौकट उभी राहते. मनोवांछित गोष्टी त्यात असाव्यात, म्हणून त्या आणण्यासाठी पर्याय शोधले जातात. कधीकधी शोधलेले पर्यायच आणखी काही अनपेक्षित ओझी आणत असतात. एका ओझ्याने निरोप घेतला की, दुसरे असतेच उभे प्रतीक्षेत. भविष्याच्या धूसर पटावरून अपेक्षांची आणखी काही ओझी आपल्या पावलांनी चालत येतात. मोठी आणि वजनदार होत जातात. जीवनाच्या जडणघडणीसाठी समाजाकडून प्रमाणित करून घेतलेल्या प्रतिष्ठेची वलये भोवती तयार होतात. हे चक्र क्रमशः चालत राहते. मनी वसतीला उतरलेलं सगळं मिळवायचं म्हणून धावाधाव करण्यास परिस्थिती बाध्य करीत असते.

बऱ्याचदा ‘तुझं आहे तुजपाशी....’ अशी अवस्था होते. सगळ्यांसाठी सगळं करावं, तर स्वतःसाठी काही शेष राहतच नाही. आसपास सजवत राहायचं, पण स्वतःला मनाच्या आरशात बघायचं राहूनच जातं. इतरांसाठी समाधानाच्या परिभाषा रेखांकित करताना स्वतःला अधोरेखित करणारी रेषा पुसट होत जाते. हे सगळं कुणासाठी आणि का करायचं? बरं केलंही काही, तर केवळ आपणच का? बाकीच्यांचे त्यांच्या, इतरांच्या आयुष्याप्रती काही म्हणजे काहीच उत्तरदायित्व नसते का? असं काहीसं वाटू लागतं. आस्थेची पाखरे मनाच्या आसमंतात विहार करायला लागतात. संदेहाचे भोवरे वाढू लागतात, तसे विचार किंतु-परंतुच्या अवांछित आवर्तात गरगरत राहतात. शोधलीच काही उत्तरे, तरी ती डहाळीवरून सुटलेल्या पानासारखी सैरभैर भिरभिरत राहतात. विचारलं स्वतःच स्वतःला, तरी त्याचं उत्तर काही हाती लागत नाही.

इतरांच्या जगण्यात रंग भरताना आयुष्यातलं इंद्रधनुष्य रंग हरवून बसतं. हरवण्यात आनंद वगैरे असतो म्हणणं कितीही उदात्त, उन्नत वगैरे वाटत असलं, तरी समर्पणाच्या परिभाषा केवळ उपदेशात सुंदर दिसतात. आचरणात आणताना त्यांच्या मर्यादा आकळतात, तेव्हा आपल्या सीमांकित असण्याचे अर्थ नव्याने आकळू लागतात. स्वतःच स्वतःपासून निखळत जाण्याच्या वेदना घेऊन ही कविता वाहत राहते, एकाकीपणाला सोबत करीत. आसपासच्या गलक्यात आपला आवाज विरघळून जावा, एक अक्षरही कुणाला ऐकू येवू नये, यासारखी ठसठस कोणती नसते. एक वाहती वेदना सोबतीला घेऊन मनाचे कंगोरे कोरत ही कविता सरकत राहते. समुद्रात पाणी तर अथांग असावं, पण पिण्यालायक थेंबही नसावा. यासारखं वेदनादायी काही असू शकत नाही. नदीतून ओंजळभर पाणी घेऊन तिलाच अर्ध्य म्हणून दान द्यावे. हाती उरलेल्या चार थेंबांना तीर्थ मानून विसर्जित होण्यात धन्यता मानावी. विसर्जनात सर्जनाची स्वप्ने दिसावी अगदी तसे.

‘स्त्री’मनातला सनातन सल घेऊन येते ही कविता. कोणीतरी केवळ ‘ती’ आहे म्हणून परार्थात परमार्थ शोधणे तिचं प्राक्तन असतं का? नियतीने तिच्या ललाटी कोरलेले अभिलेख असतात का हे? वेदनांना कुंपणे घालून इतरांच्या आयुष्याची वर्तुळे सजवण्यासाठी आखून दिलेल्या परिघाभोवती प्रदक्षिणा घालत राहणं तिचं भागधेय असतं का? कदाचित! ती आई असेल, बहीण असेल, सहचारिणी असेल किंवा आणखी कोणती नाती तिच्या असण्याने आयुष्यात आली असतील. कदाचित ती प्रियतमाही असेल. कोणीही असली, तरी तिच्या असण्याला वेढून असलेल्या वर्तुळांना विसरून तिचा प्रवास घडणे असंभव. खरंतर ही सगळीच नाती नितांत सुंदर. त्यांचे विणलेले गोफही देखणे. पण प्रत्येक धाग्यात एक अस्फूट वेदना गुंफलेली असते. आप्तांचं आयुष्य सजवताना, स्वकीयांसाठी सुखांचा शोध घेता घेता ती स्वतःचं असणंच विसरते. त्यांच्या सुखात आपल्या समाधानाचे अर्थ शोधत राहते.    
 
‘ति’च्या जगण्याची क्षितिजे समजून घेताना आयुष्याच्या पटावर पसरत जाणाऱ्या हताशेला ही कविता शब्दांकित करते. एक उसवलेपण मांडत जाते. खरंतर सुखांची परिभाषा बनून झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याजवळच राहणं घडत असलं, तरी समाधानाचा स्पर्श लाभलेले चार थेंब ओंजळीत जमा करता येतीलच असं नाही. प्रारब्धावर पलटवार करण्याचे कितीही प्रयास केले, तरी परिस्थिती परिवर्तनाच्या प्रयत्नांवर कधी प्रघातनीती प्रहार करते, कधी नियती खोडा घालते. संकेतांची कुंपणे पार करता आली की, आयुष्याच्या वाटा शोधता येतात. पण परिस्थितीने बांधलेल्या भिंती पार करण्याइतपत हाती काही नसलं, तर प्रतीक्षेशिवाय अन् प्रार्थनेशिवाय आणखी उरतेच काय? आसपासच्या परगण्याच्या पदरी प्रसन्नतेचा परिमल पेरणाऱ्या नदीचा सहवास प्रासादिक असला. संपन्नतेचे दान पदरी घालणारा असला, सुंदरतेची परिभाषा घेऊन तो वाहत असेलही, पण केवळ काठ धरून सरकणे प्राक्तनात असेल, तर कोणत्या किनाऱ्यांनी प्रतीक्षा करावी? नदीच्या पात्रात विसावलेल्या पाण्याच्या अथांगपणाचा एकवेळ थांग घेता येईलही, पण अंतरंगाचा तळ शोधावा कसा? ज्याच्या गर्भात केवळ अन् केवळ असंख्य वणवे दडले आहेत. त्या ज्वालामुखीचे उद्रेक समजून घ्यावेत कसे? किनारे धरून घडणारा प्रवास पायाखालच्या वाटांशी सख्य साधणारा असला, तरी मुक्कामाचं ठिकाण समीप असेलच असे सांगता नाही येत.

अंतर्यामी भावनांचा कल्लोळ उभा राहतो. कल्लोळात असंख्य वादळे सामावलेली असतात. वादळाच्या गर्भात फक्त विखरणं असतं. सांधणं भावनांचा हात धरून येतं. भावनांचं ओथंबून आलेलं आभाळ अनेकदा भरून येतं, रितंही होतं; पण भिजायचं राहूनच जातं ते जातंच. आसपासचा ओलावा जपता जपता अंतर्यामी साठवलेली ओल आटत जाते. कोसळणाऱ्या धुवांधार पावसाचा हात धरून आलेला प्रवाह ओलावा घेऊन वाहत राहिला असेलही, पण त्याला मनाच्या मातीला काही भिजवता नाही आलं. खडकावर पडणाऱ्या पाण्याच्या प्राक्तनात वाहणं असतं, रुजणं नसतं. एक शुष्कपण घेऊन नांदणे असते ते. आस्थेचा ओलावा शोधणारी मुळे ओलाव्याच्या ओढीने सरकत राहतात. पण कोरडेपणाचा शाप घेऊन देहावर ओढलेल्या अगणित भेगांना सांभाळत पडलेली माती चिंब भिजण्याच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसली असेल, तर झाडांनी बहरावे कसे? अनेकांच्या आयुष्याला गंधाळलेपण यावं म्हणून फुलांचे ताटवे फुलवले, तरी पाकळीवरही आपली मालकी नसावी, यापेक्षा वंचनेचे आणखी कोणते अर्थ असू शकतात?

पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परिसरावर मोत्यांची पखरण करीत पसरलेल्या दवबिंदूंना गोंजारत राहावं, पण स्पर्श करायला हात पुढे करण्याच्या आधीच त्यांनी निखळून पडावं. सुखंही अशीच. स्वतःसाठी चार थेंब वेचावेत, पण हाती लागण्याआधीच त्यांनी विसर्जनाच्या वाटेने विसावा शोधावा. आपलेपणाची चादर पांघरून वेढून घेणारा ओलावा निसटत राहतो. काळ गतीची चाके पायाला बांधून पुढे पळत राहतो. ऋतू पाठशिवणीचा खेळ खेळत राहतात. कूस बदलून नव्या वळणावर विसावतात. पण त्यांच्या बहराचे अर्थ काही आकळत नाहीत. रसरंगगंधाचे किती सोहळे सोबत घेऊन आलेले असतात ते; पण  त्यांचा स्पर्श काही घडत नाही. त्यांच्या बहराने भोवती फेर धरून पिंगा घालत राहावे. त्यात समाधानाचे तुकडे वेचत राहावेत, पण हाती काही लागू नये. एकाकीपण तेवढे मूक सोबत करीत राहावे. निखळून पडावेत माळेत आस्थेने गुंफलेले एकेक मणी. घरंगळत राहावं त्यांनी, तसं आयुष्यही कधी ओवलेल्या सूत्रातून सुटते. देठातून निखळलेल्या पानाला सैरभैर होऊन वाऱ्यासोबत धावण्याशिवाय विकल्प उरतोच कुठे?

आयुष्याला अनेक ज्ञात-अज्ञात अर्थांची वलये वेढून असतात. त्याचे अर्थ अवगत करण्याचा प्रयत्न करावा लागतो. ते शोधण्यासाठी मर्यादांची कुंपणे पार करून पायाखाली पडलेल्या वाटांनी मार्गस्थ व्हावं लागतं. चालत राहावं लागतं रस्त्यांचा शोध घेत. कधी मळलेल्या मार्गाची सोबत करीत, कधी एकाकी. माणूस चालतो आहे आपलं असं काही शोधत, जन्माला आल्यापासून. चालणं कुणाला चुकलं आहे का? चालणाऱ्यात विचारवंत होते. बुद्धिमंत होते. तत्त्ववेत्ते होते. संतमहंत होते. कोणी धांडोळा घेतला नाही आयुष्याचा? सगळ्यांनी तपासून पाहिलं आपणच आपल्याला. गवसलं का त्यांना त्याचं मर्म? आकळले का अर्थ त्यांना? असतील अथवा नसतीलही, माहीत नाही. प्रत्येकाची अनुभूती वेगळी. जशी अनुभूती, तशी अभिव्यक्ती. आयुष्य आसक्ती असते. एक असोसी असते. अर्थ तेवढे निराळे. गवसलं कुणाला काही या प्रवासात. त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केलाय, आपापल्या अनुभूतीचे अध्याय हाती घेऊन. सोडवली काहींनी आयुष्याची समीकरणे, कोणी मांडली सूत्रे यशाची. म्हणून सगळ्यांनाच ते आकळेलच असंही नाही. आषाढी-कार्तिकीला वारकरी विठ्ठल भेटीची आस अंतर्यामी घेवून अनवाणी धावतात. मूर्ती म्हणून विठ्ठल एक असला, तरी प्रत्येकासाठी तो वेगळा. ज्याची जशी श्रद्धा, तसा तो त्यांना दिसतो. कुणाला काय दिसावे, कोणाला काय गवसावे, हा त्यावेळेचा साक्षात्कार असतो. आयुष्यही असेच असते, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••