कविता समजून घेताना भाग: पस्तीस

By

अॅडम अॅण्ड इव्ह

चल...
पुन्हा एकदा
परत जाऊ
त्या आदिम अवस्थेकडे
जिथं सृष्टीत फक्त
तू आणि मी...
प्युअर अॅण्ड व्हर्जिन

उतरून टाकू
हा बुरखा
तुझ्या पुरूषी अहंकाराचा,
दंभाचा
अन् माझ्या आत्मभानाचाही

वरकरणी तसेही
कितीही विस्तारलोत आपण
तरी कायमच राहतोय
एक हळवा कोपरा अपूर्ण
तुझ्याशिवाय माझ्यात
अन्
माझ्याशिवाय तुझ्यातही!


विद्या बायस-ठाकूर

तो आणि ती एक मात्रा, एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित केलेली वर्णमालेतील अक्षरे. पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो. कुण्या अज्ञाताने कधीकाळी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे अनपेक्षित हाती लागतात. काळाच्या उदरात सामावून पडद्याआड गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या अंधारात चाहूल लागते. कुतूहलाचा एक कवडसा डोकावून पाहतो. विसकटलेले, विखुरलेले संदर्भ जागे होतात अन् चालत येतात, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कुशीत विसावलेले अध्याय नव्याने वाचले जातात अन् आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात. काळाच्या तुकड्यात अशा किती गोष्टी हरवल्या आणि गवसल्या असतील, ते काळालाच ठावूक. आयुष्याच्या वाटेवर चालून थकलेले, हताश झालेले, जिंकलेले, हरलेले असे कितीतरी ‘तो’ आणि ‘ती’ विस्मृतीच्या अफाट विवरात सामावले असतील. काही कायमचे हरवले, काही हरवून गवसले. गवसले त्यांना काळानेच चिरंजीव केले. पण नव्याने अंकुरण्याचे अभिलेख नियतीने काही सगळ्यांच्या ललाटी लेखांकित केलेले नसतात.

तो आणि ती एकाच रस्त्यावरून मार्गस्थ झालेले प्रवासी की, पात्राच्या मर्यादांचे तीर धरून धावणारा प्रवाह. की वाहणे सोबत, पण समर्पणाच्या अथांग अर्णवात विसर्जित होऊनही एकरूप न होणारे. की दिशा हरवलेल्या वाटांनी अस्मितेच्या शोधात नुसतेच भिरभिरत राहणारे. खरंतर ‘तो’ आणि ‘ती’ या दोन शब्दांमध्ये शक्यतांचे अनेक आयाम सामावलेले असतात. तिचं ‘ती’ असणं जेवढं सत्य, तेवढंच त्याचं ‘तो’ असणंही. सृष्टीच्या विकासक्रमात अनेक गोष्टी घडलेल्या असतात. काही बिघडलेल्या असतात. काही जुळलेल्या. थोडी आकळलेली, पण बरीच न उलगडलेली गुपिते काळाच्या विवरात विसावलेली असतात. प्रत्येकवेळी ती गवसतातच असं नाही अन् सगळीच सापडायला हवीत असंही नसतं. म्हणून की काय शोध घेण्याची जिज्ञासा पूर्णविराम घेत नाही. सृष्टीचा प्रवास कोणाच्या आज्ञेची परिपत्रके घेवून पुढे पळत नसतो. निसर्गात सातत्य असतं. त्याची सत्ये अबाधित असतात. प्रेरणांचं पाथेय घेऊन प्रवास घडत असतो. त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात, तशा प्रत्येकासाठी वेगळ्या असतात, हेही नाकारता नाही येत. जैवसातत्याचा परिपाक कोणीतरी जवळ येणे असतो का? त्यांच्या असण्या-नसण्यातून अनेक शक्यता आकारास येतात. काहीतरी खुणावत असते. तो धांडोळा असतो आपणच आपला घेतलेला.

‘स्त्री’ या एका शब्दाभोवती अर्थाची अनेक वलये प्रदक्षिणा करीत असतात. सर्जनाचा साक्षात्कार असते ती. कळलेल्या अन् नकळलेल्या चौकटींचा शोध असते. म्हणूनच तिला समजून घेताना हातून काहीतरी निसटत असावं का? असेलही. याचा अर्थ असाही नाही की, ‘तिच्या’ असण्याचा अर्थ लागतच नाही. अन् ‘तोही’ फार सुघड, सुगम वगैरे असतो असंही नाही. विज्ञानाने घेतलेला धांडोळा एका बिंदूवर येऊन विसावतो. ही त्याची मर्यादा असते. पण तो काही पूर्णविराम नसतो. शक्यतांची अनेक चिन्हे तेथे अंकित झालेली असतात. अपेक्षांचा एखादा तुकडा लागतोही हाती. निष्कर्षांचा हवाला देवून विश्लेषण करता येते त्याचे, पण विश्लेषणाच्यापलीकडे असणारे विश्व आपल्यात आणखी काही कहाण्या घेऊन परिघाभोवती प्रदक्षिणा करीत असते. त्याभोवती कुतूहलाची वलये फेर धरून विहार करीत असतात.

संपादित ज्ञान त्याच्या आणि तिच्या नात्यातील आदिम बंधाचा वेध घेण्याचा प्रयास करतं. सृष्टीतील सर्जनचे अन्वयार्थ लावू पाहते. इहतली अधिवास करणारा माणूस नावाचा जीव विकसित झाला कसा? त्याच्या जगण्याची प्रयोजने नेमकी काय? परिस्थितीने कोरलेल्या वर्तुळात विहाराचे नेमके अर्थ कोणते? एक ना अनेक किंतु सोबत करीत असतात. अगणित प्रश्नांकित चिन्हे आयुष्यभर भोवती नांदत असतात. त्यांचा लसावी काढणे काही सुगम नसते. तो धांडोळा असतो मनी विलसणाऱ्या विचारांचा अन् वैगुण्याचाही. अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंतच्या त्याच्या प्रवासास प्रगतीची परिभाषा वगैरे म्हटलं, तर प्रगतीचे पर्याप्त अर्थ हाती लागतीलच असंही नाही. गवसतं त्यापेक्षा अधिक असं काही शेष असतंच.

एकेक करून प्रगतीची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या माणसाच्या जगण्याचा प्रवास कधी सुगम होता? अन् पुढेही फार सुलभ वगैरे असेल असंही नाही. इहतली जीवनयापन करताना प्राप्त परिस्थितीशी झगडतात, तेच जीव कालपटावर नाममुद्रा अंकित करीत असतात. अर्थात जीवनकलह जिवांना काही नवा नाही. सगळ्याच जिवांच्या जगण्याची ती अनिवार्यता आहे. निसर्गदत्त गरजा असतात त्यांच्या. त्या जगण्याशी जुळलेल्या असतात, तेवढ्याच देहधर्माशी निगडीत असतात. किंबहुना शरीराशी अधिक सख्य असतं त्यांचं. ती सहजभावना असते. पण माणसांच्या गरजा केवळ निसर्गाने गुणसूत्रात पेरलेल्या प्रेरणांपुरत्या परिमित नसतात. त्यांना अनेक परिमाणे असतात. ती वैयक्तिक असतात. पण त्याहून अधिक समूहाने पेरलेली असतात. त्याच्यामागे एक परिणत विचार उभा असतो अन् तोच प्रेरणा होतो. पण... खरंतर या ‘पण’मध्ये अनेक शक्यता सामावलेल्या असतात. त्यात परिस्थितीची जाण असते. प्रसंगांचे भान असते. तसे आत्मज्ञानही असते. इतरांना पारखून घेणे असते, तसे इतरांच्या नजरेतून स्वतःला समजून घेणे असते, तसेच अन्यांना समजून देणेही असतेच.

ही कविता असाच एक शोध घेत काळाच्या कुशीत विसावलेल्या क्षणांचे परिशीलन करू पाहते. स्त्री अन् पुरुष नात्यातील तरल अनुबंध शोधू पाहते. निरामय आयुष्य जगण्याचे बिंदू अधोरेखित करू पाहते. काळाचे किनारे धरून घडणारा प्रवास काही योजने पुढे घेऊन आला असला, तरी मागे वळून पाहताना हातून काही तरी निसटल्याचं शल्य शेष राहतेच. त्याचाही वेध घेते. काळाच्या कुशीत विसावलं, ते पुन्हा नव्याने समजून घेते. नात्याभोवती फेर धरून विहरत राहणाऱ्या किंतु-परंतुचे अन्वयार्थ लावू पाहते. चल पुन्हा एकदा परत जाऊ त्या आदिम अवस्थेकडे म्हणत आदिमबंधांचे अनुबंध शोधत आरंभबिंदूवर पोहचू पाहते. अपेक्षा करते, जिथं फक्त तो आणि ती एवढेच विकल्प असतील. कोणत्याही किल्मिषाशिवाय जगणारी नितळ, निर्मळ, निर्व्याज नाती. शुद्ध अन् सात्विक असणं कालातीत आवश्यकता असते. ओंजळभर अहं प्रबळ होतात, तेव्हा सद्सद्विवेकावर अविचारांची धूळ साचत जाते. आयुष्याचे अर्थ शोधतांना कधीतरी अनपेक्षित काही समोर येतं अन् आपणच आपल्याला खरवडून काढायला भाग पडतं. पृष्ठभागावर साचलेल्या धुळीचे कण थोडे बाजूला सारता आले की, दृश्य प्रतिमाने अधिक ठळक होतात. नितळपण शोधणं काही अवघड नाही. पण काही अहं इतके भक्कम असतात की, त्याचे थर खरवडून काढणे अवघड असते.

तिच्या ‘ती’ असण्याच्या काही मर्यादा असतात. नव्हे त्या परिस्थितीने निर्माण केलेल्या असतात. तसे ‘त्याचेही’ काही परीघ असतात. ते व्यवस्थेने निर्धारित केलेले असतात. आकांक्षांच्या गगनात विहार तर दोघेही करतात, पण भरारी घेणाऱ्या पंखाना प्राप्त होणारा प्रेरणांचा पाठींबा वेगळा असतो. त्याच्या अन् तिच्या आयुष्याची प्रयोजने भिन्न बिंदूंवर उभी असतात. आयुष्याचे अर्थ शोधावे लागतात. जगण्याचे अन्वयार्थ आकळायला लागतात. त्याने तिला अन् तिने त्याला समजून घेण्याचा प्रवास अगणित प्रश्नचिन्हांच्या उत्तरांचा शोध असतो. शक्यतांचे तीर धरून वाहणारा प्रवाह असतो तो. स्त्रीचं अस्तित्व इहतली पुरूषांइतकंच पुरातन असूनही केवळ तिचं देहाने वेगळं असणं पुरुषाला अस्वस्थ करीत राहिलं असावं का? तिच्याठायी असणारी सर्जनशक्ती तिच्या सामर्थ्याचं द्योतक आहे. म्हणूनच तो स्वतःला असुरक्षित समजत आला असावा का? विश्वाचा नियंता, निर्माता कुणी असेल तो असो; पण विश्वाला सर्जनाची सूत्रे देण्याचं अन् आयुष्याची समीकरणे सोडवण्याचं सामर्थ्य तिच्याठायी एकवटल्याने तिच्याभोवती विस्मयाची अनेक वलये विहार करीत असतात.

‘त्याच्या’ आयुष्याचे अर्थ ‘तिच्या’ सहकार्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. तिचं असणं हेच मुळात सर्जनाचे एक कारण असते. तिच्या सर्जनात सामर्थ्य सामावल्याचं प्रत्यंतर आल्याने 'त्याच्या' स्वार्थप्रेरित जगाने तिला विस्मयाच्या वर्तुळात अधिष्ठित केलं असेल का? विश्वाच्या वर्तुळाला समजून घेता येईल तेव्हा येईल, पण सर्जनातून निर्मित सामर्थ्य शब्दाचा अर्थ शोधताना एक नावासमोर पूर्णविराम घ्यावा लागतो ते ‘ती’ असते. पण व्यवस्थेची रचनाच ‘त्याच्या’ पदरी झुकते माप घालणारी असल्याने तिला गृहीत धरण्यात कोणाला कोणताही किंतु वाटत नसावा. जगण्यात कळत नकळत सामावलेले अभिनिवेश अनुबंधांच्या नितळपणाची सांगता करतात. गृहीत धरणे एकदा का मान्य केले की, अस्मितांना अर्थ तरी कितीसा उरतो?

परंपरेच्या पात्रातून वाहणारे प्रवाह पर्याप्त समाधानाच्या परिभाषा असतीलच असंही नसत. आसपास नांदता परिवेश प्रगतीच्या प्रयोजनांचा शोध असायला हवा. परंपरेची वसने परिधान करून मिरवता येतं, स्वतःला सजवून मखरात मंडित करून घेता येतं; पण पूर्णत्वाचा प्रवास घडतोच असं नाही. परिधान केलेली अभिनिवेशाची वसने सहजी उतरत नसतात. तिचं ‘ती’ असणं मान्य करताना व्यवस्थेने घातलेल्या मर्यादांच्या कुंपणाना ओलांडून एक पाऊल नव्या वर्तुळात कोरता येणे खरंच अवघड असतं का? कोणाला अवघड वगैरे वाटत असेलही हे, पण असंभव नक्कीच नाही. पुरूषी अहंकाराचा, दंभाचा परिधान केलेला बुरखा उतरवून नाही का घेता येणार? त्याने तिचं ‘ती’ असणं मान्य करायला कोणता संदेह असावा? खरंतर नितळपणाचे अर्थ विचारातून प्रतीत होतात, कृतीतून आचरणात येतात अन् संवादातून स्थापित करावे लागतात.

त्याने त्याचे पुरुषी संकेत अस्मितेचे विषय म्हणून मिरवलेत. काळाच्या प्रवाहात तीही तिच्या असण्याचे अर्थ शोधत गेली. प्रगतीच्या परगण्याकडे पडलेल्या तिच्या पावलांना आत्मभानाचे आयाम आकळत गेले. भान परिस्थितीचा परिपाक असतो. आयुष्याचे अर्थ शोधणारं असं काही त्यात सामावलेलं असतं. पण भानाला पर्याप्त जाण नसेल, तर ती आत्मवंचनाही असू शकते. तिने तिचे अहं आयुष्याच्या अंतरावर ठेवावेत अन् अंतरी अधिवास करून असणारे आस्थेचे अनुबंध शोधावेत. त्याने अनुबंधांचे अर्थ आकळून घ्यावेत. हाती लागलेलं संचित निरलस विचारांच्या कोंदणात अधिष्ठित करावं. अंतरी अधिवास करणारा अहं विसर्जित करावा अन् दोघांनी मिळून निरामय नात्यांचा शोध घ्यावा. नात्याला अर्थाचे अनेक कंगोरे असावेत. व्यवस्थेच्या चौकटीत सामावताना त्यांनी सुंदरतेची प्रयोजने अधोरेखित करावीत आणि व्यवस्थेने दोघांना एकाच प्रतलावरून वाहताना पाहावे.

त्याच्या किंवा तिच्या मनी विलसणाऱ्या आकांक्षांची क्षेत्रे कितीही विस्तारली, तरी तो तिच्याशिवाय आणि ती त्याच्याशिवाय पूर्णत्वाच्या बिंदूवर पोहचू शकत नाही. प्रगतीच्या परिभाषा आयुष्याच्या पटावर अंकित केल्या, तरी एक हळवा कोपरा अंतर्यामी अधिवास करून कायम रहातोच ना! तो एकटा किंवा ती एकटी असणे पूर्णत्व नाही. त्याच्याशिवाय तिच्या आयुष्यात अन् तिच्याशिवाय त्याच्या जगण्यात काहीतरी न्यून राहते. पूर्णत्वाची परिभाषा बहुदा पर्याप्त नसतेच. तो आणि ती द्वंद्व समास. एकाशिवाय दुसऱ्याला अन् दुसऱ्याशिवाय पहिल्याला अर्थ नाही. दोघांचे असणे अर्थांना अनेक अर्थ देणारे आहे. तसेच प्रमादाच्या पथावर पडलेल्या पावलांनी अनर्थांना आवतन देणारेही. सोबतीने घडणाऱ्या प्रवासाला अर्थपूर्ण करणारे, तसे अविचाराच्या आगळीकने आयुष्यात विसावलेल्या ऋतूंना अर्थहीन करणारेही. हवं असणारं काही आयुष्यात अधिवास करून असावं वाटत असेल, तर अस्तित्वाची प्रयोजने समजून घ्यावी लागतात. प्रेरणांचा प्रवास जाणून घ्यायला लागतो. फक्त कृतीचे कृतक परिमाणे अन् आयुष्याचे अर्थ तेवढे नेमके शोधता यायला हवेत. अर्थांना निरलसपणाचं लेपन करता आलं की, अंतरी अधिवास करणाऱ्या ओंजळभर ओलाव्याने आयुष्याच्या शुष्क डहाळीवरही अंकुर धरतात. यासाठी वाहत येणाऱ्या ओलाव्याच्या उगमाजवळ पोहचता यावं फक्त, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment