कविता समजून घेताना भाग: चौतीस

By

डाव संसाराचा

आभाळ कोपल्यावर तू कच खाल्लास
अन् दोर तोडत गेलास संसाराची
मी गणितं घालत होते उद्याची
तुझ्या वजाबाकीला बेरजेत आणण्याची

संसाराचा डाव मांडलास तूच
मग का उधळून लावलास?
पाखरांना जेव्हा गरज होती
तेव्हाच तू गळफास घेतलास

संसाराचा पसारा आता
एकटीने कसा आवरू
थेंबाथेंबाने गळणाऱ्या घराला
फुटक्या मनगटाने कसे सावरू?

जन्मदात्या बापाची काठी व्हायचे
तर पळपुट्यासारखे पळून गेलास
रडले तर सगळेच रे!
मला मात्र एकांतात छळून गेलास

समाजाला, व्यवस्थेला तोंड देत
एकटीच मी लढते आहे
पोटच्या पोराला मात्र
लढवय्या म्हणून पाहते आहे

केविलवाणी धडपड माझी
डोळ्यात मात्र आशेचा किरण आहे
माझ्या एकटीच्या लढाईला
तुझ्या मायबापाची प्रेरणा आहे

काजवा होऊन लढत राहीन
मला सूर्याची फिकीर नाही
आभाळाला जाऊन सांग
आता
माझ्या सोबतीला आहे काळी आई


अनिता यलमटे

भविष्याच्या धूसर पटलाआड नेमकं काय दडलेलं असतं, हे काळालाही अवगत असतं की नाही, माहीत नाही. तरीही आशेच्या अस्पष्ट कवडशात काळाच्या तुकड्यांना जीव उगीच शोधत राहतो. उगवलेला आज वेदना पदरी टाकून गेला, निदान उद्याच्या गर्भातून अंकुरणारा उजेडाचा एक कवडसा हाती लागेल, या अपेक्षेने माणसे अंधार उपसत राहतात. सगळ्याच वाटा निबिड अंधाराची सोबत करीत निघालेल्या असताना मन मात्र उजेडाच्या प्रतीक्षेत क्षितिजांचे कोपरे कोरत राहते. जगण्याची आधीच तयार करून घेतलेली आखीव रेखीव सूत्रे नसतात. त्यांचे साचे तयार करून अनुरूप आकृत्या नाही साकारता येत कधी. आयुष्याच्या चित्राला मढवण्यासाठी आयत्या चौकटी कोणाला आंदण मिळाल्या आहेत? सांगणे अवघड आहे, कारण अद्याप कोणीच सुखाची वसने परिधान करून वावरत असल्याचे सांगत नाही. पण वास्तव हेही आहे की, सगळ्यांच्याच ललाटी वणवण भटकंतीचे अभिलेख नियतीने कोरलेले नसतात. पदरी सुखाचे दान पडूनही समाधानी राहता येतेच असेही नाही.

हाती लागलेल्या प्रत्येक क्षणांचा उत्सव करता यायला हवा, असं कोणी सांगितलं म्हणून काही जगण्याचं नंदनवन होत नसतं. आनंदाचे चार क्षण वेचता आले, म्हणून काही कोणी सुखांच्या पायघड्या आपल्या वाटेवर घालत नसतात. बहरून येण्यासाठी ऋतूंनी अंगणी विसावण्याएवढा विराम आयुष्याला घेता यायला हवा. पण जगणंच उजाड झालं असेल अन् आयुष्य वैराण झालं असेल, तर कोणत्या क्षितिजांकडे अभ्युदयाच्या अपेक्षेने पाहावे? आयुष्याचे अर्थ जगण्यात सापडतात. पुस्तकातून भेटताना, भाषणातून ऐकताना ते देखणे वगैरे वाटत असले, तरी वास्तव कधी एवढं सुगम असतं का? आयुष्याचे सगळे कोपरे प्रश्नचिन्हांनी गोंदले जातात, तेव्हा जगण्याच्या परिभाषा त्यांचा अंगभूत अर्थ हरवतात अन् डोळ्यातून साठवलेली आकांक्षांची अक्षरे आशय. व्याख्या पाठ करून आयुष्य नाही जगता येत. परिभाषा फक्त शब्द मांडतात, पण असण्या-नसण्याचे अर्थ स्वतःलाच शोधावे लागतात. ती न संपणारी शोधयात्रा असते. वणवण असते, मनात अधिवास करून असणाऱ्या आस्थेच्या बिया उगवून येण्याची.

एक अस्वस्थ तगमग घेऊन ही कविता मनाचे कोपरे कोरत राहते. परिस्थितीच्या आघाताने क्षणात होत्याचे नव्हते होते. उद्ध्वस्त करणारा तो एक पळ काळाच्या कुशीत जावून विसावतो. पण मागे अगणित समस्यांच्या पाऊलखुणा कोरून जातो. आयुष्याच्या वाटेवर कोरल्या गेलेल्या त्याच्या आकृत्या एक वेदना असते. काळजाला कापत जाणारा कातरकंप असतो. भळभळती जखम असते ती, वेदनांचा विसर न पडू देणारी. कोण्यातरी डोळ्यात कधी सुखी संसाराची पाखरे भिरभिर करत राहतात. वाऱ्याच्या हात धरून विहार करतात. थकून डहाळीवर येवून विसावतात. पण परिस्थितीच्या आघाताने झाड वठत जातं अन् मागे उरतात केवळ शुष्क अवशेष. स्वप्नांची पाखरे सैरभैर होतात. मुळं मात्र हरवलेला ओलावा शोधत राहतात. मनाच्या आसमंतावर कमान धरणारी इंद्रधनुष्यी स्वप्ने करपतात. नियतीच्या एका फटक्यानं सारी राखरांगोळी होते. मागे उरतात खिन्न, उदास अस्वस्थतेचे भग्न अवशेष. जीवनाचे सारे रंग क्षणात पालटतात. मागे उरतो परिस्थितीच्या हताशेचा भयाण अंधार, जीवनाला व्यापून टाकणारा. हरवलेली स्वप्ने अन् विखुरलेलं जगणं घेऊन अंधारवाटेने चालण्याशिवाय अशावेळी हाती उरतेच काय?

ज्याच्या खांद्यावर विश्वासाने विसावा घ्यावा, तोच खांदा सगळे पाश सोडून मुक्तीचा मार्ग निवडतो. बंधनातले गुंते विसरून विखरत राहतो. आभाळ कोपल्यावर मुळं घट्ट धरून जमिनीला बिलगून राहावं, पण तोच कच खातो. संसारातून सुटत जातो. परिस्थितीसमोर गुढगे टेकून शरणागती पत्करतो. अगतिक होत राहतो. विकल्प संपतात त्याच्यापुरते. ती मात्र रोजच्या वजाबाकीला बेरजेत आणण्याची गणिते सोडवत राहते. सुखाची सूत्रे अन् समाधानाच्या परिभाषा साकळून आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहते. त्याच्या अशा वागण्याचा अर्थ शोधत राहते. पण हाती रितेपणाशिवाय काहीच नाही लागत. संसाराचा डाव मांडून का उधळून लावलास? म्हणून तिचं विकल मन प्रश्न विचारत राहते, त्याच्यासोबत व्यतित केलेल्या आठवणींना.

आकांक्षांच्या चतकोर तुकड्यात वाढवलेल्या झाडाच्या आश्रयाला आलेल्या पाखरांना निवाऱ्याची गरज होती, तेव्हाच झाडाने उन्मळून पडावे आणि काडीकाडी जमा करून बांधलेलं घरटं उधळून जावं. वैराण होण्याइतके आणखी वेदनादायी काय असू शकते? त्याने त्याच्यापुरते उत्तर शोधले. पण संसाराचा पसारा आता एकटीने कसा आवरायचा? थेंबाथेंबाने गळणाऱ्या घराला फुटक्या मनगटाने कसे सावरायचे? त्याच्या अवकाळी जाण्याच्या प्रश्नाहून अधिक जटिल प्रश्न तिच्यासमोर आहे जगण्याचा. हाय खाऊन तो जीवनयात्रा संपवतो. त्याच्यापुरत्या प्रश्नांच्या गुंत्यातून तो मोकळा झालाही असेल; पण त्याच्या पश्चात कुटुंबियांच्या वाट्याला येणाऱ्या रोजच्या मरणयातनांचे काय? अवकाळी मरणातून कोणते प्रश्न कधी संपले आहेत? तात्त्विकदृष्ट्या असं म्हणणं कितीही संयुक्त वगैरे वाटत असलं, तरी वास्तवाच्या वाटा वेगळ्या असतात. त्यांची वळणे प्रत्येकवेळी आकळतीलच असं नाही. समोर येणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतातच असेही नाही. सगळंसगळं करूनही पदरी निराशाच येत असेल, तर समाधानच्या तुकड्यांचा शोध कसा, कुठे घ्यावा? आयुष्याचे अर्थ आणि उत्तरे शोधावीत तरी कशी?

टोकाचा पथ निवडताना काहीच विचार जाणाऱ्याच्या मनात येत नसतील का? लेकरंबाळं, सहचारिणी अगदी काही म्हणजे काहीच डोळ्यासमोर दिसत नसेल का? परिवाराप्रती आसक्तीच्या पाशांनी मन जराही बद्ध होत नसेल का? की सगळं सगळं आठवत असेल? जीव गुंतत असेलही आस्थेच्या धाग्यात, पण आसक्तीपेक्षा टिकून राहण्याचे प्रश्न अवघड होतात, तेव्हा सगळेच पाश तटातटा तुटतात. जगण्याचे सगळे पीळ सोडून तो सुटतो. जीव तुटतो तो मागे राहणाऱ्यांचा. भोग भोगावे लागतात मागे राहिलेल्यांना. जन्मदात्या बापाची म्हातारपणी काठी व्हायचे, तर पळपुट्यासारखे पळून गेलास, म्हणून विचारत राहते ती प्रश्न त्याच्या आठवणींना. परिस्थितीपासून पलायन ही काही पराक्रमाची परिभाषा नाही होऊ शकत. पण सगळेच पर्याय संपले असतील तर... कोणाचा काळजाचा तुकडा, कोणाचा बाप, कोणाचा भाऊ, कोणाचा आणखी काही नात्याचे पाश क्षणात तोडून गेलेला असतो. आठवणींची सय घेऊन विकल डोळे वाहत राहतात सगळ्यांचे. वेदनांचा अथांग डोह गहिरा होत राहतो, पण जिने आपलं सगळं जगणं त्याच्या जगण्याशी जुळवलं, तिचं काय? त्यात फक्त भकास शुष्कपण उरतं. त्याच्या अशा अविचारी वागण्याने तिच्या काळजाला पडणारी घरे दिसत नसतीलच का कोणाला? की दाखवता येत नसतात तिला? उदासवाणा एकांत घेऊन आलेल्या क्षणांना हे कळावे कसे? प्रत्येक पळ छळत राहतो, धग बनून चटके देत राहतो तिला.

समाज नावाच्या व्यवस्थेला विशिष्ट विचारधारा असते का? असेल तर ती सर्वांप्रती सामानुभूतीची असते का? सर्वांप्रती समदर्शी भाव त्यातून प्रतीत होत असतात? ठाम विधान करणे अवघड आहे. त्यांची उत्तरे प्रासंगिक असतील. कदाचित भिन्न असतील. पण एक वास्तव दुर्लक्षित करून चालत नाही, व्यवस्था अमूर्त असते. तिला आकारात अधिष्ठित नाही करता येत. आभासाच्या आकृत्या असतात त्या, चेहरा नसतो. समाजाच्या जगण्याचा अचूक लसावी नाही काढता येत. चार चांगले असतील, तर दोन वाईटही असतात गर्दीत. याकडे दुर्लक्ष करून नाही चालत. व्यवस्थेने उभ्या केलेल्या शेकडो किंतु-परंतुना, नजरांमधील हजारो प्रश्नांना सामोरी जात, तोंड देत ती एकटीच लढते. दैवाने दिलेल्या अंधारात हरवलेला आज पदरी घेऊन उद्याचा क्षितिजावर आस्थेचे कवडसे शोधत राहते. परिस्थितीशी दोन हात करायला तो कचरला असेल, पण त्याच्याच अंशाला असा पराभूत न होऊ देण्याचा निर्धार करते. एक लढवय्या म्हणून पाहते ती त्याच्यात. निदान त्याने तरी गलितगात्र होऊन परिस्थितीसमोर गुढगे टेकून संघर्षाची हत्यारे म्यान नयेत. पहाडाएवढे संकटे आणणाऱ्या प्रसंगांना सामोरे जात त्यांच्या नजरेत नजर घालून सांगावं, तू कर कितीही खेळ, मी खेळत राहीन उमेदीचा ओलावा अंतरी कायम ठेवून.

असेलही तिची ही केविलवाणी धडपड. पण डोळ्यातून आशेच्या ज्योती तिने मालवू दिल्या नाहीत. तेवत आहेत त्या दैवाच्या कराल आकृत्यांचा माग काढण्यासाठी. तिच्या लढाईला असतील यशापयशाची अनेक परिमाणे. पण प्रयत्नांना कुठे यशापयशाच्या परिमाणांच्या पट्ट्यात मोजता येतं? स्वयंभू अस्तित्वाला ओळख करून देण्याची आवश्यकता नसते. लढणाऱ्याने उचललेली प्रत्येक पावले योजनांची मुळाक्षरे असतात. त्याचे मायबाप झगडले, दैवाच्या प्रत्येक आघातांशी. परिस्थितीने पुढ्यात उभ्या केलेल्या वादळवाऱ्यासोबत झटत राहिले. तीच विजिगीषू प्रेरणा सोबत घेऊन ती परिस्थितीला आव्हान देते. काळाला करूदेत कितीही आघात. घालू दे रक्ताळणारे घाव. फारतर वाहत्या जखमा घेऊन राहीन उभी जीवनसंगरात, देहातून प्रतिकाराचा शेवटचा थेंब वाहून जात नाही तोपर्यंत. नियतीने केलेल्या आघातांच्या पराक्रमाच्या विजयी गाथा काळाला लिहूदेत. त्याच्या जयजयकाराचे जयघोष उमटू देत आभाळावर. निनादूदेत सगळ्या दिशा त्याच्या विकृत पराक्रमाच्या आनंदाने. पण माझा संघर्षाचा आवाज क्षितिजांचा वेध घेईल. सूर्याच्या तेजाची दाहकता नसेल माझ्या संघर्षाच्या अस्त्रांमध्ये, पण त्याच्याकडूनच घेतलेल्या उर्जस्वल प्रकाशाचे विस्मरण नाही झालं अजून. सूर्य बनून नाही लढता आलं म्हणून काय झालं, काजवा होऊन लढत राहीन. त्याच्या दाहकतेची फिकीर नाही आणि त्याच्या पराक्रमी प्रकाशाची पर्वा.

आभाळाला जाऊन सांग, कोसळ हवं तितकं. पांघर अंधाराची वस्त्रे साऱ्या चराचरावर. पण मनातला कवडसा कसा गिळशील? आधाराचा खांब मोडला असेलही, पण कणा अद्याप सलामत आहे अन् हरवलेली स्वप्ने पेरायला सोबतीला आहे काळ्या आईचा चतकोर तुकडा, जो संसाराच्या चौकटींना देईल नवं कोंदण. नसेलही प्रकाशाचा उत्सव माझ्या अंगणी साजरा होणार, पण हाती आलेल्या कवडशाच्या साक्षीने लख्ख प्रकाश शोधायचा आहे. पावलापुरत्या उजळलेल्या वाटेने चालत येणारी स्वप्ने मनपटलावर गोंदवून आयुष्याची रोपटी पुन्हा काळ्या आईच्या कुशीत रुजवायची आहेत. आसपास दैवाने केलेल्या पराभवाच्या खुणा दिसत असल्या, त्यांचा मागोवा घेत चालणे प्राक्तन बनले असेलही. पण उसवलेल्या जगण्याला टाके घालण्याची उमेद अद्याप सोडली नाही. मनगटात आहे अजून ताकद दैवाला आणि देवालाही आव्हान देत उगवून येण्याची.

दैवशरण वृत्तीला त्यागून परिस्थितीच्या आघातांशी दोन हात करीत घर उभं करणारी 'ही' अभागी म्हणून हळव्या मनातला एक कोपरा थरथरतो. अंतर्यामी करुण भाव जागा होतो. परिस्थितीने पुढ्यात पेरलेल्या प्रसंगांच्या पात्रात तिचं असणं अभागीपण असेलही, पण उन्मळून पडलेल्या आयुष्याला उभं करताना आघातांवर घाव घालून नव्याने रुजवण्याची जिद्द न सोडणारी रणरागिणी आहे ती. प्राप्त परिस्थिती स्वीकारून उन्मळून टाकणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना सामोरे जाण्याची जिद्द येथील प्रत्येक मातेचा, भगिनीचा जगण्याचा पैलू आहे. अबला म्हणून व्यवस्था तिला अधोरेखित करीत राहिली असेलही; पण प्रसंगी तीच दुर्गा होते, काली होते, हे कसे विसरता येईल? आयुष्याचे अर्थ लावतांना घडलेल्या प्रमादाच्या परिमार्जनाचा पर्याय असते ती. कोमल असेल, नाजूक असेल ती. पण प्रसंगी वज्रालाही आव्हान देण्याइतकी कठोर होऊ शकते. प्रेमाने, ममतेने, वात्सल्याने ओथंबलेले हृदय तिची ताकद नसून, खरं बळ परिस्थितीला वाकवणाऱ्या तिच्या अक्षुण्ण मनगटात असतं. देव अन् दैवही अशावेळी तिच्यासमोर खुजे वाटायला लागतात.

जगण्यासाठी झगडणाऱ्या साऱ्यांना नियतीने नेमून दिलेल्या परीक्षेला सामोरे जावेच लागते. परीक्षेत सगळेच उत्तीर्ण होतील, असेही नाही. नाही होता येत काहींना दुर्दैवाने. सत्व पाहणाऱ्या प्रवासात ते थकतात, हरतात. हरले म्हणून थांबतात अन् थांबलेले परिस्थितीच्या आघाताने विखंडित होऊन विखरत जातात अन् संपवून घेतात. एका प्रदक्षिणेला पूर्णविराम मिळतो, पण दुर्दैवाचे अगणित फेरे जन्माला घालून. संपणाऱ्यांप्रती हळहळ व्यक्त करणारे विकल शब्द काही दिवस वातावरणात विहार करतात. नियतीच्या क्रूर आघातातून जीवनाची अवकाळी सांगता झाल्याने हळहळ व्यक्त होते. वेदनांची ठसठस कालौपघात कमी होत जाऊन स्वभावानुरूप विस्मरणात जाते. नव्हे विसरावंच लागतं, कारण संघर्ष केल्याविन जीवनयात्रेची सफल सांगता कुणालाच करता येत नसते. नियतीने दिलेले दान पदरी घेऊन जगण्याचा शोध घेण्यासाठी वाटा शोधाव्या लागतात. मनाची समजूत घालत मुकाटपणे चालावं लागतं, नियतीने पुढ्यात आणून पेरलेल्या मार्गावरून. आजचा दिन जगणं मातीमोल करून गेला; पण निदान येणारा उद्या तरी आयुष्यात सफलतेचे रंग भरणारा असेल, या अपेक्षेने.

प्रश्न कालही होते. आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत. मात्र त्यांचं रूप पालटलं आहे. आवश्यकता आहे, परिघाबाहेरची उत्तरे शोधण्याची. वेदनेच्या वाटेने निघालेली पावले आपल्या चौकटीत सामावून घेण्याची. उदात्त विचारांना कृतिरूप देण्याची. जगण्याचं वर्तुळ आणखी व्यापक करण्याची. कारण विश्वाच्या वर्तुळातून माणूस वजा केला तर मागे काय उरेल? या प्रश्नाचं उत्तरही एक मोठं वर्तुळ हेच असेल, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment